तुम्ही २३ व्या वर्षी काय करत होतात?

तुम्ही २३ व्या वर्षी काय करत होतात?

जर तुम्ही वयाची पंचविशी- तिशी पार केली तर तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. कि, तुम्ही वयाच्या २३ व्या वर्षी नक्की काय करत होतात? हा असाच प्रश्न सद्या नेटकरी एकमेकांना विचारत आहेत. याला कारण ठरले ते म्हणजे शाहरुखचा मुलगा आर्यन खान, जो सद्या ड्रग्स प्रकरणात जेल ची हवा खातोय.

आणि त्याचं वय आहे अवघं २३ ! म्हणून लोकं एकमेकांना ट्रोल करत हा प्रश्न करत आहेत. असो असाच प्रश्न प्रवीण कुमार तेवतीया यांना देखील. त्यांनी त्याचे जे उत्तर दिलेय त्याने सर्वच नेटकऱ्यांचे मनं जिंकली आहेत.

त्यांनी ट्वीट करत हे उत्तर दिलंय कि, मी “वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय नौदलात सामील झालो. १८ व्या वर्षी हायड्रोग्राफर बनलो, तर २० व्या वर्षी मरीन कमांडो बनलो. तर २१ व्या वर्षी गोव्यामध्ये स्पेशल ऑपरेशन सुरू केले होते. तर वयाच्या २३ व्या वर्षी मुंबई दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढलो  आणि १८५ लोकांचे जीव वाचवले.  तर २९ व्या वर्षी मी माझी पहिली हाफ मॅरेथॉन धावली.तर ३० व्या वर्षी पहिली मॅरेथॉन धावली. आणि ३२ व्या वर्षी IRONMAN किताब मिळवला.

त्यांनी मुंबईमध्ये झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्याची आठवण करत सांगितले कि,  मी राष्ट्रासाठी लढलो. याच हल्ल्यादरम्यान मी माझा डावा कान गमावला. त्यामुळे मला एका कानाने ऐकायला येत नाही. तसेच ५ गोळ्या अंगावर घेतल्या, त्यात AK४७  बुलेट्सने उजव्या फुफ्फुसांना धोका निर्माण झाला होता. पण त्यानंतर मी स्वतःला शारीरिकदृष्ट्या इतके मजबूत बनवले कि, माझं आयुष्यच वैद्यकीय  चमत्कार बनलेय.

“आम्ही काश्मीरमध्ये होतो आणि माझी ड्युटी रात्री १२ ते पहाटे ४ पर्यंत होती.  मी रात्री साडेअकरा वाजता माझ्या ड्युटीवर जाण्यासाठी  मी युनिफॉर्म घालत होतो. भारत आणि इंग्लंड यांच्यातील क्रिकेट सामना पाहण्यात प्रत्येक भारतीय व्यस्त होता. तेवढ्यात बातमी मिळाली कि, ताजवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे”.

“त्यानंतर वरिष्ठांनी मला संपर्क साधला आणि मुंबईतील परिस्थितीबद्दल माहिती दिली की, आमचे सर्व उच्च पोलीस अधिकारी शहीद झाले आहेत. म्हणून, मला पदभार स्वीकारण्यास सांगितले गेले आणि मला सांगण्यात आले की मार्कोस संघासाठी आमच्या क्षेत्रात घुसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची ही सुवर्णसंधी आहे.”

प्रविणकुमार यांना सेकंड टीमचे ‘पॉईंट मॅन’ म्हणून नियुक्ती करण्यात आली.

पॉइंट मॅन हा सैन्यातील पहिला ऑफिसर असतो जो, एकतर पहिला शॉट काढतो किंवा पहिली गोळी घेतो. त्यांनी सांगितले कि, ताज हॉटेलमध्ये जेंव्हा त्यांनी प्रवेश केला जिथे त्यांनी हॉटेलच्या लॉबीमध्ये रक्ताचे सडे आणि सर्वत्र काच फुटलेल्या पडल्या होत्या.

या हल्ल्यादरम्यान मरीन कमांडो फोर्स (MARCOS) च्या जवानांच्या ५९ तासांच्या ऑपरेशन दरम्यान, प्रवीणकुमार हे एका खोलीत चार दहशतवाद्यांमध्ये पकडले गेले होते. त्यानंतर त्यांनी तिथून त्यांना उत्तर देत ते तिथून जिवंत बाहेर आलेत. त्या चेंबरमध्ये अडकलेल्या १५० लोकांच्या बचावकार्यात त्यांनी मदत केली. त्यांना बाहेर काढण्यासाठी धैर्याने लढले.  शौर्य चक्र पुरस्कृत प्रवीणकुमार यांना या हल्ल्यात छातीत चार गोळ्या लागल्या होत्या. त्याच्या छातीच्या उजव्या बाजूला गंभीर जखमा झाल्या होत्या. त्याच्या डाव्या कानालाही इजा झाली होती.

त्यांनी असंही सांगितलंय कि, याच हल्ल्यादरम्यान ताज हॉटेलमध्ये गौतम अदानी देखील तिथेच हजर होते.

अतिरेक्यांना माहीत नव्हतं भारतातला सर्वात श्रीमंत माणूस आपल्या तावडीत सापडलाय..

तेवतिया म्हणजे त्या काही शूर सैनिकांपैकी एक आहे ज्यांनी आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत अगदी प्राणपणाने लढले होते. त्यांना या योगदानासाठी भारत सरकारकडून शौर्य चक्राचा भारतीय लष्करी सन्मान देऊ केला. तो सन्मान जो शौर्य, धैर्य आणि आत्म-बलिदानासाठी प्रदान केला जातो.

आता प्रवीण मॅरेथॉन धावपटू आहे. त्याने जगभरातील अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे आणि पदके जिंकली आहेत.

कोविड -१९ च्या लढ्यात योगदान देण्यासाठी प्रविणकुमार यांनी त्यांच्या पदकांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता.

पण ….बॉलिवूडचे तथाकथित हिरो आणि त्यांची मुले, वयाच्या २३ व्या वर्षी बेकायदेशीर असलेल्या  कोकेन आणि हेरॉईन सारखे ड्रग्स घेऊन तुरुंगाची हवा खात आहेत, तरीही तेच देशवासीयांसाठी प्रेरणास्त्रोत राहतील….हे असलेच ड्रग्स घेणारी लोकं लोकांसाठी ‘हिरो’ असतात, असंही त्यांनी परखडपणे आपल्या ट्वीटरवरून शेअर केले आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.