पुणेकरांचा विरोध असूनही सिम्बायोसिस मध्ये आंबेडकरांचं स्मारक उभं राहिलं
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या बऱ्याच जुन्या गोष्टींना मोठा इतिहास असतो हे आपल्याला माहीतच नसतं. आणि ते माहीत करून घेण्याची तसदी ही आपण कधी घेत नाही.
असंच पुणेकर भिडूना, किंवा मग पुण्यातल्या सिम्बॉयसिस मध्ये शिकणाऱ्या भिडूना ते हनुमान टेकडीवर असणाऱ्या आंबेडकर स्मारकाचा इतिहास माहीत नसणार. पण अस कस चालेल भिडूनो. पुण्यात आहे तर माहीतच करून घ्यायला पाहिजे.
कारण या स्मारकासाठी सिम्बॉयसिसच्या शा. ब. मुजुमदार यांनी कष्ट तर उपसलेतच, पण त्यासाठी त्यांना मदत केली ती यशवंतराव चव्हाणांनी. अशा या आंबेडकर स्मारक तयार होण्याचा किस्सा.
शांताराम बळवंत मुजुमदार हे सिम्बॉयसिस या संस्थेचे सर्वेसर्वा. त्यांची पत्नी संजीवनी मुजुमदार यांच्यासोबत मिळून दोघांनी या संस्थेची पायाभरणी केली होती. संस्थेच्या स्थापनेनंतर अवघ्या काही दिवसातच संस्था बहरायला लागली होती.
१९७६ च्या दरम्यान संस्थेत सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र सुरू करण्यात आलं. या केंद्राच्या उदघाटन समारंभासाठी यशवंतराव चव्हाण आले होते. त्यावेळी यशवंतराव भारताचे परराष्ट्रमंत्री होते. या संस्थेमुळेच मुजुमदार आणि यशवंतराव चव्हाणांचा संबंध आला. त्यांचे हे संबंध वृद्धिंगत होतच होते अशात एक घटना घडली.
साल होत १९८१ चं. त्या वर्षातल्या जानेवारी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र अस्थीकलश, आंबेडकरांचा ज्या पलंगावर मृत्यू झाला तो पलंग, त्यांच्या दैनंदिन व्यवहारातल्या वापराच्या वस्तू या सगळ्या गोष्टी आंबेडकरांच्या पत्नी श्रीमती माईसाहेब आंबेडकर यांनी सिम्बॉयसिस संस्थेला भेट म्हणून दिल्या.
आता सिम्बॉयसिस संस्थेने या वस्तूंच सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या आवारातच बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल आणि म्यूजियम तयार करायचं ठरवलं. यासाठी एक जाहीर समारंभ आयोजित करण्याचा निर्णय मुजुमदार यांनी घेतला. यासाठी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना निमंत्रण धाडलं.
पण यशवंरावांकडे वेळ नसल्यानं त्यांनी अन्य व्यक्तीस बोलावून समारंभ उरकून घ्यावा असं मुजुमदारांना सुचवलं. यावर मुजुमदारांनी यशवंतरावांना एक पत्र पाठवलं. त्यात ते म्हणतात,
Nothing of any importance and significance in Maharashtra is likely to succeed without your blessings.
त्यामुळ कार्यक्रम यशवंतरावांना वेळ मिळाल्यावरच होईल असं मुजुमदारांनी डिक्लिअर केलं.
हे झालं समारंभाच. पण या मेमोरियलसाठी जागा तर हवी होती. म्हणून बाजूचीच हनुमान टेकडीच्या पायथ्याशी असलेली जागा ठरवण्यात आली. यासाठी वनखात्याने ती जागा निर्वणीकरून संस्थेच्या ताब्यात देण्याच ठरवलं.
पण पुणेकरांचा विरोध होऊ लागला. वर्तमानपत्रातून या मुद्याचा जाहीर किस पडू लागला. खरं म्हणजे ज्या जंगलखात्याच्या जागेवर सिम्बॉयसिसला डॉ. आंबेडकर स्मारकाची इमारत बांधायची होती तिथं संपूर्ण जमिन कातळ होती. त्यावर झाड लावणं केवळ अशक्य होतं. पण पुणेकर टीका करू लागले की,
सिम्बॉयसिसने तिथं झाडच लावली पाहिजेत. सिम्बॉयसिस टेकडीवर इमारतींचे जंगल उभारणार आहे. आंबेडकरांचे नवे कैवारी हनुमान टेकडीवर अतिक्रमण करणार आहेत.
यासंदर्भात सिम्बॉयसिसने खुलासा करणार एक परिपत्रक काढलं. पण भडक शिर्षकाच्या बातम्या, अग्रलेख, बातमीपत्र पुण्यामुंबईच्या अनेक वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होऊ लागले. त्यासमोर हे परिपत्रक फिक पडलं.
अशा परिस्थितीत काय करावं हे मुजुमदारांना समजेना. त्यांना अशा प्रसंगी यशवंतरावांची आठवण आली. त्यांनी यशवंतरावांना पत्र लिहिलं. आणि सगळा घडलेला प्रकार सांगितला. यावर यशवंतरावांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला.
थोड्याच दिवसात संस्थेला एक पत्र आलं. पत्र होत जागा मिळाल्याचं. ज्या जागेवरून वृत्तपत्रांमधून गहजब झाला ती जागा सिम्बॉयसिस संस्थेला डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्याचा अंतिम निर्णय शासनाने घेतला. जे या स्मारकासाठीच विरोध करत होते त्यांनीच मुजुमदारांना पत्र पाठवून त्यांचं अभिनंदन केल. आणि त्यांचं संयोजनाबद्दल ही कौतुक केलं.
ही बातमी यशवंतरावांना सांगण्यासाठी मुजुमदार धडपडत होते. मात्र तस घडून आल नाही. तोपर्यंत यशवंतराव चव्हाण स्वर्गवासी झाले होते.
हे ही वाच भिडू.
- म्हणून इंदिरा गांधींनी पुलोद सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली.
- एका रात्रीत खेळ झाला आणि एस.एम. जोशींच संभाव्य मुख्यमंत्रीपद गेलं.
- सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांच्या थकलेल्या दोस्तीचं रहस्य.