सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांच्या थकलेल्या दोस्तीचं रहस्य…

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यातील मैत्रीचे बरेच किस्से जगजाहीर आहेत. त्यांची मैत्री राजकारणापलीकडची असल्याचं नेहमीच बोललं जातं. आणि या नेत्यांनी वेळोवेळी याचे दाखले सुद्धा दिलेत. अगदी कालच झालेल्या टिळक पुरस्कार सोहळ्यात दोन्ही नेते एकत्र आले….जुने मित्र एकाच स्टेजवर दिसले हास्य विनोदात रमले.

त्यांच्या या दोघांच्या दोस्तीचा आणखी एक आधार म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आघाडी.

पण सध्या ही आघाडी म्हणजे धरलं तर चावतंय सोडलं तर पळतय अशीचं उरली आहे. त्यातही हि आघाडी आता महाविकास आघाडीचा भाग आहे. शिवसेना आत्ता सामील झाली. फक्त आघाडीचं बोलायचं तर महाराष्ट्र हा एकेकाळी आघाडीचा बालेकिल्ला. मात्र आज त्याचे बुरुज ढासळत आहेत. अनेक नेते सत्तेच्या लालसेपोटी पक्षांतर करत आहेत. राष्ट्रवादीत तर उभी फूट पडली. काँग्रेसचंही काही बरं चाललं नाहीये. आघाडीसाठी ही रात्र वैऱ्याची आहे. मात्र तरीही या दोन्ही पक्षांचे नेते मात्र अशा परिस्थितीतही एकमेकांवर दुगाण्या झाडायचं थांबवत नाही आहेत.

यानिमित्ताने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सुशीलकुमार शिंदेनी प्रचारावेळी एक वक्तव्य केलेलं की,

” राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकलेले आहेत. आज जरी वेगळे असलतील तर उद्या हे एकत्र येण्याचा विचार करतील,”

शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून सुशीलकुमार शिंदेना खडसावले होते. माध्यमांमध्ये यावरून गरमागरम चर्चा झाली होती. योगायोग म्हणजे राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीचा उर्वरित गट काँग्रेसमध्ये विलीन करावा अशी पुन्हा चर्चा सुरु होणं आणि काल दोन्ही नेते एकत्र दिसण्यामुळे शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या मैत्रीचे दाखले द्यावे असे वाटते.

एककाळ असा होता की शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या मैत्रीचे दाखले राजकारणात दिले जायचे. एवढच काय सुशीलकुमार शिंदे राजकारणात आले ते शरद पवार यांच्या मुळेच.

सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे यांच्या घरची परिस्थिती गरीबीची होती. न्यायालयात पट्टेवांल्याची नोकरी करून त्यांनी आपल शिक्षण पूर्ण केलं. पोलीस उपनिरीक्षक झाले. तोपर्यंत त्यांचे समवयस्क असणारे शरदराव पवार यांचा राजकारणात जम बसला होता. कॉलेज जीवनात विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांसारख्या मोठ्या नेत्यावर आपली छाप पाडली होती. युवक काँग्रेसमध्ये काम करत असताना त्यांना बारामतीमधून लढण्याच तिकीट मिळालं, अगदी लहान वयात वसंतराव नाईकांच्या सरकारात मंत्रीदेखील बनले.

पोलीस खात्यात असल्यामुळे सुशीलकुमारांचा वेगवेगळ्या नेत्यांशी संपर्क यायचा. यातूनच शरदरावांशी त्यांचा परिचय वाढला. यापूर्वी पुण्यातही विद्यार्थी चळवळीच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली होती. दोघेही समवयस्क होते. आता घट्ट मैत्री झाली. सुशीलकुमारांच्या सारखा सुशिक्षित दलित समाजातला तरुण राजकारणात यावा अशी पवारांची इच्छा होती. त्यांनी शिंदेना तशी गळ घातली.

अखेर सुशीलकुमार शिंदेनी आपल्या सुखाच्या नोकरीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पवारांनी पुढे करमाळा येथून विधानसभा पोटनिवडणूक लढविण्यासाठी त्यांना तयार केले. सुशिलकुमार शिंदे तिथून विक्रमी मतांनी निवडूनही आले. पवारांनी आपला एक कट्टर कार्यकर्ता जोडला होता.

पवारांच्या चांगल्या निर्णयाच्या पाठीशी सुशीलकुमार शिंदे खंबीरपणे उभे असलेले दिसायचे.

पवारांच्या पाठींब्यावरच सुशीलकुमारांना वसंतराव नाईकांच्या मंत्रीमंडळात सांस्कृतिकराज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. राज्यात ओळख मिळाली. दोघांच्या मैत्रीच्या परीक्षेची वेळ आली. शरद पवारांनी काँग्रेस फोडून वसंतदादा पाटलांच सरकार पाडलं. जोपर्यंत पंढरीतल्या विठोबाचे हात कंबरेवर आहेत, तोपर्यंत मी काँग्रेसमध्येच असेन असं म्हणणारे सुशीलकुमार शिंदे देखील वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या कटात पवारांना सामील होते.

शरद पवारांनी स्वतःची वेगळी काँग्रेस काढली आणि जनसंघपासून समाजवादी, शेकाप, कम्युनिस्ट पक्षापर्यंत अनेकांची पुलोदची मोट बांधून स्वतः मुख्यमंत्री बनले. सुशीलकुमार शिंदे या मंत्रीमंडळात कामगार मंत्री होते. साल होत १९७८. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींच्या काँग्रेसचा पडता काळ सुरु होता. केंद्रातही जनतापक्षाच सरकार होतं.

पुलोदचे सरकार चालवणे म्हणजे तारेवरची कसरत होती.

वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या विचारसरणी असणारे नेते एकत्र आले होते, शरद पवारांना त्यांना बांधून ठेवण्यास खूप तडजोडी कराव्या लागत होत्या. या काळातच पवार आणि शिंदे यांच्यात वितुष्ट येण्यास सुरवात झाली. असं सांगितलं की एकदा खाजगी मध्ये बोलताना पवार सुशीलकुमार यांना उद्देशून म्हणाले होते की,

“हे कसले लेबर मिनिस्टर हे तर लेबर वॉर्ड (प्रसूतीगृहाचे) मिनिस्टर आहेत.”

इथूनच दोघांच्या दिशा वेगळ्या होण्यास सुरवात झाली. याच दरम्यान संपल्या संपल्या असं वाटत होत त्या इंदिरा गांधीनी जोरदार कमबॅक केलं. त्यांनी पवारांचं पुलोद सरकार बरखास्त करून टाकलं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या सोशालीस्ट काँग्रेसचा पराभव झाला.

सुशीलकुमार शिंदेंनी पवारांच्या काँग्रेसबरोबर फारकत घेऊन इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

शिंदेंनी आपल्या मागच पवारांचा कट्टर कार्यकर्ता हे लेबल पुसण्यासाठी बरेच प्रयत्न केले. दिल्लीतल्या श्रेष्ठींशी संबंध सुधारले. ज्या वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हटल जात होत त्यांच्याशीच जुळवून घेतलं. इतकच काय पुढे जेव्हा वसंतदादा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी जुनं सगळ विसरून सुशीलकुमाराना आपला अर्थमंत्री निवडलं.

काही वर्षांनी शरद पवार काँग्रेसमध्ये परतले. मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांनी सुशीलकुमारांच्या अर्थमंत्रालयाची खुर्ची काढून घेतली नाही. सलग ९ वेळा त्यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. पुढे पवारांची खुर्ची जावी यासाठी विलासराव देशमुख यांच्या सोबत त्यांनीच बंड पुकारलं

पुढे शरद पवार केंद्रात संरक्षण मंत्री बनले. मुंबई बॉम्बस्फोटानंतर त्यांना परत राज्याचा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. शिंदेंची रवानगी तोवर राज्यसभेत आणि पर्यायाने देशाच्या राजकारणात करण्यात आली होती. दिल्लीतल्या श्रेष्ठींच्या गळ्यातले ते ताईत बनले.

सोनिया गांधींच्या आगमनानंतर पवारांनी परत काँग्रेस पक्ष सोडला व राष्ट्रवादीची स्थापना केली. यावेळी सुशीलकुमार त्यांच्या सोबत गेले नाहीत.

१९९९ ला युतीचा पराभव झाला त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी व्हावी याचा फॉर्म्युला शिंदेंनीच बनवला होता. सरकार स्थापन करायची वेळ आली तेव्हा सुशीलकुमारांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत होतं पण त्या खुर्चीत बसायसाठी २००३ हे वर्ष उजाडावं लागलं. परत जेव्हा केंद्रातही काँग्रेसची सत्ता आली तेव्हा शरद पवार देशाचे कृषिमंत्री बनले. काही वर्षांनी सुशीलकुमाराना देशाच्या गृहमंत्रीपदाची खुर्ची मिळाली. देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी त्यांची चर्चा झाली.

शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदें, राजकारणात जवळपास पन्नास उन्हाळे पावसाळे या दोन नेत्यांनी एकत्र बघितले.

एकेकाळची मैत्री आता उरली नाही पण राजकारणात कडवटपणा न जपण्याचा हिशोबीपणा मात्र दोघांच्यातही होता. सुशीलकुमार शिंदे तर आजही जाहिरपणे मान्य करतात की शरद पवार हे माझे पहिले राजकीय गुरु आहेत. पण तरीही सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक वादळात मात्र आता या दुराव्याच्या भेगा वाढताना दिसत आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.