वर्ल्डकप फायनलला विरू खेळला नाही पण तसलंच जनावर आपल्या गोठ्यात आलं होतं!

२००७ सालचा टी२० वर्ल्डकप. जगासाठी हा नवीनच प्रयोग होत होता. कोणालाच माहित नव्हत की हा नवा ट्वेंटी-ट्वेंटी गेम कसा खेळला जातो. अनेक खेळाडू, कोचसुद्धा याबद्दल अनोळखी होते.

भारताने तर या वर्ल्डकप साठी वेगळाच प्रयोग केला होता. ही गेम तरुणरक्ताची आहे हे स्पष्ट होतं. भारताने सचिन, द्रविड,गांगुली, कुबळे सारख्या आपल्या जुन्या जाणत्या दिग्गज खेळाडूनां या वर्ल्डकपसाठी आणलं नव्हतं. सगळे खेळाडू तरुण होते.

भारताचं नेतृत्व देखील एमएस धोनीकडे देण्याचा प्रयोग केला गेला होता.

याच वर्षी झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारताचा झालेला दयनीय पराभव अजूनही फॅन्स विसरले नव्हते. त्यावेळी झालेली आंदोलने, घरावर झालेली दगडफेक अजूनही ताजी होती. खेळाडूंच्या मनावरचे ओरखडे अजून भरून निघाले नव्हते. साउथ आफ्रिकेमध्ये आलेल्या या धोनीच्या अनुनभवी टीमला कोणीही सिरीयस घेत नव्हत.

ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंड या टीम तेव्हा फेवरेट मानल्या जात होत्या.

भारताचा सगळा भार धोनी, सेहवाग, युवराज, हरभजन यांच्यावर होता. पण यापैकी अनेकजण फॉर्ममध्ये देखील नव्हते. तरीही जोगिंदर शर्मा, रॉबिन उत्थप्पा, रोहित शर्मा सारख्या अनेक नवीन खेळाडूंवर धोनीने भरोसा दाखवला होता. या टीमने सगळ्यांना धक्का देत एक एक टप्पा पार करत फायनल मध्ये एन्ट्री केली.

युवराजने मारलेले सलग सहा सिक्स, पाकिस्तानसोबत झालेली सुपरओव्हर असे अनेक अंगावर काटा आणणारे क्षण या वर्ल्डकपमध्ये पाहायला मिळाले होते. आता उत्सुकता फायनलची होती. परत आपल्या समोर पाकिस्तान होती.

या फायनल मॅचच्या अगोदर भारतासमोर एक मोठ संकट येऊन उभा राहिलं होतं.

भारताचा सर्वात सिनियर खेळाडू वीरेंद्र सेहवाग जखमी झाला. सेहवाग या पूर्ण सिरीजमध्ये फॉर्म मध्ये होता. त्याची सर्वात जास्त गरज फायनल मध्ये होती. सगळ्या पेपरमध्ये बातमी आली होती की सेहवागच्या खेळण्याबद्दल अनिश्चितता.

अख्खा भारत देवपाण्यात घालून बसला होता. सेहवाग नाही तर भारत वर्ल्ड कप जिंकत नाही हे पाकिस्तानवाल्यांना सुद्धा ठाऊक होतं.

सेहवाग खूप मेहनत घेत होता. त्याला माहित होतं की प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात असे प्रसंग खूप कमी येतात. भारताला 24 वर्षांनी वर्ल्डकप जिंकण्याची संधी आली होती. आता आपण खेळलेच पाहिजे. पण शरीर साथ देत नव्हतं.

त्याने बरीच पेन किलर औषधे खाल्ली, इंजक्शन घेतले पण काही फरक पडत नव्हता. एकवेळ त्याला बॅटिंग करता आली असती(तसही तो पळून रन्स काढण्यापेक्षा जागेवरून फोर सिक्स मारण्यासाठी प्रसिद्ध होता) पण फिल्डिंग करणे शक्य नव्हत. 

शेवटच्या क्षणापर्यंत तो बरा होईल अशीच सगळ्यांना आशा होती. खुद्द महेंद्रसिंग धोनीने प्रेस कॉन्फरन्समध्ये पाकिस्तानवर माइंड गेम खेळण्यासाठी डीक्लेर केलेलं की

“सेहवाग फायनल मध्ये नक्की खेळणार आहे.”

फायनलचा दिवस उजाडला. सकाळीच विरू धोनीच्या रूममध्ये गेला आणि सांगितलं की मी खेळू शकणार नाही. धोनी जरा देखील पॅनिक झाला नाही. त्याने युसुफ पठाणला सांगितलं तू खेळत आहेस.

खरं तर युसुफ पठाण कोण खेळाडू आहे, तो कसा खेळतो वगैरे वगैरे धोनीला देखील या वर्ल्डकपपूर्वी माहित नव्हत. स्टार फास्टर बॉलर इरफान पठाणचा मोठा भाऊ एवढीच त्याची ओळख होती. देवधर ट्रॉफी की कुठल्याशा प्रथम श्रेणी सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली होती त्याच्या जोरावर वर्ल्डकपच तिकीट युसुफला मिळालेल.

मात्र संपूर्ण वर्ल्डकपमध्ये त्याला एकदाही खेळण्याची संधी मिळाली नव्हती. फायनलला मिळेल याची शक्यता देखील नव्हती. तो बिचारा पहाटेपासून आपल्या डेली रुटीनच जिम करत होता. तीनतास जिम मारल्यावर त्याला कळाल की आपल्याला आज वीरूच्या जागी फायनल खेळायचं आहे.

इरफान सुद्धा टीममध्ये होता. युसुफने त्याला आपल्या रूममध्ये बोलावून घेतल. इरफानला कळेना काय झालंय. युसुफने खालच्या आवाजात त्याला सांगितलं की माझ आज सिलेक्शन झालं आहे. इरफान खुश होऊन उद्गारला,

“अरे ये तो अच्छी बात है. दोन भाई एकसाथ खेलंगे. मिल के देश को जितायेंगे. “

युसुफ काकुळतीला येऊन म्हणाला, मगर मेरे पैर ही नही चल रहे है. इरफानने डोक्याला हात लावला. अभी नही तो कभी नही. त्याने त्याच्या पायाची मालिश केली. वार्मअप करायला लावल कसबस त्याला खेळायला तयार केलं.

जेव्हा भारताची टीम खेळायला उतरली तेव्हा सेहवाग नाही ते बघून सगळा देश निराश झाला. फक्त एकाच घरात दिवाळी साजरी होत होती. पठाणांचे दोन्ही सुपुत्र भारतासाठी फायनल खेळत होते.

धोनीने टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली.  त्याने नेटमध्ये खेळताना ओळखलेले की युसुफ काय चीज आहे. त्याने त्याला ओपनिंगला पाठवलं. पहिला एक बॉल त्याने पळून एक रन काढली पण परत स्ट्राईक आल्यावर त्याने मोहम्मद असिफला जो सिक्सरचा तडाखा दिला, त्याच वेळी मॅचची दिशा कळाली होती.

भारताला सेहवागसारखाच जनावर खेळाडू मिळाला होता.

सेहवागची उणीव भासली नाही. गंभीर वगैरेच्या बॅटिंगमुळे आपण मॅच काढली. भारताने पहिला टी२० वर्ल्डकप जिंकला होता. धाकटा इरफान मॅन ऑफ द मॅच झाला. लास्ट बॉलला जिंकून देणारा जोगिंदर शर्मासुद्धा हिरो ठरला. ते क्षण आजही कोणी विसरू शकत नाही आणि युसूफचा तो सिक्सरही.

भारताचा हा सुपर हिटर काल निवृत्त झाला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.