२५ वर्षांच्या सुषमांना मंत्रिपद मिळावं म्हणून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना धमकी दिली…
१९७७ साली आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये कॉंग्रेस पक्षाला जनतेनं सपशेल नाकारलं होतं. जनता पक्षाचा वारु चौफेर होता. जयप्रकाश नारायण यांच्या मार्गदर्शनात पक्षानं सत्ता देखील स्थापन केली. मोरारजी देसाई पहिले बिगर कॉंग्रेसी मुख्यमंत्री देखील झाले.
हाच परिणाम त्या दरम्यान झालेल्या अनेक राज्यांच्या विधान सभा निवडणूकांमध्ये देखील पहायला मिळाला होता. यात हरियाणाची विधानसभा देखील होती. त्यावेळी राज्यात जनता पक्षाचं नेतृत्व करत होते दिग्गज नेते चौधरी देवीलाल. निकाल लागल्यानंतर देवी लाल यांनी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलं जे आज तागायत हरियाणामध्ये कोणी तोडू शकलेलं नाही.
देवी लाल यांच्या नेतृत्वात जनता पक्षानं राज्यातील ९० पैकी तब्बल ७५ जागा जिंकत एकहाती विधानसभा काबीज केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री तेच होणार हे त्याचं वेळी फायनल झालं होतं.
त्याच विधानसभेत अंबाला कॅन्टमधून एक २५ वर्षाची युवती आमदार म्हणून पहिल्यांदाच निवडून आली होती. जॉर्ज फर्नांडिस यांच्या वकील पत्राच्या निमित्तानं त्या जनता पक्षाच्या संपर्कात आल्या होत्या आणि अल्पावधीतच पक्षात मोठ्या नेत्या बनल्या होत्या.
त्यांच नाव म्हणजे दिवंगत जेष्ठ नेत्या सुषमा स्वराज.
निवडून आल्यानंतर ज्यावेळी राज्यातील मंत्रिपदाची चर्चा चालू झाली तेव्हा दिल्लीतून सुषमा यांचं नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी फायनल करण्यात आलं. पण दुसऱ्या बाजूला भावी मुख्यमंत्री देवी लाल स्वतः सुषमांना मंत्री बनवू इच्छित नव्हते. राज्यात परतल्यानंतर तसं त्यांनी सुषमा स्वराज यांना स्पष्ट पण केलं आणि त्यानंतर ही मंत्री बनण्याची इच्छा असेल तर राज्यमंत्री पदाची शपथ घ्या, असं त्यांना सांगण्यात आलं.
मात्र त्यानंतर दोन दिवसातच देवी लाल यांच्या अशा वागण्यामुळे सुषमा स्वराज यांनी मधू लिमयेंसोबत दिल्ली गाठली आणि पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रशेखर यांच्या कानावर ही संपूर्ण गोष्ट घातली. सगळं ऐकल्यानंतर ते म्हणाले असं होऊच शकत नाही, जनता पक्षाच्या संसदीय बोर्डाचा सुषमांना कॅबिनेट मंत्री बनवण्याचा निर्णय झाला आहे.
त्यावर चंद्रशेखर यांनी तिथूनच देवी लाल यांना फोन फिरवला. भावी मुख्यमंत्री म्हणाले, सुषमा यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घ्यावी. चंद्रशेखर त्यावर उत्तरले, हा पक्षाच्या संसदीय बोर्डाचा निर्णय आहे, मी त्यावर सही केली आहे. त्याचा आदर आपण करायला हवा.
देवीलाल पुन्हा म्हणाले,
त्यांना मंत्री कसं बनवू? त्यांचं वय तरी बघा. २५ वर्षाच्या मुलीला कशी शपथ देऊ आणि ती देखील कॅबिनेटची.
मात्र जयप्रकाश नारायण, चंद्रशेखर, मधू लिमये अशा सगळ्यांच्या दबावापुढे इच्छा नसताना देखील देवी लाल यांना झुकाव लागलं आणि २५ व्या वर्षी सुषमा स्वराज हरियाणाच्या श्रमिक आणि रोजगार मंत्री बनल्या.
मात्र हा वाद इथेच संपला नव्हता.
तीन महिन्यातच सुषमा स्वराज आणि मधू लिमये पुन्हा चंद्रशेखर यांच्या भेटीला आले, आणि सांगितलं मुख्यमंत्री मला पदावरून हटवण्याच्या तयारीत आहेत, त्याआधी माझा राजीनामा घ्या नाहीतर अपमान झाल्याची वागणूक माझ्या वाट्याला येईल.
चंद्रशेखर ताडकन उठले आणि म्हणाले,
पक्षाला विचारल्या शिवाय मुख्यमंत्री हा निर्णय घेऊच कसा शकतात? पण तरी ही जर तुम्हाला संशय असेल तर मधू जवळ राजीनामा देऊन ठेवा.
सुषमा तिथून निघाल्यानंतर थोड्याच वेळेत बातमी आली कि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या एका मंत्र्याला फरिदाबादच्या मर्चंट चेंबर ऑफ काॅमर्सच्या सभेतून पदावरून हटवत असल्याची घोषणा केली आहे.
चंद्रशेखर स्वतः देवीलाल यांच्या या हेकेखोर वागण्यामुळे हैराण झाले होते. त्यांनी तात्काळ देवी लाल यांच्याशी संपर्क केला आणि बातमी खरी असल्याची खात्री केली. त्यावेळी देवी लाल यांनी होकार दर्शवत स्वराज कसल्याचं कामाच्या नाहीत, सातत्यानं माझ्यासाठी काही तरी अडचणी उभ्या करत असल्याची तक्रार केली.
पण चंद्रशेखर अजून ही आपल्या निर्णयावर ठाम होते. पलीकडून म्हणाले, त्यांना परत मंत्रीमंडळात घ्या असा माझा आदेश आहे. पण ऐकतील ते देवीलाल कसले. अजून यावर बरचं रामायण होणं बाकी होतं.
चंदशेखर आता रागाच्या स्वरात गेले होते. त्यांनी देवीलाल यांनी सरळ धमकीचं दिली.
चौधरी साहेब, जर तुम्ही स्वराज यांना परत घेतलं नाही तर तुम्ही मुख्यमंत्री पदावर राहू शकत नाही. पक्षाध्यक्ष या नात्यानं तुम्हाला पक्षातून काढून टाकण्याचा मला अधिकार आहे. १५ दिवसांचा नोटीस पिरियड असेल, त्या दरम्यान नव्या नेत्याची निवड करण्याचे आदेश देण्यात येतील, आणि तुमच्या विरोधातच एखादा माणूस उभा राहिलं.
चौधरी देवीलाल हे सगळं ऐकून तडक दिल्लीला आले, आणि तत्कालीन गृहमंत्री चरण सिंग यांची भेट घेतली. या धमकीबद्दल चरणसिंग आणि चंद्रशेखर यांच्यात चर्चा झाली. सगळं ऐकल्यानंतर चरणसिंग देवीलाल यांच्याकडे बघत म्हणाले,
आता मी धमकवायच्या आत सुषमांना परत घ्या.
अखेरीस नाइलाजाने देवीलाल यांना सुषमा स्वराज यांना पुन्हा सन्मानानं मंत्रिमंडळात घ्यावं लागलं. त्यावेळी चंद्रशेखर आणि मधू लिमये सुषमांच्या पाठीशी ठाम उभे राहिले नसते तर कदाचित त्याचं वेळी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात होण्या आधीच ब्रेक लागला असता.
हे ही वाच भिडू.
- हार्मोनियमवाला अब्बा सुषमा स्वराज आणि मुशर्रफ दोघांचा लाडका होता
- पंतप्रधान चंद्रशेखर यांच सरकार दारात उभारणाऱ्या दोन हवालदारांमुळे पडलं होतं.
- पोरांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून लिमयेंनी दोन पंतप्रधान घरी बसवले…