उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं, पण शेषन यांना दिलेलं तिकीट शिवसेनेनंच मागं घेतलेलं…

शनिवारी रात्री निवडणूक आयोगानं अंधेरी पोटनिवडणुकांसाठी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचे आदेश दिले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधत उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ असे चिन्हांचे पर्याय, तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नावांचे पर्याय जाहीर केले.

बोलताना उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष टी. एन. शेषन यांचा उल्लेख करत त्यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं.                  

नव्वदच्या दशकात टी.एन.शेषन नावाच्या वादळाने भारताला आचारसंहिता पाळायची सवय लावली हे सगळ्यांना माहीत आहे.

टी.एन.शेषन हे देशाने पाहिलेले, निवडणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष होते की ज्यांची देशातील भल्या-भल्या राजकीय नेत्यांमध्ये दहशत होती. नव्वदच्या दशकातला एक काळ असा होता, ज्यावेळी म्हंटलं जायचं,

“भारतीय राजकारणी फक्त दोन गोष्टींना घाबरतात. एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे टी.एन शेषन.”

टी.एन.शेषन हा तोच माणूस होता, ज्याने राजकीय व्यवस्थेच्या हातातील खेळणं होण्यास नकार देत एकट्याच्या जीवावर, आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करत देशात सर्वात मोठ्या राजकीय सुधारणा घडवून आणल्या.

१२ डिसेंबर १९९० रोजी शेषन यांनी निवडणूक आयोगाच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले आणि पुढची  ६ वर्षे त्यांनी अक्षरशः गाजवली. राजकीय पक्षांव्यतिरिक्त सामान्य जनतेला फारशा माहित नसलेल्या निवडणूक आयोगाला त्यांनी लोकाभिमुख बनवलं आणि निवडणूक आयोगाच्या अपार शक्तीची जाणीव त्यांनी देशातल्या सगळ्याच राजकीय पक्षांना आणि नेत्यांना करून दिली.

सगळे पक्ष सगळे नेते यांना त्यांनी सळो की पळो करून सोडलं होतं. निवडणुकीच्या वेळी मतदान ओळखपत्र सोबत असणं अनिवार्य करणं असेल किंवा राजकीय नेत्यांच्या निवडणूक खर्चावरील प्रतिबंध असेल, हे निर्णय शेषन यांचेच.

ते गंमतीने म्हणायचे,

“I eat politians for breakfast.” 

शेषन यांनी बनवलेली आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करणारी कुठलीही घटना असो, या घटनेतील सहभागी व्यक्ती कितीही मोठ्या पदावरील राजकारणी असो, त्याविरोधात कारवाई करताना निवडणूक अधिकारी भीड बाळगत नसत.

मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव तर आपल्या प्रचार सभांमधून थेट शेषन यांना आव्हान देताना म्हणत होते,

“शेषनवाको भैसिया पे चढाकर के गंगाजी में हेला देंगे”

अशा या टी.एन.शेषन यांची लोकप्रियता सर्वसामान्य जनतेत अफाट वाढली असेल तर यात आश्चर्य वाटायला नको. निवडणुकांमधला भ्रष्टाचार एका फटक्यात खतम करून टाकणारे ती.एन शेषन स्वतः निवडणुकीला उतरले तर काय बहार येईल अशा चर्चा वाचकांच्या पत्रव्यवहारातून गाजायच्या.

त्यांचं म्हणणं शेषन यांना पटलं. १९९७ साली त्यांनी खरंच देशाच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवायचं ठरवलं.

त्यांच्या विरोधात उभे होते के.आर.नारायण. त्यांना काँग्रेस भाजप अशा अनेक पक्षांनी पाठिंबा दिला होता. नारायणन यांच्या निमित्ताने भारताला पहिले दलित राष्ट्रपती मिळणार म्हणून सगळे पक्ष आपापसातील विरोध बाजूला ठेवून त्यांच्यापाठीशी उभे होते.

टी.एन.शेषन यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. भाजप सोबत युतीत असूनही बाळासाहेब ठाकरे यांनी शेषन यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले,

“शेषन हे जात धर्माच्या पलीकडे गेलेले व्यक्तिमत्व असून राष्ट्रपतिपदाचे खरे दावेदार आहेत. म्हणूनच आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.”

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आम्ही राजकारण आणत नाही पण इतर वेळी कोणाच्याही सोबत आघाडीवर असलो तरी या निवडणुकीत पाठिम्बा राजकारणाच्या पलीकडे विचार करून देतो असंही बाळासाहेबांनी सांगितलं.

या निवडणुकीत टी.एन.शेषन यांचा पराभव झाला पण त्यानिमित्ताने त्यांची बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मैत्री जुळली ती कायमची.

शेषन यांच्या सारख्या कडक शिस्तीचा प्रामाणिक माणूस राजकीय पदावर यावा ही शिवसेनाप्रमुखांची खूप इच्छा होती.

म्हणूनच १९९८ साली लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर त्यांनी शेषन यांना खासदारकीला उभं करायचं ठरवलं. शेषन यांनी देखील होकार दिला.

अनेक ठिकाणी चाचपणी केल्यावर त्यांच्यासाठी वाशीम हा मतदारसंघ फायनल करण्यात आला.

वाशीम हा शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ होता. ती जागा सेनेच्या पुंडलिकराव गवळी यांनी मागच्या वेळी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना हरवून जिंकली होती. म्हणूनच हा सुरक्षित मतदारसंघ शेषन यांच्यासाठी सोडायचं ठरलं. काँग्रेसने पुन्हा सुधाकरराव नाईक यांनाच तिकीट दिलं.

पण विरोधकांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. एकेकाळी शिवसेना मुंबईत मराठी माणसांची नोकरी पळवणाऱ्या दक्षिण भारतीयांच्या विरोधात लुंगी हटाव पुंगी बजाव अशा घोषणा देत होती आणि आज तीच शिवसेना एका मराठी माणसाला हटवून त्या जागी शेषन या केरळी माणसाला तिकीट देत होती.

विरोधी पक्षांनी बोंबाबोंब सुरु केली. हळूहळू शिवसैनिकांच्यामध्ये देखील अस्वस्थता वाढली. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी वाशिमच्या ऐवजी शेषन यांना खेड येथून उभा करता येत का याची चाचपणी केली. पण तिथेही हाच आरोप होऊ लागला. स्वतः शेषन यांनी देखील मला ग्रामीण मतदारसंघाच्या ऐवजी मुंबई किंवा पुणे इथून तिकीट मिळावं अशी मागणी केली.

अखेर मनोहर जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की शिवसेना शेषन यांना निवडणुकीचं तिकीट देण्याचा निर्णय मागे घेत आहे.

पुढे १९९९ साली शेषन यांनी थेट काँग्रेसचे तिकीट मिळवले आणि गांधीनगर इथे लालकृष्ण अडवाणी यांच्या विरोधात खासदारकी लढवली. पण दुर्दैवाने त्यांचा जवळपास २ लाख मतांनी पराभव झाला. शेषन यांनी त्यानंतर राजकारणात जाण्याचं आपलं स्वप्न गुंडाळून ठेवलं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.