तिकीट मिळेल म्हणून पोलीस खात्याचा राजीनामा दिला पण पहिल्याच झटक्यात गेम झाला.

नशीब आणि नियती या गोष्टी अजूनही आपल्याला कधी कुठे नेऊन सोडतील याचा अंदाज कधी लागलेला नाही. राजकारण तर एक असा जुगार आहे रावाचा रंक होतो आणि रंकाचा राव होतो. नियतीच्या खेळाचा असाच अनुभव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांना आयुष्यभर आला आहे.

एक गरीब दलित कुटूंबात जन्मलेला साधा पट्टेवाला राज्याचा मुख्यमंत्री होतो, देशाच्या गृहमंत्रीपदापर्यंत पोहचतो हि एखादी परीकथाच म्हणावी लागेल.

सुशीलकुमारांचा बालपण ते राजकारणपूर्व जीवन प्रवास खडतर होता. वडिलांच्या निधनानंतर घरची परिस्थिती खालावत गेली. आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर सोलापूरच्या न्यायालयात शिरस्तेदाराची (शिपाई म्हणून) नोकरी मिळाली. वकिलांना पुकारायचे ते काम होते.

एकीकडे शिरस्तेदारांची नोकरी आणि दुसरीकडे रात्रीची शाळा सुरू होती.

ज्या कोर्टात ते सोलापूरला पट्टेवाला म्हणून काम करीत होते, त्याच कोर्टाच्या न्यायाधीशांनी या या पट्टेवाल्याला बढती देऊन क्लार्क बनवले. पुढे जिद्दीने आपलं उरलेलं शिक्षण पूर्ण केलं, पदवी मिळवली.

ज्या कोर्टात वकिलांना पुकारण्याचं काम केलं त्याच कोर्टात काळा कोट घालून मिरवण्याचं स्वप्न बघत पुण्याला लॉ कॉलेजला आले. चांगल्या मार्काने वकिली पूर्ण केली. पण यावर ते थांबले नाहीत, पोलीस उपनिरीक्षक म्हणून नोकरी मिळवली. स्वप्नातही पाहिलं नाही या वेगाने आयुष्य  वळण घेत होतं.

त्यांची पहिलीच नियुक्ती मुंबईच्या पोलीस सीआयडी विभागात झाली होती.

गुप्तहेर खात्यातील पोलीस सबइन्स्पेक्टरला राजकीय नेत्यांच्या हालचाली, त्यांचे कार्यक्रम यावर बारकाईने लक्ष ठेवावे लागते. या नोकरीचा फायदा असा झाला की, सुशीलकुमार यांच्या ओळखीचा परीघ विस्तारला. त्यांच्या हसतमुख स्वभावाने अनेकांशी मैत्री देखील झाली. यातच होते त्या वेळच्या युवक काँग्रेसचे प्रमुख गोविंदराव फणसे आणि श्रीराम लेले.

या दोघांशी सुशीलकुमार शिंदेंची घनिष्ट मैत्री झाली. मैत्रीने त्यांच्या आयुष्याला आणखी एक वेगळीच कलाटणी दिली.

त्याकाळच्या काँग्रेस नेतृत्वाला सुशील कुमार शिंदे यांच्यातील टॅलेंट, त्यांची राजकीय समज, नेतृत्व क्षमता याचा अंदाज आला होता. यातूनच त्यांना एक दिवस शरद पवार यांच्या पर्यंत पोहचवलं.

शरद पवार हे सुशील कुमारांच्या समवयस्क होते. पुण्यात विद्यार्थी चळवळीच्या निमित्ताने त्यांचा संबंध येऊन गेला होता. यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी अत्यन्त कमी वयात राज्याच्या राजकारणात वेगाने प्रगती केली होती.

शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे यांना नोकरी सोडण्याचा सल्ला दिला. आधी तर सुशीलकुमार यांना कळेच ना कि पवार असं का म्हणत आहेत. ते त्यावर म्हणाले,

‘नोकरी सोडून काय करू?’

पवारांनी त्यांना राजकारणात येण्याचं आमंत्रण दिलं. सुशील कुमार शिंदे यांनी काही क्षण विचार केला आणि ही ऑफर स्वीकारली. सुखाने चाललेल्या नोकरीचा थेट राजीनामा दिला.

हे मोठं धाडस होतं. शिंदेंना अनेकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यात होते मुंबईचे तत्कालीन पोलीसप्रमुख सूर्यकांत जोग.  

सूर्यकांत जोग यांना जेव्हा आपल्या दलातील एक ऑफिसर राजीनामा देऊन राजकारणात चालला आहे हे कळलं तेव्हा त्यांनी शिंदेंना भेटायला बोलवलं. हातची नोकरी सोडून बेभरवशाच्या राजकारणात जाऊ नको असा वडिलकीचा सल्ला दिला. पण सुशीलकुमार शिंदे यांचा निर्णय झाला होता.

सुशीलकुमार शिंदे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये आले.

पवारांनी आपला शब्द पाळला. १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत करमाळा विधानसभा मतदारसंघातून त्यांना तिकीटही दिले गेले. मुख्यमंत्री असलेल्या वसंतराव नाईक यांनी  नावाला हिरवा कंदील दाखवला.

काँग्रेसच्या विधानसभा उमेदवारांची यादी परंपरेप्रमाणे दिल्लीला गेली. शिंदे निवडणुकीच्या तयारीला देखील लागले . पण मोठा घोळ झाला. दिल्लीतून परत आलेल्या यादीत सुशील कुमार शिंदेंच्या नावापुढे फुली मारण्यात आली होती. काँग्रेसचे जेष्ठ नेते बाबू जगजीवनराम यांनी त्यांच्या नावाला विरोध केला होता.

करमाळा येथील तिकीट तायाप्पा सोनावणे यांना देण्यात आलं होतं.  

सुशीलकुमार शिंदे यांना धक्का बसलाच पण शरद पवार देखील मनातून थोडेसे खजील झाले. त्यांनीच सुशीलकुमार शिंदे यांना नोकरी सोडून राजकारणात यायला लावलं होतं. पण सुशीलकुमार शिंदे यांनी उमदेपणानं पवारसाहेबांना सांगितले,

‘काही फरक पडत नाही.. पक्षाचे काम करू..’

दुःख साजरे न करत बसता सुशीलकुमार शिंदे कामाला लागले. त्यांना माहित होतं, आज ना उद्या आपल्याला संधी मिळणार आहे. आणि खरोखर तसं घडलं.

करमाळाचे आमदार तायप्पा हरी सोनावणे यांचे दु:खद निधन झाले आणि तिथे पोटनिवडणूक लागली. यावेळी मात्र तिकीट सुशीलकुमार शिंदेंनाच मिळालं. 

त्याकाळी विधानसभा पोटनिवडणूक असेल तर प्रचारात राज्याचे मुख्यमंत्री सहसा जात नसत. पण मागच्या वेळी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर झालेला अन्याय लक्षात ठेवून वसंतराव नाईक यांनी त्यांना मी स्वतः तुमच्या प्रचाराला येईन असं सांगितलं. सुशील कुमार यांना ते खरंच येतील असं वाटलं नव्हतं.

पण शब्दाला पक्के असलेले मुख्यमंत्री वसंतराव नाईक करमाळा येथे आले. तिथे त्यांनी जोरदार भाषण केलं. या भाषणात ते म्हणाले,

‘तुम्ही या तरुणाला निवडून द्या.. पुढचे माझ्यावर सोपवा..’

लोकांनी खरोखर २० हजारांचं मोठं बहुमत देऊन सुशीलकुमार शिंदे यांना निवडून दिलं. मुख्यमंत्र्यानी दिलेला शब्द खरा केला. पुढच्या दोनच महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सुशीलकुमार शिंदे यांना मंत्रिपद देण्यात आलं. इथून पुढचा इतिहास तर आपल्याला ठाऊकच आहे. 

नशिबाचे फासे कसे पडत जातात आणि कधीही न पाहिलेली स्वप्ने देखील काही क्षणात खरी होत जातात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांचं आयुष्य.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.