सुशील कुमारांचं मुख्यमंत्रीपद गेलं पण विलासरावांनी त्यांच्यासाठी खास विमान पाठवलं..

विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे. महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री. समकालीन नेते असलेले हे दोघेही दिग्गज. मात्र राजकारण्यांमध्ये दुर्मिळ असलेली जिवाभावाची मैत्री या दोघांमध्ये होती. खुर्चीसाठी एकमेकांचे पाय खेचणाऱ्या जमान्यात तर दोघांच्या दोस्तीची मिसाल दिली होते.

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात दोघांना दो हंसो का जोडा म्हणून ओळखलं जायचं.

हे दोघे नुसतेच राजकारणी नव्हते. त्यांना संगीताची आणि गाण्यांची खूप जाण होती. जेव्हा जेव्हा ते राज्य मंत्रिमंडळात असायचे तेव्हा मुंबईहून कोलकाता मेलने नागपूरच्या अधिवेशनाला सोबतच जायचे. नागपूरला जाण्यासाठी फर्स्ट क्लासच्या कुपेमधल्या प्रत्येकी दोन-दोन, अशा चार सीट्स त्यांनी आरक्षित केलेल्या असायच्या.

सुशील कुमार शिंदे सांगतात,

त्यावेळी प्रवासादरम्यान आमच्या गाण्यांवर गप्पा व्हायच्या. गझल, भावगीतांची विलासरावांना खूप आवड होती.

विशेषत: सुरेश भटांच्या गझला आणि कविता त्यांना तोंडपाठ असायच्या. सुशीलकुमार शिंदे ‘मोकळ्या केसात माझ्या..’ असे म्हटले की विलासराव ‘तू जीवाला गुंतवावे,’ अशी पुढची ओळ पूर्ण करायचे. अशी त्यावेळी गाडीत मजा चालायची.

प्रवासादरम्यानच्या गप्पांमध्ये अनेकवेळा अमका नेता विधानसभेत कसा बोलला आणि तमुक विधान परिषदेत कसा बोलला, यावर त्यांची थट्टामस्करी आणि टिंगलटवाळीच्या सुरात चर्चा व्हायची. साहित्य, कविता यांच्यावर भरपूर गप्पा व्हायच्या. कधी भा. रा. तांबेंची कविता, कधी वसंत बापटांची कविता. विशेषत: तारुण्यावरील मंगेश पाडगावकरांच्या कवितांची अधिक चर्चा व्हायची.

नागपूरचा मोहब्बतसिंग तुली हे या दोघांचे जवळचे मित्र. त्यांचे त्यावेळी ‘स्कायलार्क’ नावाचे हॉटेल होते. अनेकदा दोघांच्या मोहब्बतसिंगच्या हॉटेलात रात्री गाण्याच्या मैफिली आणि जेवणं व्हायची. स्थानिक साहित्यिकांशी मनसोक्त गप्पा रंगायच्या. तेव्हा उल्हास पवार, अंधारे, स्थानिक पत्रकार असायचे. रात्री उशिरापर्यंत गप्पांची मैफिल रंगलेली असायची. 

नागपुरातच नायडू नावाचा कार्यकर्ता होता. तो भंडाऱ्याहून त्यांच्यासाठी खेकडे आणायचा. विलासरावांना भंडाऱ्याचे मासे आणि खेकडे फार आवडायचे. ते खेकडे चवीने खायचे. रात्री जेवणासोबत राजकारण आणि राजकारणाबाहेरच्या विषयांवर पाच-सहा तास मनसोक्त गप्पा व्हायच्या.

मुख्यमंत्री शरद पवार यांच्या विरोधात त्या दोघांनी बंड केले, तेव्हापासून त्यांना ‘दो हंसों का जोडा’ म्हटले गेले.

अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकमेकांचे सदरे खेचण्याचे काम करायचे. सुशीलकुमार म्हणतात,

“कधी ते माझ्यावर टीका करीत, कधी मी त्यांच्यावर टीका करायचो. कधी आम्ही दोघे मिळून तिसऱ्याची खेचत असू. त्यामुळे हे दोघे ठरवून करतात, असे मंत्रिमंडळाच्या बैठकीतही म्हटले जायचे.”

वसंतदादा पाटील आणि शंकरराव चव्हाण यांनी विलासरावांमधील कुशाग्रता ओळखली होती आणि त्यांना पुढे आणण्यासाठी त्यांनी खूप संधी दिली. विलासरावांची आक्रमकता महाराष्ट्राच्या नेतृत्वासाठी त्यांना फार महत्त्वाची वाटत होती. दुसऱ्या फळीतील नेते तयार करताना त्यांनी विलासरावांना संधी दिली. नंतरच्या काळात विलासराव मुख्यमंत्री झाले आणि सुशीलकुमार शिंदे दिल्लीला गेले. त्यामुळे त्यांचा संबंध हळूहळू कमी होत गेला. पण जेव्हा जेव्हा भेटीचे प्रसंग आले तेव्हा दोघेही आवर्जून भेटायचे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकींच्या निमित्ताने ते एकत्र येत असत. या बैठकींमध्ये त्यांची दोघांचीही भाषणे व्हायची. प्रचारसभांनाही एकत्र जायचे.

२००३ साली अचानक विलासरावांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली आणि त्यांच्या जागी सुशीलकुमार शिंदे यांची वर्णी लागली. या सत्ताबदलामुळे दोघांच्यात वितुष्ट येईल असं बोललं गेलं पण तसं काही घडलं नाही.

सुशीलकुमार शिंदे हे सांगतात,

माझ्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपविल्यानंतरही आमचा कधी संपर्क तुटलेला नव्हता. मी विलासरावांपेक्षा ज्येष्ठ असलो तरी स्वतहून त्यांच्या घरी जायचो. नंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्याकडे येत होते. मी सोलापुरात नसताना ते दोन-तीनवेळा माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांना आमच्या कार्यकर्त्यांंच्या आग्रहावरून आले होते. माझ्याविषयी ते खूप चांगले बोलायचे. त्याचा एक वेगळा संदेश जायचा. यांची मैत्री कोणीही कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी ती तुटत नाही, अशा प्रकारचा संदेश त्यातून गेला. आमच्यातील संबंध असे होते.

सुशीलकुमार शिंदे यांच्या नंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विलासरावांची पुन्हा निवड झाली. सुशील कुमारांनीच त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि हसत हसत बाहेर आले तेव्हा जमलेल्या पत्रकारांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी त्यांचीच निवड झाली, असे वाटले. पण त्यांनी जेव्हा विलासरावांच्या नावाची घोषणा केली तेव्हा पत्रकारांना धक्काच बसला. अशी त्यांची मैत्री होती.

जेव्हा सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं तेव्हा त्यांची आंध्रप्रदेशच्या राज्यपाल पदी निवड झाली होती. विलासराव देशमुख देखील तेव्हा आपल्या मैत्रीला जागले. त्यांनी सुशील कुमार शिंदे यांना आंध्रप्रदेशला सोडण्यासाठी खास विमानाची व्यवस्था केली. मुख्यमंत्रीपद जाऊनहि त्यांचा उचित सन्मान केला.

आज विलासराव देशमुख हयात नाहीत. पण या दोघांच्या मैत्रीची दाखले राजकारणातच नाही राजकारणाच्या बाहेर देखील दिले जातात हे नक्की.

  हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.