या मोदींच्या नशिबात कायमचं उपमुख्यमंत्रीपदच राहणार !
भाजपाचे बिहारमधील सगळ्यात मोठे नेते आहेत सुशील कुमार मोदी! त्यांच्या स्वतःच्या पक्षात नसतील एवढे ते इतर पक्षांच्या मनात धडकी भरवतात. सतत कुणाशी वैरभाव न ठेवणं आणि तडकाफडकी निर्णय घेण्याच्या त्यांच्या गुणांमुळे त्यांनी कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले आहेत.
पण २०२० ची निवडणूक खऱ्या अर्थाने हे नाव कितपत यशस्वी झालं आणि आपल्या आयुष्यात मोदींनी टाकलेले फासे कितपत उपयोगी पडले हे सांगणारी होती.
एक काळ असा होता ती त्यांचं लव्ह-हेट-लव्ह रिलेशन असणारे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते –
आम्हाला दुसऱ्या कोणत्या मोदींची गरज नाही! बिहारमध्ये असणारे एकच मोदी आम्हांला पुरेसे आहेत.
विशेष म्हणजे या माणसाला सुशील कुमार मोदी यांनी ‘धोखेबाज’ म्हणून संबोधित केलं होतं. नंतरची अनेक वर्षे त्यांना याच माणसाच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं लागलं.
सुशील कुमार मोदी यांचा जन्म ५ जानेवारी १९५२ चा. भारतीय जनता पक्षामधील एकमोठं नाव. पाटणा शहरामध्येच जन्म आणि शिक्षण घेतल्यामुळे मोदी यांची राजकीय जडणघडण आपोआप झाली. बिहार बाकी कितीही मागास असू, राजकीय डावपेच आणि लढे यात हे राज्य नेहमी आघाडीवर असते. लहानपणापासून त्यांच्यावर रा. स्व. संघाचा प्रभाव होता.
बापाचं कपड्याचं मोठं दुकान होतं. पोरांनी यात हातभार लावावा अशी त्यांची अपेक्षा होती. सुशील कुमार मोदी यांनी याला साफ नकार दिला. मला लोकांच्या सेवेसाठी काम करायचं आहे असं म्हणून त्यांनी यातून अंग काढून घेतलं आणि स्वतःची वेगळी वाट बनवली.
नुकतीच संघावरची बंदी उठली होती. १९६२ च्या चीन युद्धात भारताचा पराभव झाला तर देशातल्या लोकांना लढा उभारावा लागेल यासाठी संघाने नागरिकांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली होती.
वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सुशील कुमार मोदी या वेळी संघात शिरले आणि त्यांनी ट्रेनिंगचे धडे द्यायला सुरुवात केली.
सिव्हिल डिफेन्स म्हणून लोकांना परेड करायला ते शिकवत. १९६८ साली त्यांनी संघात ३ वर्षांचा ऑफिसर्स ट्रेनिंग कोर्स पूर्ण केला. हा कोर्स संघातील सर्वोच्च कोर्स समजला जातो.
मॅट्रिकनंतर संघाचे पूर्णवेळ विस्तारक म्हणून धनपूर आणि खागोल भागात संघाच्या अनेक शाखा सुरु केल्या. पाटणा शहरातील संघाची संध्याकाळची शाखा म्हणजे बिहारच्या राजकारणाचे एक केंद्र होते. त्यांचं संघासाठीचं योगदान बघून त्यांना या शाखेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली.
या काळात त्यांचं शिक्षणही चालू होतं. बीएस्सी झाल्यानंतर त्यांना चांगल्या कॉलेजात ऍडमिशन मिळालं. संशोधनात त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. वर्गातलीच ख्रिश्चन मुलगी जेसी जॉर्ज हिच्याशी त्यांचं प्रेमप्रकरण सुरु होतं.
मुंबईत राहणारी एक केरळी मुलगी संघाच्या प्रसारकाला पसंत पडली. एक सरळ चांगलं आयुष्य त्यांच्या समोर होतं.
पण इतक्यात बिहारमध्ये जयप्रकाश नारायण हे वादळ उठलं. समाजवादी क्रांतीच्या स्वप्नाने अनेक तरुण भारावले गेले. त्यापैकी लालू, नितीश आणि सुशीलकुमार मोदी हे पहिल्या बिनीतले शिलेदार बनले. वेगवेगळ्या पक्षाच्या वाट निवडल्या तरी या माणसांनी त्या काली बिहार गाजवून सोडला. हि चळवळ बिहार मुव्हमेंट म्हणून प्रसिद्धीस पावली.
सगळा त्याग करून सुशीलकुमार यांनी यात उडी घेतली.
त्यांची जात म्हणजे मोढ-तेली. बिहारमध्ये ओबीसी गटात त्यांचा समावेश होतो. तोवर राजकारणात फक्त यादव प्रभूती जनतेचा वरचष्मा होता. देशात ओबीसी नेतृत्वाची नवी फळी बनवण्यास मंडल आयोगानंतर सुरुवात झाली. यात मोदींचे नेतृत्व पुढे आले.
१९९० साली मोदींनी बिहारच्या राजकारणात कार्यरत राहण्यास सुरूवात केली. भाजपाची पायाभरणी झाली होती. भाजपकडून ते सलग तीन विधानसभा निवडणुकीत १९९०, १९९५ व २००० साली बिहार विधानसभेवर निवडून गेले.
मधल्या काळात वेळ न दडवता त्यांनी आपली प्रेयसी जेसी जॉर्ज हिच्याशी १९८७ साली लग्नही आटोपून घेतलं. त्या एका कॉलेजात प्रोफेसर म्हणून काम करत असत.
उत्कर्ष तथागत आणि अक्षय अमृतांशू ही दोन अपत्येही त्यांना आहेत.
भाजपच्या केंद्रीय सत्तेच्या काळात त्यांचा राज्यातील वरचष्मा वाढला. त्यावेळी नरेंद्र मोदींपेक्षा सुशील कुमार मोदी हे नाव जनसामान्यांना जास्त माहीत होतं. २०१२ साली गुजरातमधून बाहेर निघून नरेंद्र मोदीं प्रचंड वेगानं राष्ट्रीय राजकारणात शिरले. पण सुशील कुमार मोदी हे त्याच्या कितीतरी आधीपासून दिल्ली दरबारी वजन ठेवून होते. २००४ सालीच त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. एक वर्ष त्यांनी खासदारकी सुद्धा केली. तेव्हा भाजपचे सरकार येणार असं काँग्रेसचे लोकही म्हणत होते. सुशील कुमार मोदी यांना केंद्रात मोठी संधी मिळू शकली असती.
पण काँग्रेस बहुमताने आली. बिहारच्या राजकारणाची ओढ त्यांना शांत बसू देईना.
२००४ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी भागलपूर मतदारसंघामधून निवडून आले. पण फक्त एक वर्ष संसद सदस्य राहिल्यानंतर मोदींनी २००५ साली खासदारपदाचा राजीनामा दिला व ते बिहारमध्ये परतले.
आपण देशापेक्षा स्थानिक जनतेत जास्त काम करू शकू असा विश्वास त्यांना वाटलं. म्हणून ते २००५ साली पुन्हा पाटण्यातआले आणि आजतागायत त्यांची घोडदौड सुरु आहे. २००५ ते २०१३ दरम्यान ते नितीश कुमारयांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्रीपदावर होते.
ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये मोदींना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे प्रमुख नेते म्हणून ओळख मिळाली. एन.डी.ए.ला बहुमत मिळाल्यास मोदींना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता सगळेच बोलून दाखवत होते. पण ह्या निवडणुकीत बहुमत मिळवण्यास भाजपला अपयश आले
बिहारच्या मुख्यमंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली.
यंदाच्या निवडणुकीत देखील तेजस्वी यादव, नरेंद्र मोदी, नितीशकुमार, चिराग पासवान ही मंडळी टीव्हीवर प्रचारात चमकत होती पण तळागाळात जाऊन सुशीलकुमार यांनी केलेलं काम शांतपणे बोलत होतं.
यावेळी त्यांच्याच प्रयत्नामुळे भाजपने ७४चा आकडा पार केला. एनडीएला बहुमत मिळाले, यात सर्वात मोठा वाटा सुशीलकुमार मोदी यांचाच आहे यात शंका नाही. पण अमित शहा यांनी नितीशकुमारना दिलेल्या आश्वासनामुळे सुशील मोदींच्या पदरी पुन्हा उपमुख्यमंत्रीपदच राहणार आहे हे नक्की.
हे हि वाच भिडू
- महाराष्ट्रात नाही पण बिहारमध्ये तरी अमित शहा शब्द पाळणार का ?
- घरात निवडणुका सुरु असताना बिहारचा किंगमेकर कुठे गायब आहे?
- लालूंनी अडवाणींना धमकी दिली, “तुमची रथयात्रा बिहारमध्ये कशी येते हे बघतोच !”