‘गल्लीत गोंधळ’ची फॉरेनर आता सोनिया गांधींच्या भूमिकेत..!!!

“द अँक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर- द मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग” हे संजय बारू लिखित पुस्तक २०१४ सालच्या एप्रिल महिन्यात प्रकाशित झालं होतं. ‘पेंग्विन’ प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात देशाचं पंतप्रधानपद भूषविलेल्या मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर असणारं हे पुस्तक याच काळात त्यांचे माध्यम सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या संजय बारू यांनी लिहिलं होतं.

१० वर्षे पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार म्हणून काम केलेल्या व्यक्तीने पुस्तक लिहिलेलं असल्याने  राजकीय वर्तुळात हे पुस्तक खूप चर्चिलं गेलं होतं आणि वादग्रस्त देखील ठरलं होतं. याच पुस्तकावर आधारित “द अँक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर” नावाचा सिनेमा येत असल्याची कल्पना आपल्याला असेलच.

चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे मनमोहन सिंग यांची भूमिका करताहेत आणि हळूहळू त्यांच्या व्यतिरिक्त चित्रपटातील इतर महत्वाच्या पात्रांच्या भूमिकेत कोण असणार याची माहिती मुख्य भूमिकेत असणाऱ्या अनुपम खेर यांनी दिली आहे. हीच माहिती  खास ‘बोल भिडू’च्या वाचकांसाठी…

सोनिया गांधी- सुजैन बर्नर्ट

सोनिया गांधी आणि पडद्यावरील सोनिया गांधी सुजैन बर्नर्ट

सोनिया गांधी आणि पडद्यावरील सोनिया गांधी सुजैन बर्नर्ट

चित्रपटात सोनिया गांधी यांची भूमिका महत्वपूर्ण असून या भूमिकेत सुजैन बर्नर्ट ही जर्मन अभिनेत्री असणार आहे. सुजैन बर्नर्ट हीने यापूर्वी एबीपी न्यूज वृत्तवाहिनीच्या ‘प्रधानमंत्री’ या सिरीजमध्ये सोनिया गांधींची भूमिका साकारलेली आहे. सुजैन बर्नर्ट ही जर्मन अभिनेत्री असली तरी भारतात छोट्या आणि मोठ्या पडद्यावर तीने अनेकवेळा काम केलंय.

२००९ साली अखिल मिश्रा या भारतीय अभिनेत्यासोबत विवाहबद्ध झालेल्या सुजैन बर्नर्ट हीला फ्रेंचसह इंगजी, जर्मन, स्पॅनिश, इटालियन, हिंदी, मराठी आणि बंगाली या भाषा बोलता येतात. बंगाली आणि मराठीमध्ये तीने काम देखील केलेलं आहे. “गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा” या सुपरहिट मराठी चित्रपटातील ‘सरकार एवढं जरा तुम्ही मन लाऊन करा’ या लावणीवर ती थिरकलेली आहे. ई टीव्ही मराठी वाहिनीवरील ‘कालाय तस्मै नमः’ या मालिकेत देखील ती जेनीच्या भूमिकेत होती. २००७ सालच्या ‘हनिमून ट्रवेल्स प्रायव्हेट लिमिटेड’ या चित्रपटात देखील तीने काम केलेलं आहे.

प्रियांका आणि राहुल गांधी- अर्जुन माथुर आणि अहाना कुमरा

twitter

 

‘बंटी और बबली’ ‘रंग दे बसंती’ ‘मंगल पांडे-द रायझिंग’ यांसारख्या सिनेमांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलेला अर्जुन माथुर हा चित्रपटात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भूमिकेत असणार आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बेगम जान’ चित्रपटात त्याने काम केलेलं आहे, याशिवाय ‘माय नेम इज खान’ मध्ये देखील त्याची भूमिका होती.

गेल्या वर्षीच्या बहुचर्चित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या अहाना कुमरा या अभिनेत्रीने या चित्रपटात प्रियांका गांधी यांची भूमिका केलीये. अहाना कुमरा हीने यापूर्वी सोनी टीव्हीवरील ‘युद्ध’ या सिरीजमध्ये अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका केली होती. या भूमिकेसाठी तिचं विशेष कौतुक झालं होतं.

अटल बिहारी वाजपेयी- राम अवतार भारद्वाज.

twitter

माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत राम अवतार भारद्वाज हे अभिनेते असणार आहेत. यापूर्वी छोट्या किंवा मोठ्या पडद्याचा त्यांना अनुभव नाही. याच चित्रपटातून ते मोठ्या पडद्यावर पदार्पण करताहेत.

संजय बारू- अक्षय खन्ना. 

twitter

संजय बारू यांच्या भूमिकेतील अक्षय खन्ना

पुस्तकाचे लेखक आणि मनमोहन सिंग यांचे मध्यम सल्लागार संजय बारू यांची देखील भूमिका या चित्रपटात असणार आहे. अक्षय खन्ना या महत्वपूर्ण भूमिकेत आपणास दिसेल.

गुरशरण कौर- दिव्या शेठ.

twitter

मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर यांच्या भूमिकेत दिव्या शेठ या असणार आहेत. ‘जब वी मेट’ ‘दिल धडकने दो’ ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात दिव्या यांनी काम केलेलं आहे. दूरदर्शनवरील ‘हम लोग’ झी टीव्हीवरील ‘बनेगी अपनी बात’ यांसारख्या मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे.

विजय रत्नाकर गुट्टे हे “द अँक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर” दिग्दर्शित करत असून यावर्षीच्या शेवटी चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.