शिक्षणासाठी 51 रु घेऊन घरातून निघून गेलेल्या सुषमा अंधारे आज सेनेच्या उपनेत्या आहेत…

शिवसेना आणि दसरा मेळावा…यात शिवसेनेच्या नेत्यांची भाषणं आपण ऐकत आलोत. यावेळेस दोन गट, दोन मंच, दोन व्यासपीठ आणि त्यावरील नेत्यांची भाषणं…अवघ्या महाराष्ट्रात चर्चेला गेलेल्या या मेळाव्यात शिवसेनेच्या इतर नेत्यांच्या भाषणंपेक्षा अगदी वेगळं भाषण ठरलं ते सुषमा अंधारे यांचं.

दसऱ्या मेळाव्यात खरंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भाषणांची उत्सुकता होती. पण त्याआधीच दोन्ही बाजूंच्या नेत्यांची जी भाषणं झाली त्यामध्ये सर्वात तडफदार भाषण झालं ते सुषमा अंधारे यांचं. अगदी महिन्याभऱ्यापूर्वी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे यांनी त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या पहिल्याच ‘राजकीय’ भाषणात अख्या महाराष्ट्राला त्यांची दखल घेण्यास भाग पाडलं.

९ ऑक्टोबरपासून चालू झालेल्या शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेत देखील सुषमा अंधारेच आघाडीवर आहेत.

कधीकाळी शिवसेनेवर आणि विशेषतः उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांनी ‘महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या घरातली बहीण आणि लेक होण्याचा प्रयत्न करेल,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधत त्यांनी शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेत प्रवेश केला.

याआधीही त्यांचं नाव त्यांच्या भाषणांमुळं गाजत होतं, विधानसभा निवडणूकीत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक होत्या, आता शिवसेनेनं त्यांच्यावर थेट उपनेतेपदाची जबाबदारी दिली आहे.

सुषमा अंधारे  कोण आहेत ? त्यांचा राजकीय प्रवास कसा होता? आणि त्यांच्या शिवसेना प्रवेशामागचं राजकारण काय ? हेच जाणून घेऊयात.

त्यांचं वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष बराच मोठा राहिलेला आहे. त्या मुळच्या लातूर जिल्ह्यातील मुरूडच्या. त्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९८४ रोजी झाला. लातूरमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्या भटक्या विमुक्त समाजातील आहेत, या समाजाची लोकसंख्याही कमी आणि मागास.

पहिल्याच प्रयत्नात मॅट्रिक पास झाली म्हणून घरच्यांनी सुषमा यांना ५१ रुपये बक्षिस म्हणून दिले होते. पुढचं शिक्षण घ्यायचं म्हणून त्यांनी बक्षिसाचे हेच ५१ रुपये घेऊन लातूरला पुढील शिक्षणासाठी पळून गेले असं त्यांनी स्वतः त्यांच्या मुलाखतीत सांगितलेलं.

लातूरच्या रुरल एज्यूकेशन फाऊंडेशनच्या शाळेत त्यांचं बारावीपर्यंतच शिक्षण, बसवेश्वर कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विषयातून एमएची पदवी, आणि त्यानंतर बीएडची पदवी मिळवली. 

शिक्षण घेत असतानाच त्यांनी बऱ्याच वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या आणि त्यातून मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेवरुन शिक्षणाचा खर्च भागवला. 

सोबतच आंबेडकरी चळवळीशी जोडल्या गेल्या, चळवळीतल्या सक्रिय कार्यकर्त्या असणाऱ्या सुषमा अंधारे यांनी २००९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर २०१८ मध्ये गणराज्य संघ नावाची संघटना स्थापन करत त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं.

महाराष्ट्रभर त्यांच्या आंबेडकरी चळवळ, संविधान या विषयक भाषणांची चर्चा होत असते. २०१९ मध्ये त्यांच्या गणराज्य संघ संघटनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतही अंधारे यांचं नाव होतं. महाविकास आघाडी सरकारलाही त्यांच्या संघटनेनं पाठिंबा दिला होता.

राजकीय वर्तुळात येण्याआधी त्यांनी राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून काम केलं. यशदा प्रशिक्षण संस्थेत अंधारे या समता सामाजिक न्याय विभागात उपसंचालक होत्या. वर्षभर त्या दैनिक लोकनायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्राच्या पुणे आवृत्तीच्या संपादक होत्या. तसंच भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या माध्यमातूनही त्या सक्रिय असतात.

राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक असताना सुषमा अंधारे यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवर परखड टीका केली.

कित्येक वेळा उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेखही केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या वरळीत लागलेल्या पोस्टरवर टीका करताना बाळासाहेब ठाकरेंचा संदर्भ देत, ‘बजाव पुंगी, भगाव लुंगी, केहनेवालो के पोतासाहब आदित्यजी अब लुंगी पेहेनके लुंगी डान्स कर रहे है,’ असं वक्तव्य केलं होतं.

तर ‘महाराष्ट्राचा सातबारा काही तुमच्या नावावर नाही’ असं त्या उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाल्या होत्या.

पण फक्त राजकीय व्यासपीठावरच नाही, तर सामाजिक व्यासपीठावरुन त्यांनी केलेली भाषणंही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असतात. दसरा मेळाव्याच्या स्टेजवरून गरजलेल्या सुषमा अंधारे यांची बहुजन समाजात असलेली लोकप्रियता शिवसेनेच्या मतपेटीत दिसणार का हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.