आजही कोल्हापुरातील अनेक घरांमध्ये ताईबाईची परंपरा पाळली जाते…

करवीर नगरी म्हणजे आपल्या कोल्हापुरात बऱ्याच लोकदेवता पुजल्या जातात. लोक माणसांमध्ये लोकसंस्कृती मध्ये त्यांच स्थान अबाधित आहे. लोकदेवता ही संकल्पना लोक आणि देवता या दोन पदांच्या संयोगातून तयार झाली आहे. या लोक दैवतांची उग्र आणि सौम्य अशी दोन रूपे आहेत. आणि प्रत्येक देवतेच्या मागे आख्यायिका दंतकथा असतात.

कोल्हापूरचा व्यापक भूप्रदेश लक्षात घेता इथं बऱ्याच लोक देवता आहेत. पण यात ताईबाई ही लोक देवता करवीरातील बहुतेक घरांमध्ये पुजली जाते.

मध्यवर्ती प्रवाहापासून दूर असणारा, आपली संस्कृती परंपरा रूढी या सर्वांचं निष्ठेने पालन करणारा वर्ग म्हणजे लोक असे म्हणता येईल. लोक माणसाच्या विश्वात दैवतांना अपार श्रद्धेचे स्थान प्राप्त झालं आहे. या लोकदेवता वेगवेगळ्या रुपात असतात.

ताई बाई ही असच एक रूप आहे. संपूर्ण भावकीची एक ताई असते. अरिष्ट आल्यावर भक्त तिला शरण जातात. या देवीला खूष करण्यासाठी काळा किंवा पांढरा अशा एकाच रंगाच्या ६ वस्तू नदीला अर्पण केल्या जातात. ताई बाईची पूजा उघडपणे केली जात नाही. त्यासाठी गुप्तता पाळली जाते.

लोकदेवतांच जस मूर्ती रूपात, तांदळा रूपात, केवळ गोल गोट्यांच्या रूपात तर कधी निव्वळ पाषाणाच्या सुळका रुपात, कधी दगडांचा निव्वळ ढीग असतो.

या ताईबाईच रूप म्हणजे म्हणजे एक दगड असतो. चौकोनी किंवा गोल असा एक दगड. ताईबाई देव्हाऱ्यात पुजली जात नसते तर ती घरात, परड्यात इतरत्र पुजली जाते. तिची रोज हळद कुंकू लावून पूजा केली जाते. मंगळवारी, शुक्रवारी तिची पूजा करून नैवेद्य दाखवतात. अमावस्येला नारळ फोडतात.

ताईबाईची तीन वर्षातून एकदा जत्रा केली जाते. ही जत्रा शक्यतो घरातच भरवली जाते. जत्रेवेळी एक गाभण मेंढी किंवा कोंबडा कापतात. पण हे कोंबडी किंवा मेंढी कापताना आधी एक मोठा खड्डा खनला जातो. त्या बळी दिल्या जाणाऱ्या प्राण्याचे रक्त इतरत्र पडू देत नाहीत. हात धुतलेले पाणी सुद्धा त्याच खड्ड्यात पडायला पाहिजे असा नियम आहे.

हे विधी चालू असताना घरातील मुलींनी ते पहायचे नसतात. सुनांनी पाहिले तरी चालते. कणकेचे दिवे करून ते सर्व घरातून फिरवतात. ताईबाईचा उपवास धरत नाहीत. तिची रोज पूजा केली पाहिजे असेही काही नाही. म्हणजे ही समाधानी आणि तृप्त असणारी देवी आहे.

पण तीन वर्षांनी जर जत्रा भरवली नाही तर घरात कुटुंबियांना त्रास होतो अशी भावना आहे.

या ताईबाईची पूजा करताना मूळ भावना म्हणजे तिच्याविषयी अनेक कल्पना लोकमानसात रूढ आहेत. अदृश्य रूपं संचार करणारी ही ताईबाई तिच्या भक्तांचा संभाळ करते. भक्ताची श्रद्धा जर खूपच उत्कटतेनें बाहेर पडली तर ही ताई बाई देवी प्रकट सुद्धा होते. पण जर तिच्या भक्ताने पाप केलं, नवस फेडला नाही, तर ही देवी क्रोधीत होते. क्रोधीत होऊन शाप देते. त्यामुळेच या देवतांची पूजा ही श्रद्धा आणि भीती या संमिश्र भावनेतून होत असल्याचं दिसत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.