माणसाच्या पूर्वजांचे जीनोम शोधणाऱ्या स्वांते पालो यांना वैद्यकशास्त्रातला नोबेल जाहीर झालाय
संशोधन क्षेत्रात दिला जाणाऱ्या जगातील सगळ्यात मोठ्या नोबेल पुरस्काराच्या नावांची घोषणा सुरु झालीय. २०२२ च्या पुरस्कारांचा नारळ स्वीडनचे जनुकशास्त्रज्ञ स्वांते पालो यांच्यापासून फोडण्यात आलाय.
जनुकशास्त्रज्ञ म्हटल्यावर विज्ञानाच्या किचकट गोष्टींनी अनेकांचं डोकं भंजाळून जातं. मात्र पुरस्काराच्या घोषणेत पहिला नारळ यांच्या नावापासून फुटला म्हणजे भिडूनं जबरी काहीतरी शोधलंय हे तर नक्की….
तर भिडूंनो स्वांते पालो हे नाव एकदा गुगलवर सर्च करून त्यांचे काही फोटू बघा. एका फोटोत पालो यांच्या हातात माणसाची कवटी आहे आणि दोघेही एकमेकांकडे बघून हसत आहेत. दुसऱ्या एका फोटुत अख्या मानवी सापळ्यांच्या डोक्यावर हात ठेऊन उभे आहेत.
आणखी एका फोटुत पालो चक्क मानवी सापळ्यांच्या खांद्यावर जणू मित्रासारखे हात ठेऊन उभे आहेत. तर एका फोटुत मानवी सापळा चक्क संशोधकांसोबत स्माईलची पोज देऊन फोटो काढतोय.
आता माणसाचा सापळा म्हटलं की भल्या भल्यांना कापरं सुटतं, अंगाला घाम येतो मग हा भिडू सापळ्याबरोबर फोटो का काढतो.
पण भिडूंनो डोकं खाजवू नका आणि सगळा किस्सा सोप्या शब्दात सुरुवातीपासून समजून घ्या.
तर स्वांते पालो हे स्वीडन या देशात राहणारे जनुकशास्त्रज्ञ आहेत, मात्र यांनी माणसांच्या जनुकांऐवजी आदिमानवाच्या हाडांवर संशोधन करून त्याचा जीनोम (जनुक) शोधून काढलाय. यांनी पोलिओजिनेटिक्सची स्थापना करून प्राचीन आदिमानवाच्या सांगाड्यांवर संशोधन करायला सुरुवात केली आणि त्यामध्ये युरोपमधील निएंडरथल आणि आशिया खंडातील डेनिसोवा या दोन आदिमानवाच्याजनुकांवर संशोधन केलंय.
यातीलच निएंडरथलच्या जनुकांवर केलेल्या संशोधनासाठी त्यांना या वर्षीचा नोबेल पुरस्कार देण्यात येत आहे.
त्यांनी सर्वप्रथम नेदरलँडमधील निएंडरथल व्हॅलीत फेलहॉपर ग्रोटो मध्ये सापडलेल्या नमुन्यावर संशोधन केलं आणि १९९७ मध्ये निएंडरथल माइटोकॉन्ड्रियल डीएनए सापडला असल्याचा दावा केला. त्यानंतर त्यांनी यावर आणखी संशोधन केलं आणि निएंडरथलचं जीनोम पुन्हा निर्माण केलं जाऊ शकतो याचा दावा केला होता.
त्यांच्या या संशोधनामुळे टाइम्स मॅगझिनने जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्वांते पालो यांच्या नावाचा समावेश केला होता.
फरवरी २००९ मध्ये अमेरिकन असोसिएशन फॉर द एडवांसमेंट ऑफ साइंसने वार्षिक सभेत मॅक्स प्लॅंक इंस्टीट्यूट फॉर इव्योल्यूशनरी अँथ्रोपोलॉजीने निएंडरथलच्या पहिल्या जीनोमचं पहिल्या ड्राफ्ट व्हर्जनला तयार केल्याची माहिती दिली. ४५४ लाईफ सायन्सच्या कॉर्पोरेशनच्या मदतीने पूर्ण झालेलय या प्रोजेक्टमुळे आधुनिक मानव कसा विकसित होत गेला याची माहिती उलगडणार आहे.
२०१० मध्ये पालो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सायबेरियाच्या डेनिसोवा गुहेत सापडलेल्या बोटांच्या हाडावर संशोधन केलं आणि त्याच्या डीएनएचा रिपोर्ट सादर केला. हे बोटाचे हाड एका अज्ञात आणि विलुप्त झालेल्या मानव प्रजातीची आहे याचा उलगडा झाला. मे २०१० मध्ये पालो यांच्या रिसर्च टीमने संशोधनानंतर असं निष्कर्ष काढलं की, युरोपमधील निएंडथल आणि युरेशियन मानवामध्ये मिश्र पद्धतीने प्रजनन होत होते.
सापडलेल्या पुराव्यांवरून त्यांच्या या सिद्धांताला संशोधकांकडून मान्यता मिळत आहे. मात्र काही पुराणमतवादी संशोधकांनी या सिद्धांताला नाकारलंय.
दोन्ही मानवांच्या मिश्रणातून जन्माला आलेल्या या आधुनिक मानवाचा कालखंड अंदाजे ५० ते ६० हजार वर्षांपूर्वीचा आहे. तसेच या मिश्र प्रजननाची सुरुवात दक्षिण युरोपमध्ये झाली होती असा त्यांचा दावा आहे. तसेच आफ्रिकेतील होमो सेपियनसोबत सुद्धा निएंडरथलचे संबंध असू शकतात असा त्यांनी दावा केलाय. पण कालानुरूप हाडांवरील जीनोम नष्ट होत झाल्यामुळे आफ्रिकेतील मानवाबरोबर असलेले संबंध अजूनही पूर्णपणे उलगडलेले नाहीय.
पालो यांनी २०२० मध्ये युरोपियन निएंडरथलशी निगडित असलेल्या क्रोमोझोमच्या ३ ऱ्या भागात झालेल्या कोरोना संक्रमणावर संशोधन केलं होतं. या संशोधनानुसार युरोपियन वंशाच्या लोकांना कोरोनाचा धोका अधिक आहे असं त्यांनी सांगितलं होतं.
इपीएएस १ या गुणधर्माचा फायदा लोकांना उंच आणि थंड भागात जीवन फायदेशीर ठरतो. हा गुणधर्म तिबेटी लोकांमध्ये सामान्यपणे सापडतो. त्याचप्रमाणे जगातील विविध भागातील लोकांमध्ये असलेल्या गुणधर्मांचा आणि त्यांच्या सभोवतालच्या वातावरणानुसार त्यात काय बदल झालाय,माणसाच्या वेगवेगळ्या गटांचा वांशिक आणि काळानुरूप होत गेलेला विकास कसा झालाय. यावरच्या अनेक प्रश्नांची उत्तरं पालो यांच्या या संशोधनामुळे उत्तर सापडू शकतात.
तसेच साथीच्या रोगांचा मानवाच्या विकासात कोणत्या प्रकारचा प्रभाव झाला. तसेच कोणकोणत्या रोगांशी लढण्याचे गुणसूत्र माणसामध्ये विकसित झालेले आहेत. याबद्दलची उत्तरं सुद्धा पालो यांच्या संशोधनातून कळू शकतात.
त्यांच्या या संशोधनासाठी आजपर्यंत युरोप आणि अमेरिकेतील नामांकित पुरस्कार देण्यात आलेले आहेत. पालो यांचं संशोधन भविष्यात होऊ घातलेल्या अनेक संशोधनांना मार्गदर्शक आहे. म्हणूनच त्याच्या जनुकशास्त्रातील संशोधनाची दखल घेऊन त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर केला आहे.
हे ही वाच भिडू
- नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या ग्रॅबियल यांनी इंदिरा गांधींच्या नावावरून आपल्या मुलीचं नाव ठेवलेलं
- टिळकांनी लिहलेल्या मसुद्याच्या आधार घेऊनच वुड्रो विल्सन यांनी शांततेचे नोबेल मिळविलं
- हरगोविंद खुराना : झाडाखालच्या शिक्षणापासून ते नोबेलपर्यन्त मजल मारणारे जेनेटिक इंजिनियर