सावरकरांनी घेतलेलं त्याला इच्छामरण नाही, तर प्रायोपवेशन म्हणतात

इच्छा मरण हा विषय काही नवा नाही. यावर अनेकदा चर्चा झाली आहे. आजही इच्छामरण घेता येऊ शकते असे म्हटले, तर कदाचित कुणाला खरं वाटणार नाही. त्यासाठी आता सुसाईड मशीन सुद्धा बाजारात आल्यात.

स्वित्झर्लंडने या सुसाईड मशीनला कायदेशीर मान्यता दिली आहे. हे यंत्र अवघ्या काही मिनिटांत आत्महत्येची प्रक्रिया पूर्ण करते. यानंतर जगभरात या मशीनची चर्चा सुरू झाली आहे.

पण आपल्या भारत देशाला एक संस्कृती आहे. इच्छामरणचा इतिहास पूर्वीपासूनचं दिसतो.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा अशाच प्रकारच प्रयोपवेशन घेतलं होतं.

त्यासंबंधी त्यांनी निकटवर्तियांशी केलेली चर्चा दुर्गेश जयवंत परुळकर यांनी लिहून ठेवली आहे.

सावरकरांनी कुमारवयातच देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सशस्त्रक्रांती करण्याची शपथ घेतली आणि ती शेवटपर्यंत पाळली. त्यांना हौतात्म्याची ओढ होती. त्यामुळे त्यांना कधी मृत्यूचे भय वाटलंच नाही.

२८ मे १९६३ या दिवशी त्यांचा ८० वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्याच्या दुसर्‍या दिवशी ते घरात पाय घसरून पडले. त्यांच्या मांडीच्या हाडाला चीर पडली. संध्याकाळी त्यांना रुग्णालयात नेले. तेव्हा त्यांनी सहजतेने त्यांच्या स्वीय सचिवांकडे उद्गार काढले,

तुम्ही काल साजरी केलीत माझी जन्मतिथी आणि आता जातो आहे पुण्यतिथीकडे.

त्यांचे शरीर त्यांना साथ देत नव्हतं. प्रकृतीही क्षीण झाली होती. ती सुधारणार नसल्याने त्यांच्यासारख्या ज्ञानी, विरक्त योग्याला आपल्या हातून आता कोणतेही कार्य घडणार नाही, तर जिवंत रहाणे योग्य नाही, असे वाटू लागले.

असंच एक दिवस सावरकरांनी त्यांचे स्वीय सचिव बाळाराव सावरकर यांना समुद्राच्या भरतीच्या वेळी फिरायला जायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली. भरती कुठं चांगली येते हे ही विचारलं.

२ आठवड्यांनी सावरकरांनी टॅक्सी मागवली. वरळीला गेल्यावर तटाजवळ फारसे पाणी नव्हत ते पाहून सावरकर काही वेळातच घरी परतले. नंतर त्यांनी नरीमन टोकाशी जाण्याची इच्छा व्यक्त केली. तो भाग त्यांना आवडला. तिथ फारशी गर्दी नव्हती. बाळाराव सावरकरांना आपल्या जवळ बोलावून ते म्हणाले,

वैष्णवाचार्य गौरांग प्रभूंनी जगन्नाथपुरीच्या शामल सागरात हे कृष्ण हे शाम असा नामघोष करत प्रवेश करून जलसमाधी घेतली.

हे ऐकून बाळारावांना सावरकरांच्या मनात कोणते विचार आहेत याचा अंदाज आला. त्यांनी तात्यांना घरी आणले.

काही दिवसांनंतर सावरकर बाळारावांना म्हणाले, बाळ ! ज्ञानेश्‍वरांना समाधी घेण्यास त्यांच्या बंधूंनी साहाय्य केले. जैन लोकांमध्ये उपोषण करून जीवनसमाधीची पद्धत आहे. मला आता आत्मार्पण करायचे आहे. तू साहाय्य देशील कि नाही, ते सांग. तू नाही म्हटलेस, तरी मला राग नाही, कारण ते अगदी स्वाभाविक आहे. साहाय्य दिलेस, तर तुझ्यावर काही आळ येणार नाही, इतकी व्यवस्था मी करीन. सर्व काही व्यवस्थित लिहून ठेवीन. आत्महत्या आणि आत्मार्पण या माझ्या लेखामुळे मी आत्मार्पण करणार, हेही लोकांना ठाऊक आहे. तेव्हा तू मला ८ दिवसांनी विचारपूर्वक सांग.

आठ दिवसांनी बाळारावांना सावरकरांनी विचारलं, बाळ ! तुझे काय ठरले ? बाळाराव म्हणाले, होय. मी तुम्हाला साहाय्य देईन, पण तुम्ही म्हणता, त्याप्रमाणे माझ्यावर तुमच्या हत्येचा आरोप येणार नाही, हे मला पटत नाही. आपल्या भेटीसाठी आलेल्या लोकांना अडवणारा मीच आहे. अशा अनेकांचा माझ्यावर राग आहे. ते सगळे मला तुमचा हत्यारा म्हणून पहातील आणि बोट दाखवतील. हा धोका गृहित धरूनही मी आपणास तुम्ही म्हणाल, तेव्हा जलसमाधीला किंवा आत्मार्पणाला साहाय्य करीन.

आत्मार्पणाच्या मार्गाविषयी अनेकांना पटवून देण्याचा प्रयत्न करणे बाळारावांची ही बाजू सावरकरांना पटली. जलसमाधीचा मार्ग यशस्वी होणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं.

त्यांनी तो मार्ग अनुसरण्याचा विचार सोडून दिला. सावरकरांनी त्यांचे डॉ. रा.वा. साठे यांच्या मनावर आपण आत्मार्पण करणे कसे योग्य आहे, हे ठसवण्याचा प्रयत्न केला.

पुढे सावरकरांनी लेख लिहून मी आत्मसमर्पणाच्या मार्गाने जाणार आहे असे अप्रत्यक्षरित्या सुचवले. त्याविषयी विचारताच त्यांनी या लेखात मी माझ्यासंबंधी काहीही लिहिलेले नाही, असे उत्तर दिले. पण सावरकरांनी आपणही त्याच मार्गाने जाणार आहोत, हे मनाशी निश्‍चित केले होते.

त्यांनी आपले मृत्यूपत्र लिहिले. त्यांच्या सर्व वाङ्मयाचे अधिकार स्वीय सचिव बाळाराव सावरकर यांना दिले. त्यांचे चरित्र लिहिण्यासाठी बाळारावांना उपयुक्त पडणारी सर्व सामग्री दिली. वृत्तपत्र वाचन आणि कात्रणे काढण्याचे काम चालूच ठेवले.

जानेवारी १९६६ च्या शेवटी सावरकरांनी जेवणखाण बंद केले. डॉक्टरांनी सावरकरांच्या नकळत त्यांना होमिओपॅथिक औषध दिले. त्यांना तेही जाणवले. सावरकरांची आतडी क्षीण झाली होती. पचनक्रिया बिघडली होती. पण पंचज्ञानेंद्रिये पूर्वीइतकीच तीक्ष्ण होती. अन्नत्याग करून ५-६ दिवस झाले.

याच काळात सावरकरांचा रक्तदाब अल्प झाला होता. २-४ वेळा तो पडताळला, तरी तेच मेजरमेंट. डॉक्टरांनी त्यांना औषध दिले आणि रात्रीची वेळ म्हणून घरी गेले. सकाळी लवकर परत येऊन रक्तदाब तपासला. तो प्रमाणात होता. त्यांच्या उपवासाला १७-१८ दिवस झाले. त्यांनी आपल्या स्वीय सचिवांना बोलावून घेतले आणि हात जोडून नमस्कार करत म्हणाले, आम्ही जातो आमच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा ।

आता कैचे देणे घेणे, आता संपले बोलणे, हेच सावरकरांचे शेवटचे शब्द. त्यानंतर सावरकरांनी बाळारावांनाही कधी बोलावले नाही. कोणाशीही त्यांचा संवाद झाला नाही किंवा भेटही झाली नाही. २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी सकाळी ११ वाजता त्यांनी जीवनयात्रा संपवली.

त्यांच्या त्या आत्मार्पणास प्रा. शिवाजीराव भोसले यांनी वैज्ञानिक समाधी असे संबोधले.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.