त्यानं क्रिकेटला झहीर आणि ब्रेट ली दिले, आपण त्याला साधं ‘थँक यु’ म्हणालो नाही…

कपिल देवचा एक किस्सा फार फेमस आहे, मुंबईत सिलेक्शनसाठी आलेला असताना, कपिलला खाण्यासाठी फक्त दोन चपात्या देण्यात आला. जास्तीच्या चपात्या मागण्यासाठी जेव्हा कपिल अडून बसला, तेव्हा भारताचे माजी क्रिकेटर केकी तारापोर त्याला म्हणाले होते,

“भई, इंडिया में तो फास्ट बॉलर होते ही नहीं है.”

पुढं कपिलनं भारतातलाच नाही, तर जगातला बाप फास्ट बॉलर बनून दाखवलं. पण भारतीय पेस बॉलिंगची स्टोरी इथून सुरू झाली नाही. एखादा जोरात टाकणारा बॉलर ज्या स्पीडनं यायचा त्याच स्पीडनं गायब व्हायचा. त्यांच्या ना फिटनेसकडे लक्ष दिलं जायचं, ना स्पीडकडे. भारतातच फास्ट बॉलर घडत नव्हते, त्यामुळं नव्या पोरांचे आदर्शही मार्शल, लिली, होल्डिंग हेच राहिले.

मग एक असं स्थित्यंतर घडलं की, त्यामुळं पोरांनी पहिली बॅटिंग मी करणार, या हट्टाऐवजी पहिली बॉलिंग मी करणार; असा हट्ट सुरू केला. भारतात फास्ट बॉलर्स घडू लागले, ज्यांच्याकडे स्पीड होता, अचूकता होती आणि लक्ष देणारी सिस्टीमही.

या स्थित्यंतराचे दोन हिरो होते, एक झहीर खान आणि दुसरा 

थिरुमलाई अनंथनपिल्लाई शेखर.

झहीर खानबद्दल आपल्या सगळ्यांना माहीत असतंय. त्याची बॉलिंग ॲक्शन कॉपी करुन झालेली असते. पण टीए शेखरबद्दल आपण काय ऐकलेलं नसतं. आपल्याला ना त्याचे रेकॉर्ड्स माहिती असतात, ना त्याचं फक्त भारतीयच नाही तर जागतिक क्रिकेटमधलं योगदान.

सुरुवात करूयात टीए शेखरच्या कारकिर्दीपासून-

मूळचा चेन्नईचा असलेला शेखर, धिप्पाड उंची, तगडी तब्येत यामुळं दिसायचचाच फास्ट बॉलर सारखा. त्यानं तमिळनाडूकडून डोमेस्टिक क्रिकेट खेळताना आपली छाप पाडली होती. रणजी ट्रॉफी आणि दुलीप ट्रॉफीमधल्या काही मॅचेस गाजवल्या. १९८३ मध्ये त्याला भारताकडून खेळण्याची संधीही मिळाली. पण भारताकडून तो फक्त दोन टेस्ट आणि चार वनडे मॅचेस खेळला.

शेखर त्याकाळातला भारतातला सगळ्यात फास्टेस्ट बॉलर म्हणून ओळखला जायचा. मग त्याचं करिअर बहरलं का नाय? राजकारण झालं काय?

तर नाही, स्पीड असला तरी त्याच्याकडे अचूकता नव्हती. याचं कारण म्हणजे त्याच्यात सुधारणा घडवायला चांगले कोचेस नव्हते. इंटरनॅशनल क्रिकेटनंतर शेखरनं असा एक निर्णय घेतला, ज्यामुळं क्रिकेटचं भविष्यच बदलून गेलं.

भारतात एमआरएफ पेस फाउंडेशनची स्थापना झाली होती. तिकडे फास्ट बॉलर्स घडणार होते. फास्ट बॉलरला घडवण्यासाठी कोचिंग किती गरजेचं असतं, हे शेखरला चांगलंच माहीत होतं. फास्ट बॉलिंगचा बादशहा डेनिस लिलीच्या नेतृत्वात सुरू असलेल्या एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये शेखरची कोच म्हणून निवड झाली. 

ज्याचा फोटो शेखर किटबॅगमध्ये लावायचा त्याच डेनिस लिलीनं त्याला ट्रेन केलं.

कोचिंग करताना शेखर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही खेळत होता, पण १९९१ मध्ये त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेटमधून रिटायर व्हायचं ठरवलं आणि 

त्याचं कारण सांगितलं, ‘मला माझ्याच पोरांसोबत स्पर्धा करायची नाहीये.’

सुरुवातीला एमआरएफ आणि शेखरनं भारताला दोन तगडे फास्ट बॉलर्स दिले, जवागल श्रीनाथ आणि व्यंकटेश प्रसाद. या दोघांमुळं भारतात काय लेव्हलचे फास्ट बॉलर्स घडू शकतात हे सगळ्यांना समजलं. आता फक्त भारतातलेच नाही, तर जगभरातले भावी फास्ट बॉलर्स एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये येऊ लागले. ट्रेनिंग घेऊन मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवू लागले.

यातल्या काही बॉलर्सची नावं सांगतो – चामिंडा वास, ग्लेन मॅकग्रा, शेन बॉंड, शोएब अख्तर आणि जगाला वेगाचं खुळ लावणारा ब्रेट ली.

आता तुम्हाला अंदाज आला असेल, शेखर, डेनिस लिली आणि एमआरएफ पेस फाउंडेशन यांची ताकद काय होती.

शेखरनं जगाला आणखी एक हिरा दिला,

झहीर खान नावाचा.

भारताला लेफ्ट आर्म फास्ट बॉलरची फार गरज होती. त्यासाठी शेखर भारतात अनेक ठिकाणी गेला, तिथल्या लोकल मॅचेसही पाहिल्या. पण त्याला मिडीयम पेसर्सच दिसायचे. अशातच एका झोनल मॅचच्या वेळी, त्याच्याकडे १९ वर्षांचा झहीर आला आणि म्हणला मला फास्ट बॉलर बनायचंय. शेखरनं त्याची बॉलिंग बघितली आणि त्याला फाऊंडेशनमध्ये बोलवून घेतलं. तिथं लिली आणि शेखरनं झहीरला ट्रेन केलं. त्याला आणखी तगडं केलं.

मुंबईच्या रणजी टीममध्ये झहीरची निवड होईल याची शेखरला खात्री होती. मात्र तसं झालं नाही. या पोरात असलेली गुणवत्ता त्यानं ओळखली होती, शेखर काय शांत बसला नाही. त्यानं बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांना झहीरबद्दल सांगितलं. ते असेही फास्ट बॉलरच्या शोधात होतेच. त्यांनी झहीरचा खेळ बघितला आणि त्याला संघात घेतलं.

मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये झहीरनं मुंबईचाच बाजार उठवला. पुढच्याच वर्षी झहीरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतरचा इतिहास तर आपल्याला माहीत आहेच. झहीरनं भारताच्या बॉलिंगला, भारताच्या टीमला आणि भारतीयांच्या स्वप्नांना नवा आकार दिला. 

एमआरएफ पेस फाऊंडेशनचं आणि शेखरचं योगदान इथंच थांबलं नाही. २००८ पर्यंत त्यानं भारतासाठी फास्ट बॉलर्सची फौज उभी केली. इरफान पठाण, आरपी सिंग, एस श्रीशांत, मुनाफ पटेल आणि झहीर खान… २००७ आणि २०११ च्या वर्ल्डकपमध्ये मोलाचं योगदान देणारी सेना शेखरच्या हाताखालीच तयार झाली होती.

त्यानंतर तो भारताचा सिलेक्टर झाला, दिल्ली डेअरडेव्हील्स सोबतही काम केलं… पण तो फारसा लाईमलाईटमध्ये राहिला नाही. 

तो आला, आपलं काम केलं आणि पिक्चरमधून बाहेर गेला.. 

गदी फास्ट बॉल सारखंच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.