मंत्रिपद मिळत नाही म्हणून सुशीलकुमार शिंदे एका बाबाकडे गेले आणि..

सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे यांच्या घरची परिस्थिती गरीबीची होती. न्यायालयात पट्टेवांल्याची नोकरी करून त्यांनी आपल शिक्षण पूर्ण केलं. पोलीस उपनिरीक्षक झाले. सीआयडी मध्ये नोकरी करताना सुशीलकुमारांचा वेगवेगळ्या नेत्यांशी संपर्क यायचा. यातूनच शरदरावांशी त्यांचा परिचय वाढला.

यापूर्वी पुण्यातही विद्यार्थी चळवळीच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली होती. दोघेही समवयस्क होते. आता घट्ट मैत्री झाली. सुशीलकुमारांच्या सारखा सुशिक्षित दलित समाजातला तरुण राजकारणात यावा अशी पवारांची इच्छा होती. त्यांनी शिंदेना तशी गळ घातली.

अखेर सुशीलकुमार शिंदेनी आपल्या सुखाच्या नोकरीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पवारांनी पुढे करमाळा येथून विधानसभा पोटनिवडणूक लढविण्यासाठी त्यांना तयार केले. सुशिलकुमार शिंदे तिथून विक्रमी मतांनी निवडूनही आले.

पवारांनी आपला एक कट्टर कार्यकर्ता जोडला होता.

पवारांच्या चांगल्या निर्णयाच्या पाठीशी सुशीलकुमार शिंदे खंबीरपणे उभे असलेले दिसायचे.

पवारांच्या पाठींब्यावरच सुशीलकुमारांना वसंतराव नाईकांच्या मंत्रीमंडळात सांस्कृतिकराज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. राज्यात ओळख मिळाली. दोघांच्या मैत्रीच्या परीक्षेची वेळ आली. शरद पवारांनी काँग्रेस फोडून वसंतदादा पाटलांच सरकार पाडलं.

जोपर्यंत पंढरीतल्या विठोबाचे हात कंबरेवर आहेत, तोपर्यंत मी काँग्रेसमध्येच असेन असं म्हणणारे सुशीलकुमार शिंदे देखील वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या कटात पवारांना सामील होते.

शरद पवारांनी स्वतःची वेगळी काँग्रेस काढली आणि जनसंघपासून समाजवादी, शेकाप, कम्युनिस्ट पक्षापर्यंत अनेकांची पुलोदची मोट बांधून स्वतः मुख्यमंत्री बनले. सुशीलकुमार शिंदे या मंत्रीमंडळात कामगार मंत्री होते. साल होत १९७८. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींच्या काँग्रेसचा पडता काळ सुरु होता. केंद्रातही जनतापक्षाच सरकार होतं.

पुलोदचे सरकार चालवणे म्हणजे तारेवरची कसरत होती.

वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या विचारसरणी असणारे नेते एकत्र आले होते, शरद पवारांना त्यांना बांधून ठेवण्यास खूप तडजोडी कराव्या लागत होत्या. या काळातच पवार आणि शिंदे यांच्यात वितुष्ट येण्यास सुरवात झाली. असं सांगितलं की एकदा खाजगी मध्ये बोलताना पवार सुशीलकुमार यांना उद्देशून म्हणाले होते की,

“हे कसले लेबर मिनिस्टर हे तर लेबर वॉर्ड (प्रसूतीगृहाचे) मिनिस्टर आहेत.”

इथूनच दोघांच्या दिशा वेगळ्या होण्यास सुरवात झाली. याच दरम्यान संपल्या संपल्या असं वाटत होत त्या इंदिरा गांधीनी जोरदार कमबॅक केलं. त्यांनी पवारांचं पुलोद सरकार बरखास्त करून टाकलं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या सोशालीस्ट काँग्रेसचा पराभव झाला.

सुशीलकुमार शिंदेंनी पवारांच्या काँग्रेसबरोबर फारकत घेऊन इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बॅ .ए.आर.अंतुले. त्यांचा कारभार धडाकेबाज होता. संजय गांधींचे एकनिष्ठ म्हणून इंदिराजीच्या लिस्टमध्ये त्यांना मानाचं स्थान होतं. महाराष्ट्रात काँग्रेसला परत रुजवण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्याना फ्री हॅन्ड दिला होता.

सुशिलकुमार शिंदे काँग्रेसमध्ये परतले खरे मात्र अंतुलेंनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी दिली जात असं कारण दिलं. मोठं राजकीय वजन असूनही सुशील कुमार शिंदे यांची अवस्था राजकारणातून बाहेर फेकल्या प्रमाणे झाली होती. जवळचे मित्र असलेल्या पवारांचा पक्ष सोडून काँग्रेसमध्ये परतले मात्र त्यांचं अस्तित्व न घर का ना घाट का अस झालं.

या संकटाच्या काळात त्यांची अवस्था सैरभैर अशी झाली होती. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुशिलकुमार शिंदे यांचे जीवलग मित्र होते. दोघांच्या अनेकदा रात्री बेरात्री गप्पा व्हायच्या. त्यांना शिंदेंची मनस्थिती ठाऊक होती. बाळासाहेब नेहमी सुशीलकुमार शिंदेंना म्हणायचे,

तुम्ही मुख्यमंत्री व्हायच्या लायकीचे आहात; पण कुठे अडथळा येतो, पाहुयात.

एकदा बाळासाहेबांना कुठल्या तरी बाबा बद्दल कळालं. त्यांनी सुशील कुमारांना त्यांचं नाव सुचवलं. शिंदे यांचा या गोष्टींवर खूप विश्वास नव्हता, मात्र आपल्यावर कोसळणारी संकटे कुठे थांबतील याचा विश्वास नसल्यामुळे त्यांनी त्या बाबांना भेटायचं ठरवलं. शिवाय बऱ्याचदा डेसातले अनेक पुढारी राजकीय धामधुमीच्या काळात अध्यात्मिक गुरूंचा सल्ला घेतात. इंदिरा गांधींपासून हि परंपरा चालत आलेली.

सुशील कुमार शिंदे त्या बाबाच्या आश्रमात गेले. तिथे बरीच गर्दी होती. माजी मंत्री आले आहेत म्हटल्यावर त्यांना थेट भेटीसाठी नेण्यात आलं.

सुशीलकुमार जेव्हा दर्शनासाठी खाली वाकले तेव्हा त्या बाबांनी त्यांच्या कपाळावर हात ठेवला. सुशील कुमार शिंदे यांना जोराचा झटका शॉक बसला. त्यांना काहीच कळेना हे नेमकं काय झालं. बाबांनी आशीर्वाद दिला आणि सुशील कुमार शिंदे मुंबईला परतले.

पुढे बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना भेटीबद्दल विचारलं. सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या बरोबर काय घडलं ते सांगितलं आणि तो बाबा भोंदू असावा अशी शंका व्यक्त केली.

बाळासाहेबांनी मग त्या बाबांना शिवसेना भवनात भेटण्यासाठी बोलावले. तिथेही त्याने चमत्कार करून दाखविले. सगळ्यांनाच धक्का बसला. हा बाबा चमत्कारी आहे अशीच अनेकांची भावना झाली होती.

शिंदे म्हणतात,

पण तरीही मला तो भोंदू वाटत होता. पुढे या बाबाला अटक झाली.

पण योगायोग म्हणावा कि आणखी काय मात्र राजकारणात बाहेर पडावे लागेल अशी अवस्था झालेले सुशीलकुमार शिंदे १९८३ साली राज्याचा अर्थमंत्री बनले. तिथून पुढे त्यांच्या राजकीय करियरने चढती कमानचं पकडली. बाळासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देखील झाले. देशाच्या गृहमंत्रीपदी जाण्याची किमया देखील त्यांनी करून दाखवली. कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी केलेला हा चमत्कारच होता.

  हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.