तब्बू आणि स्कॉच जितकी मुरते, तितकी चढते!

आमच्या बॉलीवूड मध्ये हिरॉईनला अमुक अमुक गर्ल म्हणून लाडाची नावं ठेवण्याचा प्रघात आहे. जशी माधुरी ‘धकधक गर्ल’, हेलनजी ‘गोल्डन गर्ल’ तशी तब्बू ‘रुक रुक गर्ल’.

खरं म्हणजे ‘विजयपथ’च्या त्याच नाही तर इतर गाण्यातही उंच, लंबू तब्बू नाच करताना ऑकवर्ड वाटते. ‘मुझे रंग दे’ या ‘तक्षक’ मधल्या गाण्यातही ती उघडी पडते तरीही आमच्या सारख्या फॅन्स ना काही फरक पडत नाही कारण आम्हाला माहीत आहे आमची तबस्सूम हाश्मी त्या ही पलीकडे जाऊन, एक उत्कृष्ट अष्टपैलू अभिनेत्री आहे.

देव साहब ने तब्बूला लाँच केलेलं. हे आठवण्यापेक्षा विसरलेलं बरं इतकी ती छोटी भूमिका वाईट आहे ‘हम नौजवान’ मधली.

तद्नंतर तब्बूची मोठी बहीण फराह सिनेमात आली आणि गाजू लागली. या दोन मुली- बहिणी मात्र अजिबात वाटत नाही. दोघींचे स्वभाव सुद्धा टोकाचे विरुद्ध. फराह बिनधास्त, फटकळ तर तबस्सूम शांत, लाजाळू, भित्री. तब्बूचा ‘प्रेम’ हा बोनी कपूर आणि सतीश कौशिकच्या लाडात ‘रूप की रानी’ सारखाच अडकलेला एक चित्रपट, हीच तिच्या नायिका म्हणून बॉलिवूड मधल्या एंट्रीची दुर्दैवी ओळख. पण त्यातही तिच्या त्या धबधब्यातल्या नागाबरोबर नजरबंदीच्या प्रसंगात बाळीचे पाय पाळण्यात दिसले होते.

तब्बू हैदराबादची. दाक्षिणात्य फिल्म जगात तिचा वेगळा रुतबा आहे, वेगळी पहचान आहे.

राजीव मेननच्या कंडूकोंडाईन कंडूकोंडाईन मध्ये तिची भूमिका सुरेख आहे आणि ऐश्वर्या रायची मोठी बहिण शोभते सुद्धा. शोभते या साठी म्हटलं की तब्बू ही ऐश्वर्या सारखी अचूक सौंदर्य असलेली मुलगी नाही. ती आपल्या आजूबाजूला असलेल्या सामान्य मुलींमध्ये थोडी उठून दिसणारी आहे असं वाटतं. त्यातही मध्यमवर्गातल्या उंच मुली, थोडा गंड बाळगून मागे मागे राहणाऱ्या असतात तशी भिडस्त.

पण जस जसा वक्त अपनी करवट बदलता रहा, आमच्या या थोराड, अवघडलेल्या तबस्सूमचं रूपांतर एका ultimate सेक्सी आणि desirable अशा मदनिकेत होऊ लागलं.

आधीचा उफाड्याचा बांधा आता सुडौल आणि ज्याला आपण voluptuous म्हणतो अशा भारतीय पुरुषांना प्रचंड आवडणाऱ्या फिगर मध्ये तब्दील होऊ लागला. जोडीला जातीवंत अभिनयाची आणि दाट मधाळ आवाजाची जोड आहेच. तब्बूचे चित्रपट मी इथं काउन्ट नाही करणार. गरज नाही.

पण तिला जास्तकरून गंभीर आणि डार्क भूमिकांत हल्ली बघितलं जातं म्हणून आवर्जून सांगेन तिची लाचखोर इन्स्पेक्टर किरण पाटकर फ्रॉम कोहराम धमाल आहे. अमिताभ, नानाच्या टकरीत तब्बू आपला कलीजा खलास करते.

एक गमतीदार वैयक्तिक अनुभव म्हणजे माझ्या बाईलेच्या ऑफिसशेजारी असलेल्या हेल्थ क्लिनिक मध्ये अनेक सेलेब्ज येत असत. एकदा मात्र ती ऑफिसमधून आल्यानंतर अगदी अत्यानंदाने म्हणाली

“तब्बू आली होती.”

तब्बूला पाहून माझी बाईल वेडीच झाली होती इतकी आकर्षक, (आमच्या मुंबईच्या भाषेत रावस) दिसत होती. मी मनात म्हटलं या खुदा तो मर्द लोग का क्या होयेन्गा मॅन?

आमच्यानंतरची एक पिढी सुद्धा तब्बूची फॅन आहे आणि उसासून लिहिते हे पाहिलं की तब्बू बद्दल छान काहीतरी वाटून येतं.

कदाचित तिला वैयक्तिक आयुष्यात इतकं प्रेम मिळालं नसेल इतकं बाहेरची लोक करतात (including इंडस्ट्रीमधले तालेवार दिग्दर्शक) हा पोएटिक जस्टीस असेल… अशी आमची बहुभाषिक (मराठी येतं बरं तिला okay types) आणि खरोखर सुस्वभावी पद्मश्री तबस्सूम हाश्मी!

ती खूप कमी वेळा दिलखुलास हसताना दिसते पण हसली की सेम तिच्या लेजेन्ड्री मावशी सारखी शबानासारखी सुंदर दिसते…

तब्बू आणि स्कॉच जितकी मुरते, तितकी चढते!

जनमदिन मुबारक!

  • गुरुदत्त सोनसूरकर

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.