१५ वर्ष मालिका चालवणं आणि TRP तही नंबर वन ठेवणं…खायची गोष्ट नाही!

आजही घरात टिव्ही समोर बसल्यावर सगळ्या कुटुंबाचं एका गोष्टीवर एकमत होऊ शकतं ते म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा पाहणं. ही मालिका जेवढ्या प्रेमाने लहान मुलं बघतात तेवढ्याच प्रेमाने वयस्कर लोकं सुद्धा बघत असतात. 

आज ही मालिका सुरु होऊन तब्बल १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. डायरेक्टर मालव रजदा यांनी ट्विट करून तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेला १५ वर्ष पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. टिव्हीवर सर्वाधिक काळ चालणारी मालिका म्हणून तारक मेहता का उलटा चष्माचं नाव घेतलं जातं. 

याचसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सिरीयलचं नाव पोहोचलं आहे.

आज जरी सगळे तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेचं कौतूक करत आहेत. मात्र, मालिकेचा प्रवास दिसतो तेवढा सोपा नव्हता. निर्माते असित कुमार मोदी सलग ६ वर्ष मोठ मोठ्या चॅनेलकडे मालिकेची स्क्रिप्ट घेऊन जात होते. मात्र, लोकं हे पाहणार नाही असं सांगून त्यांना माघारी पाठवत होते. 

या मालिकेचा पहिला एपिसोड २८ जुलै २००८ रोजी सब टीव्हीवर प्रदर्शित झाला. तेव्हा पासून ही मालिका अजूनही सुरु आहे. 

त्यावेळी सुद्धा आता प्रमाणे इतर सगळे टीव्ही चॅनेल्स कौटुंबिक, सासू सुनेचा वाद  दाखवण्यात इंटरेस्टेड होत्या. कॉमेडी सिरीयल, शो फक्त शनिवारी, रविवारी दाखवले जात होते. लोकांना दररोज कॉमेडी दाखवली तर ते पाहणार नाहीत असेच मत चॅनेल मालक बोलून दाखवायचे. 

मात्र मोदी आपल्या संकल्पनेवर विश्वास ठेवून होते. आपण जर ही मालिका रोज दाखवली तर प्रेक्षक नक्कीच बघतील. नवीन पाहून लोकांना हसतील असा विश्वास त्यांना होता. त्यासाठी त्यांनी २००२ पासून प्रयत्न सुरु केले होते. 

असित कुमार मोदी चॅनेल ऑफिस मध्ये जाऊन मालिकेची स्क्रिप्ट दाखवत. असं एकही चॅनेल उरलं नव्हतं जिथे मोदी आपली संकल्पना घेऊन गेले नव्हते. मात्र, मोदी यांची संकल्पना कुठल्याच चॅनलला आवडत नव्हती. दर वेळी नकार ऐकून मोदी परत घरी येत. 

मात्र, काहीही करून आपल्याला हे मालिका काढायची असा त्यांचा निर्धार होता. 

सोनी कॉमेडीसाठी सब टिव्हीचे री ब्रॅण्डिंग करण्यात येणार होते. सब टिव्हीचे सीओओ एन पी सिंग यांनी असित कुमार मोदी यांच्याशी बोलून तुम्हाला काही करता येईल का असे विचारले होते. ,मोदी २००२ पासून आपल्या स्क्रिप्टला योग्य दिशा मिळण्याची वाटच पाहत होते. 

२००२ पासून असित कुमार प्रयत्नशील होतेच. २००८ मध्ये सब टिव्हीला त्यांचे म्हणणे पटले आणि मालिकेसाठी करार करण्यात आला. 

सिंग यांना मालिकेची संकल्पना आवडली होती. पण त्यासाठी त्यांच्याकडे बजेट नव्हते. जर मोदींनी हि मालिका केली तर ते तोट्यात जातील अशी भीती त्यांना होती. मात्र, मोदी यांची पत्नी आणि टिम मधील इतर सदस्यांनी त्यांना सांगितलं की, तुम्ही पुढाकार तर घ्या पुढे नक्कीच चांगलं होईल. हे ऐकून मोदी यांनी सिंग यांचे चॅलेंज स्वीकारले आणि तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेला सुरुवात झाली.   

मात्र, असित मोदींचा स्ट्रगल इथं संपला नाही. मालिका तर सुरु झाली. पण पहिल्या काही दिवसांत मालिकेला म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता. घरातील वाद, सासू सुनेचे वाद पाहण्याची सवय असणाऱ्या प्रेक्षकांना कॉमेडी किती पचेल हे सांगता येणार नाही अशी चर्चा सुद्धा सुरु झाली होती. 

तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत हवेली ऐवजी सोसायटी दाखविण्यात आली होती. गोकुळधाम नावाच्या या सोसायटीत वेगवेगळ्या धर्माचे प्रांताचे लोक राहतात, गुजराती व्यापारी जेठालाल गडा आणि त्याची बायको दया, वडील चंपकलाल आणि मुलगा टप्पू. मराठी कुटुंब भिडे, पंजाबी सोढी, साऊथ इंडियन अय्यर, कोलकाताची बबिता, भोपाळचा पत्रकार पोपटलाल अशी अनेक पात्रे यामध्ये आहेत. 

प्रेक्षकांना दोन महिन्यानंतर जाणवायला लागले की, जेठालाल सारखी अनेक पात्र आपल्या आजूबाजूला राहतात. तेव्हा प्रेक्षक मालिकेशी कनेक्ट होत गेले आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत गेली. 

कॉमेडी करणे तसे सोपे काम नाही. यामुळे मालिकेसाठी कास्टिंगचे काम अवघड होते. मालिका, पिक्चर काढतांना कास्टिंगचा सगळ्यात मोठा संघर्ष असतो. असित कुमार मोदी यांना सुद्धा मालिकेसाठी कास्टिंग करण्यासाठी ६ महिन्याचा वेळ लागला.  

रोलसाठी निवडलेला अभिनेता त्या त्या फ्रेम मध्ये योग्य बसायला हवा यासाठी असित मोदी प्रयत्नशील होते. मोदी यांनी दिलीप जोशींसोबत नाटकांमध्ये काम केले आहे. मात्र, त्यांना मालिकेत काम करण्याचा अनुभव नव्हता. टप्पू आणि इतर सगळं मुले नवीन होती. त्यामुळे त्यांच्याकडून अभिनय करून घेणे हे एक प्रकारचा टास्क होता. मात्र, सगळ्यांनी मेहनत घेतली आणि आज तारक मेहता का उलटा चष्मा मालिका देशातील घरांमध्ये पोहचली. 

यात जेठालाल- बबिता, जेठालाल-दया, जेठालाल-चंपकचाचा या केमिस्ट्री जबरदस्त गाजल्या. सासू सुनांच्या भांडणातून नवीन काहीतरी दाखवणारा हा शो होता आणि हि मालिका जेठालालच्या भोवती विनोदी पद्धतीने फिरत असल्याने चांगलीच लोकप्रिय झाली.

जेठालालवर सतत येणारी संकटं आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणारे सोसायटीवाले धमाल आणतात. २०१७ साली या मालिका लिहीणाऱ्या तारक मेहता यांचं निधन झालं पण ही मालिका आजही सुरूच आहे. आतापर्यंत ३५०० पेक्षा जास्त एपिसोड्स प्रसारित करत, या शोनं कित्येक चेहऱ्यांवरचं हसू कायम ठेवलं आहे.  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.