पाठीत खंजीर खुपसूनही वसंत दादांनी सुशीलकुमार शिंदेंना अर्थमंत्री बनवलं..

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सगळ्यात गाजलेलं प्रकरण म्हणजे वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणे. या घटनेवरून अनेक उलटसुलट चर्चा झाल्या आहेत. यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र समजले जाणाऱ्या शरद पवारांना या खंजीर प्रकरणावरून आजही टीका केली जाते.

गोष्ट आहे सत्तरच्या दशकातली. राज्यात तेव्हा रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस असे युतीचे सरकार होते. रेड्डी काँग्रेसचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री तर इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री होते.

महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं मात्र त्याची सुरवात लडखडत झाली.

पण हे आघाडी सरकार अस्तित्वात आल्याच्या पहिल्या दिवसापासून नासिकराव तिरपुडेनी यशवंतराव चव्हाणांच्यावर टीका करण्यास सुरवात केली. नासिकराव तिरपुडे हे आधीपासून विदर्भवादी नेता म्हणून प्रसिद्ध होते, त्यांना पश्चिम महाराष्ट्रातील सहकार लॉबीच्या नेत्यांवर राग होता. हे नेते फक्त मराठा समाजाचच नेतृत्व करतात असा त्यांचा आरोप असायचा.

नासिकराव तिरपुडे यांना केंद्रातून मोकळीक देण्यात आली होती. याचा त्यांनी फायदा उचलला.

दादांच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करून स्वतःच मुख्यमंत्री असल्याच्या थाटात प्रतिसरकार चालवण्यास सुरवात केली. ते आणि इंदिरा कॉंग्रेसचे इतर आमदार वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत होते.

एकदा पत्रकारांनी नासिकराव तिरपुडे यांना आघाडीचे सरकार कसे चालू आहे हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी वसंतदादांच्या काठी टेकीत चालण्यावरून असंस्कृत टिप्पणी केली की,

” काठी टेकीत टेकीत चालू आहे.”

दोन्ही कॉंग्रेसमध्ये दुरावा वाढत चालला होता. रेड्डी कॉंग्रेसचे नेते आपल्या जेष्ठ नेत्यांवर रोज होणार्या टिकेमुळे चिडून होते.

खुद्द वसंतदादा देखील आपल्या उपमुख्यमंत्र्यांच्या कारभाराला कंटाळले होते. शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांचे मानस पुत्र म्हणून ओळखले जायचे. दादांच्या मंत्रिमंडळात ते उद्योग मंत्री देखील होते. दादांनी त्यांना थेट सांगितलं,

“शरद, या नाशिकरावचे बघा काय तरी, नाही तर मीच राज्यपालांकडे राजीनामा देऊन आपल्या सगळ्यांचीच नाशिकरावच्या जाचातून सुटका करून घेतो.”

इंदिरा कॉंग्रेसच्या ऐवजी जनतापक्षाचा पाठींबा घेऊ असा विश्वास वसंतदादांना होता. त्यांची केंद्रात नेते असणाऱ्या चंद्रशेखर यांच्याशी मैत्री होती. पण जेव्हा खरोखरीस राजीनाम्याची वेळ आली तेव्हा दादांनी धाडस दाखवले नाही. मात्र इतर यशवंतराव चव्हाण समर्थक नेते आक्रमक झाले. त्यांनी हे सरकार पडायची तयारी सुरु केली.

जेष्ठ संपादक गोविंदराव तळवळकर यांनी अग्रलेख लिहिला की

हे सरकार पडावे ही तर श्रींची इच्छा.

या अग्रलेखानंतर सरकार पाडण्याच्या गतीविधी वेगवान झाल्या. दादांना कुणकुण लागली होती. मात्र त्यांच्या हातातून सर्व गोष्टी निसटत चालल्या होत्या. उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे हे अवघड जागेचे दुखणे बनले होते. त्यांच्यामुळे वसंतदादांची फरफट होत होती.

अखेर १२ जून १९७८ रोजी शरद पवार, सुंदरराव सोळंकी, सुशीलकुमार शिंदे व दत्ता मेघे या चार मंत्री विधानसभेत सत्ताधारी बाकावरून उठले आणि शेजारी विरोधी बाकांवर जाऊन बसले. त्यांनी वसंतदादांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. शरद पवार या बंडखोरांचं नेतृत्व करत होते. त्यांना ३८ आमदारांचा पाठींबा होता.

या बंडखोरीमुळं वसंतदादा पाटलांचं सरकार कोसळलं. ज्याला आपल्या सर्वात जवळचा मानत होतो त्या पवारांनी धोका दिला अशीच वसंत दादा पाटलांची भावना झाली. ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली त्या नेत्यांवर तर दादांचा राग होताच पण खुद्द यशवंतराव चव्हाणांच्या विरुद्ध देखील ते नाराज झाले.

इकडे या बंडखोर आमदारांना घेऊन शरद पवार जनता पक्षाकडे गेले. त्यांचा पाठिंबा घेतला. वसंतदादांच्या विरोधात असलेले जनसंघ, मस्का काँग्रेस, डावे पक्ष या सगळ्यांना एकत्र करून पवारांनी  पुलोद सरकारची मोट बांधली आणि स्वतः मुख्यमंत्री बनले.

या पुलोद सरकारमध्ये शरद पवारांचे सर्वात जवळचे सहकारी होते सुशील कुमार शिंदे.

सोलापूर मध्ये एका गरीब कुटूंबात जन्मलेल्या सुशील कुमार शिंदेनी पट्टेवाल्याची नोकरी करून आपलं शिक्षण पूर्ण केलं. पुढे पोलीस उपनिरीक्षक बनून सीआयडीमध्ये नोकरीला लागले. या काळात त्यांची पवारांशी मैत्री झाली. त्यांच्या आग्रहानेच सुशीलकुमार शिंदे राजकारणात आले. आमदार झाले, मंत्री झाले. यशवंतराव चव्हाण समर्थक गटातले तरुण तुर्क म्हणून शिंदेंना ओळखलं जायचं. वसंतराव नाईक यांच्यापासून ते वसंतदादा पाटलांपर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्यांचे ते लाडके होते.

सुशील कुमार शिंदेंना शरद पवारांचा उजवा हात म्हणून समजलं जायचं. पवारांचे शिंदेंवर अनंत उपकार होते. त्यांच्या आग्रहामुळेच जोपर्यंत पंढरीतल्या विठोबाचे हात कंबरेवर आहेत, तोपर्यंत मी काँग्रेसमध्येच असेन असं म्हणणारे सुशीलकुमार शिंदे देखील वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या कटात पवारांना सामील होते.

पुलोदच्या मंत्रिमंडळात सुशीलकुमार शिंदे  कामगार व पर्यटन खात्याचा कॅबिनेट मंत्री बनले.

पण हे सरकार फार काळ टिकले नाही.

१९८० सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात मोठे सत्तांतर घडून आले. जनात पक्षाच्या ऐवजी लोकांनी पुन्हा काँग्रेसला पसंती दिली. इंदिरा गांधी थाटात पंतप्रधान झाल्या. सत्तेत आल्या आल्या त्यांनी आपल्या विरोधात जी जी सरकारे आहेत ती पाडून टाकली आणि तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली.

पवारांचं सरकार कोसळलंच पण संजय गांधी व अंतुले यांच्या प्रयत्नांमुळे पवारांच्या पक्षातले अनेक आमदार पुन्हा काँग्रेस मध्ये परतले. ५६ आमदार असलेल्या शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेस पक्षात आता फक्त ६ आमदार शिल्लक राहिले.

पवारांच्या राजकीय पक्षाला काहीही भवितव्य नाही असंच सगळ्यांचं म्हणणं पडलं. पवारांचं विरोधीपक्ष नेते पद देखील गेलं. इंदिरा काँग्रेस सोडणे आपली मोठी चूक होती असं मानत पवारांचे उजवा हात समजले जाणारे सुशीलकुमार शिंदे देखील काँग्रेसमध्ये परतले.

केंद्रात देखील जनता पक्षात फुटाफूट झाली. जनसंघ वेगळा होऊन भाजप बनला.  इंदिरा गांधींचे यश बघून त्यांचे जुने सहकारी पुन्हा काँग्रेस मध्ये परतु लागले.

संजय गांधींचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे अब्दुल रहमान अंतुले राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी अनेक जुन्या नेत्यांना पक्षात परत घेतलं पण त्यांना कोणतीही राजकीय पदे दिली नाहीत. विशेषतः सुशीलकुमार शिंदे यांना तर वाळीत टाकलं होतं.

ते सांगतात मी या काळात पवारांच्या सल्ल्याने शेतीच्या नादाला लागलो होतो.

सुशील कुमार शिंदे यांना कोणताही राजकीय वारसा नव्हता. कोणतेही पैशांचे पाठबळ नव्हते. त्यांची राजकीय कारकीर्द संपली असच म्हटलं जाऊ लागलं होतं. जवळचे मित्र असलेल्या पवारांचा पक्ष सोडून काँग्रेसमध्ये परतले मात्र त्यांचं अस्तित्व न घर का ना घाट का अस झालं.

पुढे सुशीलकुमार शिंदे आमदार बनले मात्र त्यांना अंतुले आणि त्यांच्यानंतर आलेल्या बाबासाहेब भोसले यांनी मंत्रिपदापासून दूरच ठेवलं. या काळात सैरभैर झालेल्या शिंदेनी अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. एका भविष्य सांगणाऱ्या बाबांचा देखील सल्ला घेतला मात्र काही फायदा झाला नाही.

 अशातच एक घटना घडली. मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी विधानपरिषदेमध्ये भाषण करताना पक्षातील विरोधकांवर असंसदीय भाषेत टिप्पणी केली. यावरून गोंधळ उडाला. बाबासाहेब भोसलेंच्या वक्तव्यावर चिडलेल्या काँग्रेस आमदारांनी आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री असून त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला.

सुशीलकुमार शिंदे यात आघाडीवर होते. त्यांनीच नानासाहेब एडबवार यांच्या सोबतीने बाबासाहेब भोसलेंच्या विरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला. या बंडाचा परिणाम बाबासाहेब भोसले यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यांच्या जागी अखेर पुन्हा वसंतदादा पाटील यांची नियुक्ती झाली.

 वसंतदादा पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर सुशीलकुमार शिंदे यांच्या उरल्या सुरल्या आशा देखील संपुष्टात आल्या. वसंतदादांच्या पाठीत आपण खंजीर खुपसला होता हे ते विसरले नसतील याची सुशीलकुमार यांना खात्री होती. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदासाठी काही प्रयत्न देखील केले नाहीत.

मात्र जेव्हा वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळाची घोषणा झाली तेव्हा त्यात सुशीलकुमार शिंदे यांचं नाव तर होतंच पण त्याच्या पुढे जाऊन दादांनी सुशीलकुमारांना राज्याचा अर्थमंत्री बनवलं होतं.  

सुशीलकुमार शिंदे हि आठवण सांगताना म्हणतात दादांनी सर्वांचाच अंदाज चुकवीत मला मंत्रिमंडळात स्थान दिले, इतकेच नव्हे तर मी अर्थमंत्री व्हावे असा आग्रह त्यांनी धरला व तो पूर्णत्वालाही नेला. पूर्वीचा राग न धरता सर्वकाही विसरून त्यांनी मला मंत्रिमंडळात स्थान दिले, याचे मलाही आश्‍चर्य वाटले.

त्यांनी एकदा हा प्रश्न वसंतदादा पाटलांना विचारला तेव्हा दादा म्हणाले,

“सुशील, तू इंदिरा गांधींच्या विरोधात नव्हतास. तू तुझ्या मित्राच्या प्रेमापोटी त्यांच्यासोबत गेलास. त्यामुळे तू या सरकारमध्ये आले पाहिजे.”

दादांच्यामुळे सुशील कुमार शिंदेंच राजकीय करियर सावरलं. इतकंच नाही तर ते पुढे जाऊन मुख्यमंत्री देशाचे गृहमंत्री पदापर्यंत पोहचले. याच सगळं श्रेय शिंदे वसंतदादा पाटलांना देतात.  ते म्हणतात,

“त्यांचं सरकार पाडण्याएवढं महापातक करूनही मला अर्थमंत्री बनवणारा, अशी  उदारमतवादी भूमिका असणारा त्यांच्यासारखा दिलदार नेता होणे नाही.” 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.