टागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच… 

आधुनिक भारतातील एखाद्या प्रदेशाला जर इतिहास असेल आणि त्या इतिहासातून जर काही ऐतिहासिक तत्व शिकता येत असेल, तर तो मराठ्यांचाच इतिहास होय, असे रविंद्रनाथ टागोर यांनी १९०८ सालच्या आपल्या लेखात लिहले आहे… 

हे वाक्य भानू काळे यांच्या पोर्टफोलियो पुस्तकात देण्यात आलं आहे. पोर्टफोलियो या पुस्तकातून विविध क्षेत्रातील व्यक्तींची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये रविंद्रनाथ टागोर यांच्याबाबत एक लेख आहे. त्यातील एक प्रकरण म्हणजे रवीन्द्रनाथ आणि महाराष्ट्र. या प्रकरणात रविंद्रनाथ टागोर आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध कसे होते हे सांगण्यात आलं आहे, त्यातीलच हा सारांश… 

लहानपणापासून रवीन्द्रनाथांचे महाराष्ट्राशी जिव्हाळ्याचे नाते जडले. याचे कारण त्यांचे थोरले बंधू सत्येंन्द्रनाथ हे पहिली भारतीय आयसीएस. त्यांची नोकरी मुंबई इलाख्यात होती. महाराष्ट्राची त्यांना उत्तम माहिती होती. तुकारामांच्या काही अभंगाचा त्यांनी बंगालीत अनुवादही केला होता. अधूनमधून ते रवीन्द्रनाथांना आपल्यासमवेत राहण्यासाठी बोलवून घेत.

आपल्या ‘छेलेबेला’ या बालपणाच्या आत्मकथेत रवीन्द्रनाथांनी त्या वेळच्या अनेक आठवणी नमूद करुन ठेवल्या आहेत. 

ऑक्टोंबर १८७८ मध्ये रवीन्द्रनाथ प्रथम इंग्लडला गेले. तिथे जाण्यापूर्वी इंग्रजी शिष्टाचार त्यांच्या अंगवळणी पडावेत म्हणून सत्येंद्रनाथांनी त्यांची मुंबई येथे डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खड यांच्या घरी राहण्याची तीन महिन्यांसाठी सोय केली होती. रवींन्द्रनाथ तेव्हा सतरा वर्षांचे होते व तर्खडांची एकोणीस वर्षांची मुलगी अन्नपूर्णा ऊर्फ ॲना हिच्याशी त्यांची यौवनसुलभ मैत्री जमली.

बंगालमधल्या पडदानशीन वातावरणात वाढलेल्या रवीन्द्रला तिने धीट केले. कोवळा रवीन्द्र तिला नलिनी म्हणायचा. शून नलिनी खोल गो आंखी असे एक नाजून गीत त्यांनी तिच्यावर रचले होते. ती म्हणजे कमळ आणि आपण म्हणजे सूर्य असा एक श्लेषही त्यात होता. पुढे ॲनाने एका इंग्रज तरुणाशी लग्न केले आणि दुर्देवाने अल्पवयातच ती वारली पण रवीन्द्रनाथ तिला कधीच विसरू शकले नाहीत.

म्हातारपणी लिहलेल्या आठवणींमध्येही त्यांनी तिचा हळुवारपणे उल्लेख केला आहे. 

मुंबईबद्दल रवीन्द्रनाथांनी लिहले आहे :

जे दृश्य पाहून ह्रदय सर्वांत अधिक तृप्त होते ते म्हणजे येथील स्त्री पुर्षांचा संमिश्र समाज! स्रीवर्जित कलकत्त्याचे दैन्य किती मोठे आहे, ते येथे मुंबईला आल्यानंतरच पाहायला मिळते. 

बंगालमधल्या स्त्रीया त्या काळी शक्यतो पांढरी वस्त्रे वापरत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील स्त्रिया नेसत असलेल्या रंगीबेरंगी वस्त्रांचेही रवीन्द्रनाथांना खूप कौतुक वाटायचे. 

शिवाजी महाराजांचे मोठेपण ते जाणून होते. “शिवाजी उत्सव” ही १८ कडव्यांची दिर्घ, प्रासादिक कविता त्यांनी लिहली. कलकत्त्याच्या टाऊन हॉलमधल्या एका समारंभात १९०४ साली त्यांनी तिचे जाहीर वाचनही केले. शिवाजी महाराजांना मराठी मनाच्या संकुचित कोंदणातून बाहेर काढून रवीन्द्रनाथांनी भारतवर्षांच्या दिव्यभव्य सिंहासनावर, जनगणमनाच्या ह्रद्यसिंहासनावर नेऊन बसवले. 

लोकमान्य टिळकांशीही यांची उत्तम मैत्री होती. आधुनिक भारतातील एखाद्या प्रदेशाला जर इहितास असेल आणि त्या इतिहासातून जर काही ऐतिहासिक तत्व शिकता येत असेल तर तो मराठ्यांचाच इतिहास होय असेही रवीन्द्रनाथांनी १९०८ सालच्या एका लेखात लिहले आहे. 

अठराव्या शतकात बंगालवर मराठ्यांनी अनेक स्वाऱ्या केल्या होत्या. झोप बरं आत्ता, नाहीतर मराठा येईल असा बागुलबुवा आई बाळाला दाखवायची. शहरांच्या बचावासाठी कलकत्ताभोवती १७४२ साली इंग्रजांनी खणलेला वर्तुळाकार खंदक हा त्याच काळातला. त्या वेळच्या कटू आठवणींमुळे अनेक बंगाल्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल एक प्रकारचा आकस होता. तो दूर करायचे मोठे काम रवीन्द्रनाथांनी केले व त्याबद्दल आपण मराठी जनांनी त्यांच्याविषयी कृतज्ञ रहायला हवे. 

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Bajrang Dadaso mane says

    ते काव्य पण हव होत या लेखात

Leave A Reply

Your email address will not be published.