“तडप तडप” हे फक्त सलमानचं नाही तर आमच्या संपुर्ण पिढीचं ब्रेकअप सॉंग होतं.

वर्ष होतं १९९९. खामोशीच्या यशानंतर संजय लिला भन्साळी एक भव्य सिनेमा बनवत होता. या सिनेमाचासुद्धा नायक सलमान खान होता आणि हिरोईन होती ऐश्वर्या. संजय लिला भन्साळी ज्यासाठी ओळखला जाऊ लागला ते ग्रँड सेट्स, जबरदस्त संगीत,  याची सुरवात या सिनेमापासून झाली होती. पिक्चरचं नाव होतं

हम दिल दे चुके सनम

संजय लिला भन्साळीला संगीताची समज आहे. बाकी काही का असेना त्याच्या सिनेमाच संगीत भारीच असत हे कोणीच नाकारू शकत नाही. खामोशीमध्ये जतीन ललितने ते दाखवून दिलच होतं. पण यावेळी त्याने संगीतकार बदलला. जतीन ललितच्या टीममध्ये व्हायोलीन वाजवणाऱ्या इस्माईल दरबारवर या महत्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी संगीतकार म्हणून  विश्वास टाकण्यात आला.

इस्माईल दरबारने देखील आपल्या आयुष्यातला सगळा अनुभव वापरून जीव तोडून चाली बनवल्या. पण खडूस भन्साळीला पसंत पडून तो फायनल करेपर्यंत जवळपास दोन वर्षे लागली . आता गाणं गाणार कोण हा सुद्धा महत्वाचा विषय होता. कुमार सानू, उदित नारायण हे त्या काळचे सुपरहिट सिंगर्सनां घेण्यात आल होतं. पण एका सॅड सॉंगसाठी गायक ठरत नव्हता.

इस्माईल दरबारने अनेकांचा विचार केला पण त्याला या गाण्यासाठी सूट होईल असा एकही सिंगर पसंत पडत नव्हता. एकदा कुठेतरी त्याला माचिस सिनेमामधलं गाण ऐकायला मिळालं, पहिलीच आर्त साद होती

“छोड आये हम वो गलीया”

गाण ऐकून इस्माईल दरबार शहारून गेला. विशाल भारद्वाजचं संगीत होतं. खर तर हे संपूर्ण गाण जेष्ठ व पट्टीचे गायक हरिहरन आणि सुरेश वाडकर यांनी गायलं आहे. पण फक्त पहिली एकच ओळ वेगळ्या गायकाने म्हटली होती. इस्माईल दरबारने चौकशी सुरु केली हा कोण गायक आहे?

हम दिल दे चुके सनमची गाणी लिहिली होती गीतकार मेहबूबनी. ते म्हणाले,

“अरे ये तो दिल्ली का लडका है. केके या कुछ ऐसाही नाम है उसका. जिंगल्स गाता है.”

दरबारने त्याला भेटायला बोलवलं. कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केके त्याला भेटायला आला. इस्माईल दरबारने त्याला थोडक्यात गाण्याची सिच्युएशन समजावली. गाण्याची चाल ऐकवली. केके म्हणाला,

“हे गाण मला गाता येणं शक्यच नाही. मी गाण्याची ट्रेनिंग घेतली नाही. सहज आवडत म्हणून मी गातो. या गाण्यासाठी तुम्ही एखाद्या शास्त्रीय संगीत येणाऱ्या गायकाला घ्या. ये मेरे बस की बात नही”

इस्माईल दरबार हसला. तो म्हणाला,

“म्युजिक डायरेक्टर मै हुं. किसको क्या गवाना है वो मुझपे छोड दो. मुझे सिर्फ तुम्हारी आवाज चाहिये. उसे कैसे युज करना है वो मेरी जिम्मेदारी.”

अखेर केके तयार झाला. संध्याकाळी गाण्याच रेकोर्डिंग होणार होतं. पण भन्साळी आणि इस्माईल दरबारमध्ये गाण्याच्या निमित्ताने काही तरी वाद चालले होते. रात्र झाली तरी रेकोर्डिंग सुरु होत नव्हतं. वाट बघून बघून केके वैतागला. काही तरी प्रॉब्लेम सुरु होता.

अखेर केकेला सांगण्यात आलं की तू थोडावेळ झोप तुला १ वाजता उठवतो. स्टुडियोमधल्या एका खुर्ची मध्ये तो झोपी देखील गेला. पण सगळ फायनल होईपर्यंत पहाटेचे ४ वाजले. कोणी तरी जाऊन केकेला उठवलं. दचकून जागा झालेल्या केकेला थेट माईकवर उभ करण्यात आलं. माईकसमोर आल्यावर काय जादू झाली माहित नाही पण केकेनं अगदी हेलावून टाकणारं ते गाण गायलं. पहिल्या टेक मध्ये ते ओके देखील झालं.

केके गात होता आणि ते ऐकत उभ्या असलेल्या संजय लिला भन्साळीच्या डोळ्यात पाणी होते. त्यानंतर सलग तीस वेळा त्यानं हे गाण ऐकलं. प्रत्येकवेळी तो रडला. इस्माईल दरबारने केकेच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं,

“ये गाना हिस्ट्री बदल देणे वाला है.”

घडलंही तसच. ऐश्वर्याच्या बाबांनी म्हणजेच विक्रम गोखलेंनी संगीत शिकायला म्हणून आलेल्या सलमानला घराबाहेर काढलं आहे. पांढऱ्या कपड्यातला सलमान आपल्या बगा घेऊन जड पायाने तिथून निघतोय. त्याला फक्त त्या घरातूनचं नाही तर ऐश्वर्याच्या आयुष्यातून ही बाहेर काढण्यात आलंय. हे कळलेली ऐश्वर्या सैरभैर होऊन त्या महालातून धावतीय. झुंबराच्या दिव्याने तिची ओढणी पेट घेतली आहे हे पण तिला ठाऊक नाही. सलमानची आणि तिची शेवटची नजरानजर देखील होते पण भरल्या डोळ्यांनी तो तिला अखेरचा निरोप देऊन निघून जातो.

राजस्थान मधला तो प्रचंड महाल, परत कधीचं भेट होणार नाही म्हणून झोपल्यावर उलटी पडून विलाप करणारी ऐश्वर्या आणि भरून पसरलेल्या वाळवंटातला सलमान. आणि त्याहून भरून वाहणारा केकेचा कापत जाणारा खडा आवाज. थिएटरमध्ये सोडाच पण कधीही कुठेही टीव्ही रेडियोवर हे गाण ऐकलं की अजूनही काळजात कळ उठते.

सलमान खानच आणि ऐश्वर्याचं याच सिनेमावेळी जमलं होतं आणि काही वर्षांनी त्यांचं मोडलं देखील!!

भारतीय फिल्मइंडस्ट्रीमधलं सर्वात हायप्रोफाईल ब्रेकअप.

अख्ख्या देशातील तरुणाई या ब्रेकअपनंतर रडली आणि या रडण्यामागे ब्रेकअप अन्थम होतं तडप तडप. पुढे अनेक वर्षांनी कोणत्या तरी एका गाण्याच्या शो मध्ये सलमानपुढे हे गाण गाण्यात आलं तेव्हा सलमानच्या डोळ्यात देखील पाणी होतं. या गाण्याची जादू कधी कमी झालीच नाही.

खर तर यापूर्वी केकेच आयुष्य सरळसोट राहिलेलं आहे. ठराविक वयात प्रेमात पडला, त्याच मुलीशी लग्न झालं, नोकरी मिळाली, पुढे जास्त काही स्ट्रगल न करता फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. जास्त मोठा सिंगर बनण्याची महत्वाकांक्षा देखील नव्हती. कधी ब्रेकअप वगैरे देखील झालं नव्हत. ती भावना कशी असते हे सुद्धा त्याला ठाऊक नाही पण त्या दिवशी कुठून तो त्या मूड मध्ये गेला हे आजही सांगू शकत नाही. पण एका सबंध पिढीला रडवणार ब्रेकअप सॉंग तयार झालं.

केकेचं आयुष्य तडप तडपमुळे बदलून गेलं. रोज त्याच्याकडे अशीच गाणी येऊ लागली. आधी तर तो खुश झाला पण नंतर त्याला जाणवल की आपण हे गात राहिलो तर टाईपकास्ट होऊन जाईन. त्यानंतर जेव्हा कोणी त्याला कोणी म्हणत की आपके लिये नेक्स्ट तडप तडप गाना बनाया है, आप गायेंगे क्या?”

तेव्हा तो थेट नाही म्हणतो,

“तडप तडप सिर्फ एक ही है. वैसा गाना अब कोई बना भी नही सकता और खुद मै भी कभी गा नही सकता”

त्याने कधी स्वतःच मार्केटिंग केलं नाही, कधी त्याला कोणी गॉडफादर नव्हता, त्याला कधी गाण्याचा अवाॅर्डदेखील मिळाला नाहीत. कधी त्याला गाण्याचा सुपरस्टार म्हटल नाही. कित्येकांना त्याच नाव देखील ठाऊक नसत.

पण शाळेच्या शेवटच्या दिवशी हमखास गायलं जाणार यारो दोस्ती असेल किंवा ओम शांती ओम मधलं आंखो मै तेरी असेल किंवा इम्रान हाश्मीची कित्येक गाणी असतील गेल्या वीस वर्षात गाजलेल्या आणि आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेल्या केकेच्या शेकडो गाण्यांनी त्याची ओळख मिटू दिलेली नाही.

आणि बाकी सोडाचं पण फक्त तडप तडप या गायल्यामुळे तो आमच्या पिढीचा सुपरस्टार आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.