सुशिलकुमारांना पहिला लाल दिवा आणि पहिला पोलिसाचा सॅल्यूट राजकारणामुळे मिळालं नव्हतं !

न्यायालयातील पट्टेवाला, फौजदार ते मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल ते देशाचा गृहमंत्री तथा लोकसभा नेता असा प्रवास करणारे सुशीलकुमार शिंदे. एका माणसाच्या आयुष्यात कोणकोणता संघर्ष असू शकतो आणि तो कित्येक पदावर आपला तितकाच हसतमुखं चेहरा ठेवून काम करु शकतो. 

आज सुशिलकुमार शिंदे यांचा वाढदिवस. या दिवशी त्यांचा असाच एक किस्सा, त्यांना मिळालेला पोलिसाचा पहिला सॅल्यूट आणि पहिली लाल दिव्याची गाडी ! 

आपल्या एका लेखात स्वत: सुशिलकुमार शिंदे यांनी पोलिसांनी दिलेल्या पहिल्या सॅल्युटचं वर्णन केलं आहे. त्यावेळी सुशिलकुमार शिंदे वसतिगृहात रहात होते. सुशिलकुमार शिंदे यांचा मित्र सुभाष विळेकर हा अचानकपणे त्यांना भेटायला. त्यानं सांगितलं की त्यानच सुशिलकुमार शिंदेंचा पोलिस सब इन्स्पेकटर पदाचा अर्ज भरला आहे. त्यावर सुशिलकुमार शिंदे अशी सही देखील त्यानेच केली आहे. सुशिलकुमार शिंदे यांनी मित्राचं म्हणणं ऐकलं आणि विषय सोडून दिला. त्याचं कारण म्हणजे त्यांना वकिल व्हायचं होतं. त्यामुळे मधल्या काळात ते आपण अशा कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे हे साफ विसरुन गेले  होते. 

अचानकपणे हॉस्टेलवर एक दिवशी पत्र आलं या पत्रात उल्लेख केला होता की ताबडतोब मुंबईला येणें. कारण काय होतं तर सुशिलकुमार शिंदे यांची पोलिस सबइन्स्पेक्टर पदासाठीची परिक्षा. पुढचा मागचां विचार न करता सुशिलकुमार शिंदेंनी थेट मुंबई गाठली. 

त्या काळात इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस या पदावर कार्यरत होते ते मजिदुल्ला साहेब. इमर्जन्सी सर्व्हीस असल्या कारणाने स्वत: मजिदुल्ला साहेब हे मुलाखती घेत असत. सुशिलकुमार शिंदेंना मुलाखतीसाठी आत बोलवण्यात आलं. एकामागून एक प्रश्न विचारण्यात आले. अचानक मजिदुल्ला साहेबांनी सुशिलकुमार शिंदेंना अर्थशास्त्रावरचा प्रश्न विचारला. त्यावर सुशिलकुमार शिंदे म्हणाले,

“मी राज्यशास्त्राचा विद्यार्था आहे, अस असताना तुम्ही मला अर्थशास्त्रावर का प्रश्न विचारता ?”

मजिदुल्ला साहेबांनी सुशिलकुमार शिंदेंचा उलटप्रश्न ऐकताच त्यांच्याकडे नजर रोखली. ते काहीच बोलले नाहीत. पुढचे प्रश्न झाले आणि सुशीलकुमार पुन्हा पुण्याला आले. खुद्द इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस पदावरच्या माणसाला त्यांनी प्रतिप्रश्न केल्यामुळे नोकरी मिळण्याची आशा त्यांनी सोडून दिली होती. 

सुशिलकुमार शिंदेनी पुन्हा स्वत:ला लॉ च्या अभ्यासक्रमात गुंतवून घेतलं. मुलाखतीनंतर पंधरा वीस दिवस निघून गेलेच होते. एक दिवशी डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्याचा एक शिपाई सुशिलकुमार शिंदे यांची खोली शोधत वसतिगृहात शिरलां. तेव्हा सुशिलकुमार शिंदे वसतिगृहाच्या कॅन्टिनमध्ये चहा पित बसले होते. एक मित्र पोलिस तुला शोधत आहेत अशी हाक देतच त्यांच्याजवळ आला. पोलिस कशासाठी म्हणून सुशिलकुमार तातडीने वसतिगृहाच्या खोलीकडे धावले. 

ते खोलीजवळ गेले तेव्हा पोलिसाने त्यांना विचारलं तुम्हीचं का सुशिलकुमार शिंदे. शिंदे हो म्हणताच, समोरच्या पोलिसाने त्यांना कडकडीत सॅल्युट ठोकला ! हा होता सुशिलकुमार शिंदे यांना मिळालेला पहिला सॅल्युट. त्या पोलिसाने त्यांच्या हातात तार ठेवली त्यावर लिहलं होतं आपली पोलिस सब इन्स्पेक्टर पदावर नियुक्ती करण्यात आली असून तातडिने मुंबईला येणे. 

आयुष्यात मिळालेली पहिली लाल दिव्याची गाडी. 

सुशिलकुमार शिंदे यांच्या आयुष्यात मिळालेली पहिली लाल दिव्याची गाडी देखील राजकारणामुळे आली नव्हती हे विशेष. त्याबद्दल ते सांगतात पोलिस सब इन्स्पेक्टर म्हणून नोकरीवर हजर झाल्यानंतर आमचे ट्रेनिंग सुरू झाले. एकूण ५२ विद्यार्थांचं सिलेक्शन करण्यात आलं होतं त्यापैकी १५ मुलांची नियुक्ती मुंबई सीआयडी विभागात करण्यात आली होती.  सीआयडी विभागातील विदेशी शाखेतील लोकांच्या संबधीत सुशिलकुमार शिंदे यांची निवड करण्यात आली. परदेशातून येणारे व्हिव्हिआयपी पाहूणे, राजकिय नेते यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. याच विशिष्ट पदामुळे त्यांना लाल दिव्याची गाडी देण्यात आली. सुशिलकुमार शिंदे यांची पहिली लाल दिव्याची गाडी ! 

त्यानंतर सुशिलकुमारांनी नोकरी सोडली. पुढे ते राजकारणात आले. राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि देशाचे गृहमंत्री झाले. पण त्यांनी आयुष्यात मिळालेला पहिला पोलिसांचा सॅल्युट आणि पहिली लाल दिव्याची गाडी कधीच विसरली नसेल हे हि नक्कीच !     

हे ही वाचा भिडू –  

Leave A Reply

Your email address will not be published.