सुशील कुमार शिंदे आणि यशवंतराव संपूर्ण प्रवासभर सुरेश भटांच्या गझला गात होते
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!
कुठेतरी मी उभाच होतो… कुठेतरी दैव नेत होते!वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?
शब्दसम्राट सुरेश भट. उर्दू मधली गझल ही संकल्पना त्यांनी मराठीमध्ये आणली. प्रेम कस करायचं हे सुरेश भटांच्या गझलांनी मराठी तरुणाईला शिकवलं. महाराष्ट्रातल्या कित्येक पिढ्या भटांच्या कवितांवर वाढल्या.
सुरेश भट फक्त प्रेमाच्या गोष्टी सांगायचे असं नाही तर त्यांच्या गझलेतून क्रांतीची आग देखील बरसायची. अनेकदा त्यांनी आपल्या कवितांमधून राजकीय एल्गार देखील केला. त्यांच्या या रोखठोक भूमिकेचं प्रतीक म्हणजे उषःकाल होता होता हे गीत. स्वातंत्र्याची जी स्वप्ने आपण पाहिली होती ते राज्यकर्त्यांच्या भ्रष्टाचारामुळे प्रत्यक्षात उतरू शकलं नाही हे त्यांनीच पहिल्यांदा मांडलं.
पण इतकं असूनही सुरेश भटांच्या फॅन फॉलोविंगमध्ये सर्वसामान्य लोकांबरोबर राजकीय व्यक्ती देखील असायच्या.
त्यातलंच एक प्रमुख उदाहरण म्हणजे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे.
सुशीलकुमार शिंदे सांगतात,
सुरेश भट यांच्या अनेक गझल आणि कवितांचा पहिला श्रोता होण्याचे भाग्य मला लाभले. अनेकदा मध्यरात्री दूरध्वनी करून ते मला त्यांच्या रचना ऐकवत. समजले नाही तर समजावून सांगत. त्यांच्या शब्दाशब्दांमध्ये सरस्वती होती. आम्ही कितीही मोठे मंत्री झालो तरी सुरेश भट यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मोठेपण आमच्यामध्ये कधीही येऊ शकलं नाही.
गोष्ट आहे सत्तरच्या दशकातली. एकदा सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार कराडला गेले होते. या दोघांनाही राजकारणात आणणाऱ्या यशवंतराव चव्हाणांची त्यांना कसल्या तरी संदर्भात भेट घ्यायची होती. भेट झाली आणि त्यानंतर ते तिघेही एका मोटारीतून कराडवरून पुण्याला यायला निघाले.
कारमध्ये पुढे सुशीलकुमार शिंदे बसले होते तर मागे यशवंतराव आणि शरद पवार बसले होते. प्रवासात त्या तिघांच्या चांगल्या गप्पा सुरु होत्या. यशवंतराव स्वतः साहित्यिक आणि रसिक स्वभावाचे होते. त्यामुळे बोलता बोलता कवितांचा विषय निघाला. सुशीलकुमार शिंदे आपल्या मित्राची म्हणजेच सुरेश भटांची कविता गुणगुणत होते. यशवंतराव म्हणाले,
काय गातोयस जरा मोठ्याने म्हण
सुशीलकुमार यांनी अगदी तालासुरात ती गझल गौण दाखवली. यशवंतराव खुश झाले. ते स्वतः सुरेश भटांचे फॅन होते. ते म्हणाले,
“मला भटांची याहूनही चांगली कविता माहिती आहे.”
यशवंतरावांनी फक्त त्या कवितेचं नाव सांगितलं नाही तर ती चक्क पाठ म्हणून दाखवली. इथून पुढच्या प्रवासात दोघांची अक्षरशः जुगलबंदी चालू होती. यशवंतराव चव्हाण आणि सुशील कुमार शिंदे एका पाठोपाठ एक सुरेश भटांची कविता गात होते आणि शरद पवार त्यांना दाद देत होते.
सुरेश भट आणि सुशीलकुमारांची मैत्री अखेर पर्यंत टिकली. सुशीलकुमार शिंदे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांचे विरोधक म्हणत होते कि शिंदे यांना जातीमुळे मुख्यमंत्रीपद मिळालं. सुशीलकुमार यांच्या सुखाला अशी कडवटतेची किनार होती. अशातच एकदा त्यांना त्यांच्या मित्राचं सुरेश भटांचं पत्र आलं. सुरेश भटांच ते पत्र वाचून सुशीलकुमार शिंदे यांच्या डोळ्यात पाणी तरळले. त्यात लिहिलं होतं ,
सांग मला दळणार्या जात्या जात नेमकी माझी
ज्यांचे झाले पीठ, आता ते दाणे कुठले होते?
हे पत्र किंवा त्यातील गीत कुठेच प्रकाशित झाले नाही पण आजही सुशीलकुमार शिंदे यांच्या मनात त्या ओळी कोरलेल्या आहेत.
हे ही वाच भिडू.
- पु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र,पुरोगामी की परंपरावादी?
- आणि स्मिता पाटील यांनी केलेली आपल्या मृत्यूची भविष्यवाणी खरी ठरली !
- प्रियदर्शन आणि राम गोपाल वर्मा या दोन दिग्दर्शकांची आवडती अभिनेत्री म्हणजे रसिका