पुण्याला शिक्षणाच्या क्षेत्रात जगाच्या नकाशावर नेण्याची कल्पना म्हणजे सिम्बॉयसिस

सिम्बॉयसिस विद्यापीठ म्हणजे देश-विदेशांतल्या लोकांचं मोठं आकर्षण. ४८ वेगवेगळ्या संस्था आणि कॉलेजे असणारी ही संस्था भारतात गेल्या ५० वर्षांपासून आपला लौकिक जपून आहे. ३४,००० भारतीय आणि विदेशी विद्यार्थांना ऍडमिशन देणारी ही संस्था भारत आणि त्यातही महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा मानबिंदू आहे.

या सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या मागे एक मराठी कुटुंब आहे. त्यांची यशोगाथा ही कुणालाही प्रेरित करील अशीच आहे.

शांताराम बळवंत मुजुमदार हे या संस्थेचे सर्वेसर्वा आहेत. त्यांची पत्नी संजीवनी मुजुमदार यांच्यासोबत मिळून दोघांनी या संस्थेची पायाभरणी केली आहे. एका कॉलेजातील एक सामान्य प्रोफेसर इतक्या मोठ्या संस्थेची उभारणी करू शकला त्यामागे या दांपत्याच्या प्रचंड कष्टाचा इतिहास आहे.

सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या आवारात असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल आणि म्यूजियमच्या डिरेक्टर म्हणून काम पाहणाऱ्या संजीवनी मुजुमदार या सिम्बॉयसिसच्या भवितव्याच्या निर्णय घेण्यात महत्त्वाचा वाटा बजावतात.

आपल्या ५७ वर्षांच्या संसारात त्यांनी अनेक प्रसंग झेलले. सिम्बॉयसिस संस्था मोठी झाली यात दोघांचं योगदान आहे.

पण त्यांचं लग्न टिकू शकलं याचं ९० % श्रेय माझ्या पत्नीचं आहे असं मुजुमदार सांगतात.

स्वतः शिक्षणात पारंगत असूनही संजीवनी मुजुमदार यांनी आपलं शिक्षण सिम्बॉयसिसच्या उभारणीत मागे ठेवलं. कुटुंबाकडे लक्ष देताना त्यांना आपली PhD पूर्ण करता आली नाही. 

मुजुमदार हे आधी फर्ग्युसन कॉलेजात बॉटनी विषयाचे एचओडी होते. कॉलेजच्या राजकारणात त्यांचा वावर होता. तेव्हा सिम्बॉयसिस सुरु करण्याच्या ते विचारात होते. यावेळी संजीवनी मुजुमदार यांना दररोज जवळजवळ रोज ५० कप चहा बनवायला लागायचा अशी आठवण ते सांगतात.

शांताराम बळवंत मुजुमदार यांचा जन्म ३१ जुलै १९३५ चा, कोल्हापूरमधील गडहिंग्लज तालुक्यातील एका सामान्य घरी त्यांचा जन्म झाला.

गडहिंग्लज मध्येच त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. राजाराम कॉलेजातून काही काळ शिकल्यानंतर त्यांनी पुढच्या शिक्षणासाठी पुणे गाठलं. वनस्पतीशास्त्र विषयात त्यांनी पुणे विद्यापीठातून एम. एस्सी. चं शिक्षण घेतलं. यावेळी ते फर्स्ट क्लास फर्स्ट येऊन चर्चेचा विषय ठरले होते. लगेचच पुणे विद्यापीठातून सूक्ष्मजीवशास्त्रात पीएचडी घेऊन त्यांनी फर्ग्युसन कॉलेजात शिकवायला सुरुवात केली. तेथे त्यांना अनेक विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून आल्या.

यासारखीच कथा होती संजीवनी मुजुमदार यांची. रयत संस्थेत शिक्षण झाल्यामुळे त्यांच्यावर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा मोठा प्रभाव होता. कोल्हापुरातील त्यांच्या घरातील  आणि आजूबाजूचे लोक भाऊरावांच्या जवळचे होते. त्यांचे वडील स्वतः साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक होते. त्यामुळे त्यांचे बहुतेक बालपण साताऱ्यात गेले.

त्यामुळे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा त्यांच्या वडिलांशी मोठा स्नेह होता.

कर्मवीर भाऊराव पाटीलहे कधीकधी दोनदोन महिनेही त्यांच्या घरी मुक्कामी असत. त्यामुळे त्यांच्या मनावरील जात आणि धर्माचा पगडा कमी झाला.

जात काय असते हे त्यांना लहानपणी माहीतच नव्हते. 

१९५८ मध्ये भाऊराव पाटलांनी साताऱ्यात सायन्स कॉलेज सुरु केलं होतं. संजीवनी तेथेच शिकायला होत्या. ती त्या कॉलेजची पहिलीच बॅच होती. त्यांनी जीवशास्त्र हा विषय शिकण्यासाठी निवडला होता.

त्याच कॉलेजात शांताराम मुजुमदार हे शिक्षक म्हणून रुजू झाले. या वेळी संजीवनी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकत होत्या. कॉलेजात मुजुमदार सरांच्या नावाची ख्याती होती. प्रचंड अभ्यास करणारा माणूस आणि तितकाच चांगला शिक्षक म्हणून मुजुमदार कॉलेजात प्रसिद्ध होते.

फक्त १०-१२ विद्यार्थी वर्गात असल्यानं मुजुमदार यांनी विद्यार्थ्यंना महाबळेश्वरला नेले. सहलीसाठी यायचे म्हणून सगळेच लोक तिथं आले. पण संध्याकाळी निघताना मुजुमदार यांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बोलावले.

“तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या पैशांनी इथं आला आहात. मग आज दिवसभर तुम्ही इथं पाहिलेल्या २५ झाडांची क्षत्रिय नावं मला सांगू शकाल काय?” असं त्यांनी विचारलं.

फक्त संजीवनी आणि त्यांची बहीण विजया एकूण २५ नवे सांगू शकल्या. बाकी सर्वजण एकमेकांकडे बघत राहिले. येथून त्यांची चांगली ओळख झाली.

पुढे आपल्या पुढच्या शिक्षणासाठी संजीवनी पुण्याला आल्या. त्यांनी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला. याच काळात शां.ब.मुजुमदार हे देखील पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये बॉटनीचे शिक्षक बनले होते. 

पुण्यात ते एकमेकांच्या जवळ राहत. त्यामुळे त्यांचीओळख वाढली व त्याच प्रेमात रूपांतर झालं. संजीवनी या मराठा होत्या तर मुजुमदार हे सारस्वत ब्राह्मण होते. तेव्हाचे वातावरण अशा विवाहासाठी अनुकूल नव्हते. त्यामुळे संजीवनी यांनी आपल्या पालकांशी बोलून यासंबंधी बोलणी केली. त्यांच्या वडिलांनी काही दिवस विचार केला आणि या विवाहाला संमती दिली.

संजीवनी यांच्या आईने तर त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नात हा विषय सर्वांच्या समोर मांडला. माझ्या धाकट्या मुलीने स्वतः वर शोधून लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘तुम्ही तिच्या लग्नाला यायचे की नाही हा निर्णय स्वतः घ्या’ असं बोलण्याची डेरिंग त्यांनी एवढ्या लोकांच्यात दाखवली. त्यांच्या चुलत भावांनी त्यांच्याशी बोलणे सोडले.

काही दिवसांतच त्यांची बदली श्रीरामपूरला झाली. मुजुमदार यांच्या आईचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे दोघांनी स्वतःच्या खर्चाने आपले लग्न केले.

फर्ग्युसन कॉलेजात शिकवायला सुरुवात केल्यानंतर शांताराम मुजुमदार हे तब्बल २० वर्षे तिथं शिक्षक राहिले. पदव्युत्तर आणि पीएचडी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यापीठाच्या राजकारणातही जम बसवला. विद्यापीठाच्या कौन्सिलवर ते १४ वर्षे सदस्य होते. त्याचबरोबर वनस्पतीशास्त्र विषयाच्या बोर्ड ऑफ स्टडीवर ९ वर्षे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. विदेशी भाषा विभागाशी त्यांचा ७ वर्षे संपर्क होता. या दरम्यान त्यांचा अनेक देशी-विदेशी विद्यार्थ्यांशी संबंध आला

तेव्हा पुण्यात परदेशातून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची वाईट अवस्था होती. तेव्हाची एक गोष्ट तर अख्ख्या पुण्यात फेमस होती.

एक मॉरिशसवरून आलेला विद्यार्थी आजारी पडला होता. त्याची मैत्रीण त्याच्या तब्येतीकडे बघत असे. ती त्याला खिडकीतून आपल्या वाट्याचा डबा देई.

मुजुमदार यांना ही गोष्ट समजली तेव्हा ते त्याला भेटायला गेले. या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटले. त्यांनी पुण्यातील बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. केसरी पेपर या मुलाखती दर रविवारी छापत असे.

यामागे मुजुमदार यांचा उद्देश परदेशी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणे हा होता. फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, वाडिया कॉलेज, फर्ग्युसन अशा अनेक विद्यालयातील परदेशी विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी अनेक विद्यार्थी त्यांच्या घरी यायचे. या विद्यार्थ्यांसाठीच त्या दोघांनी मिळून सिम्बॉयसिस कॉलेजची स्थापना केली. अनेक विद्यार्थी तर चक्क मुजुमदार यांच्या घरी राहत असत. काही विद्यार्थ्यांची देखभाल स्वतः मुजुमदार करत. त्यांना दवाखान्यात नेणे, त्यांच्या अभ्यासाची सोय करणे अशी अनेक कामे त्यांनी स्वतः जातीने केली.

अनेक विद्यार्थी त्यामुळे इथल्या संस्कृतीशी जुळले. काहींनी येथेच लग्ने केली. अनेक विद्यार्थी भारतातच स्थायिक झाले.

१९७१ मध्ये सुरु होऊनही सिम्बॉयसिसचे ऑफिस १९७७ पर्यंत फर्ग्युसन कॉलेजातच होते. सिम्बॉयसिसच्या नावाने ट्रस्ट बनवताना त्यांचे दोन मित्र सतीश चिवले आणि अनिल दांडेकर त्यांच्या मदतीला धावले. काही विद्यार्थीही ट्रस्टमध्ये आले. ६ लोक जमले. पण ट्रस्टमध्ये नाव नोंदवायला सातवा माणूस सापडेना. तेव्हा संजीवनी यांचे नाव त्यात नोंदवले गेले.

सिम्बॉयसिस हे बोटॅनिकल नावही मुजुमदार यांनीच दिले. त्यांनी आपल्या आवडत्या विषयालाच आपल्या कामात ओवून टाकले. पुण्यात ILS हे १९३० च्या आसपास सुरु झालेले कॉलेज वगळता इतर कोणतेही लॉ कॉलेज नव्हते. त्यामुळे पहिल्यांदा कायदा शिक्षण देणारे कॉलेज उभारण्यात आले.

सकाळ आणि संध्याकाळच्या वेगवेगळ्या बॅचेस यावेळी भरत असत. दरवर्षी १२०० विद्यार्थी या कोर्ससाठी ऍडमिशन घेत. न्यायमूर्ती बी एम देशमुख या संस्थेचे अध्यक्ष बनले. बी जी कोळसे पाटील या संस्थेत शिकवण्यासाठी येत असत.

संस्थेची ख्याती दिवसेंदिवस वाढत गेली. अनेक नवी कॉलेजेस ससुरु झाली. यातूनच सिम्बॉयसिसचा विस्तार वाढला. भारतातील अनेक शहरात सिम्बॉयसिसच्या शाखा सुरु झाल्या. 

मुजुमदार याना त्यांच्या कामासाठी भारत सरकारतर्फे २००५ साली पदमश्री आणि २०१२ साली पदमभूषण पुरस्कार मिळाला आहे.

आज रोजी भारतात ७ वेगवेगळ्या शहरात सिम्बॉयसिसच्या संस्था उभ्या आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. संस्थेने पुण्यात देखणे असे आंबेडकर स्मारक उभारले आहे. यात आंबेडकरांच्या अनेक वस्तूही ठेवण्यात आल्या आहेत.

हे हि वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.