म्हणून इंग्रजांनी लंडनच्या टेकडीवर ‘सुवर्णदुर्ग’ बांधला !

द. लंडनमधील ग्रीनविच येथील शुटर टेकडीवर सेव्हेर्णद्रुग नावाचा किल्ला आहे. एप्रिल १७८४ मध्ये सर विल्यम जेम्स यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या पत्नीने हे स्मृतीस्थळ उभारले होते. लंडनच्या उपनगरात असलेल्या या किल्ल्याला महाराष्ट्रातील सुवर्णदुर्ग नावाच्या किल्ल्यावरून सेव्हेर्णद्रुर्ग असं नांव देण्यात आलं.

सुवर्णदुर्ग आणि सेव्हेर्णद्रुग यांच्यात नेमकं साम्य काय…?

महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर हर्णेच्या बंदराजवळ असणारा सुवर्णदुर्ग हा किल्ला आदिलशहाने बांधला होता. १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेत मराठा साम्राज्याला जोडला. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात सातारच्या छत्रपती शाहू महाराजांनी हा किल्ला आंग्रे घराण्याला बहाल केला. याच किल्ल्याच्या बळावर कान्होजी आंग्रे यांनी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आपले वर्चस्व मिळवले आणि हा प्रदेश मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली आणला.

तोपर्यंत ब्रिटिशांनी संपूर्ण भारतात आपले पाय पसरायला सुरुवात केली होती मात्र कोकण परिसरात आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यात त्यांना कान्होजी आंग्रे यांचा मोठा अडसर निर्माण होत होता. त्यामुळे ब्रिटीशांचा कान्होजी आंग्रे यांच्यावर राग होता.

आणि ते कायमच कान्होजींचा उल्लेख ‘समुद्री डाकू’ असा करत असत तर सुवर्णदुर्गाला ‘डाकूंचा बालेकिल्ला’ म्हणून संबोधत असत. १७२९ साली कान्होजींचा मृत्यू झाला आणि किल्ल्याची मालकी त्यांचा मुलगा तुळाजी यांच्याकडे आली. तुळाजी आणि पेशवे यांच्यात काही कारणांवरून वाद होते, याच वादाचा फायदा घेऊन पेशव्यांच्या मदतीने सुवर्णदुर्ग जिंकला जाऊ शकतो अशी शक्यता ब्रिटिशांना दिसली.

ब्रिटिशांनी २५ मार्च १७५५ रोजी सर विल्यम जोन्स यांच्या नेतृत्वाखाली पेशव्यांच्या मदतीने संयुक्तरीत्या सुवर्णदुर्गावर स्वारी केली आणि १२ एप्रिल १७५५ रोजी हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात आला.

किल्ल्याचा ताबा ब्रिटिशांनी पेशव्यांकडे दिला. ईस्ट इंडिया कंपनीत ‘व्यापारी जहाज संरक्षक दला’चे प्रमुख असणाऱ्या सर विल्यम जोन्स यांच्यासाठी सुवर्णदुर्ग जिंकणं ही मोठी कामगिरी होती.

त्यामुळेच १७५९ साली जेव्हा ते इंग्लंडला परतले तोपर्यंत ते मोठे धनिक झाले होते. पुढे ते ईस्ट इंडिया कंपनीचे संचालक देखील झाले. पुढे ब्रिटीश संसदेचे खासदार म्हणून निवडूनआले. डिसेंबर १९८३ साली आपल्या मुलीच्या लग्नसमारंभात असतानाच जेम्स यांना हार्ट-अॅटॅकचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.

सर विल्यम जेम्स यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लंडन उपनगरातील ग्रीनविच येथील शुटर टेकडीवर एका स्मारकाची निर्मिती केली.

या स्मारकाला त्यांनी जेम्स यांनी सुवर्णदुर्ग जिंकताना दाखवलेल्या शौर्याच्या आठवणीत ‘सेव्हेर्णद्रुग’ असं नांव दिलं. ‘सुवर्णदुर्ग’ या शब्दाचा ब्रिटिशांनी केलेला अपभ्रंश म्हणजे ‘सेव्हेर्णद्रुग’. पुढची साधारणतः १५० वर्षे म्हणजेच १९२२ पर्यंत लंडन पालिकेने विकत घेईपर्यंत हा किल्ला जेम्स यांच्या नातेवाइकांच्याच ताब्यात होता.

२००३ साली हा किल्ला खासगी व्यावसायिकांना भाड्याने देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता परंतु या निर्णयाला तेथील स्थानिक लोकांनी कडाडून विरोध केला. फक्त विरोध करूनच ते थांबले नाहीत तर हा किल्ला खासगी व्यावसायिकांच्या घशात जाण्यापासून वाचविण्यासाठी त्यांनी ‘सेव्हेर्णद्रुग किल्ला संरक्षक ट्रस्ट’ची स्थापना करून सरकारला आपला निर्णय मागे घ्यायला भाग पाडलं.

त्यांच्या प्रयत्नामुळेच लंडनमधील या महाराष्ट्रीयन ‘सुवर्णदुर्गा’च्या समृद्ध वारशाचं संरक्षण होऊ शकलं.

हे ही वाचा –  

Leave A Reply

Your email address will not be published.