टाटांचा सुद्धा अपमान झाला होता पण त्या अपमानातून त्यांनी ताज हॉटेल उभारलं.

नवी दिल्लीतल्या एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये घडलेला एक प्रकार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. साडी नेसून आलेल्या एका महिलेला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आम्ही फक्त स्मार्ट कॅज्युअल कंपड्यांमध्ये असणाऱ्यांना प्रवेश देतो. साडी हा स्मार्ट कॅज्यूअल प्रकार नाही.  प्रकरण व्हायरल  झाल्यानंतर हॉटेल ची  रेटिंग घसरलेली बघायला मिळाली…असो फक्त साडी नेसली आणि ते स्मार्ट दिसत नसल्यामुळे हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यावरून त्या महिलेला अपमानित करण्यात आलं.

याच निमित्ताने एक गोष्ट आठवली..आपले महान उद्योजक जमशेदजी टाटा यांनादेखील अशाच काहीशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं.   

कधीकाळी हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला म्हणून जमशेदजी टाटा यांनी जगातील सुंदर हॉटेल निर्माण केले.

तेच हॉटेल ज्या हॉटेल मध्ये जाण्याचे, राहण्याचे, खाण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मुंबईत समुद्राच्या किनारी असलेले हे हॉटेल मुंबई ची शान म्हणून ओळखले जाते. जागतिक दर्जाच्या सुंदर अशा ‘हॉटेल ताज’च्या निर्मितीमागे एक रंजक कथा आहे जी प्रत्येक सामान्य माणसाच्या जवळची आहे.

त्याचं कारण म्हणजे जमशेटजी टाटा यांना परदेशातील हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला होता. 

टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांना परदेशातील हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्यामुळे झालेल्या अपमानाचा बदला म्हणून त्यांनी थेट जागतिक दर्जाचे सुंदर हॉटेलच उभारले.

तर झालं असं की,  विसाव्या शतकात जमशेदजी टाटा हे काही कामानिमित्त इंग्लंडमध्ये गेले होते. तेथील एका हॉटेलमध्ये फक्त ‘गोऱ्यांनाच’ प्रवेश आहे असे सांगून त्यांना हॉटेल मध्ये येऊ दिले नाही. आणि मग त्यांनी ठरवले की आपण भारतात असे जागतिक दर्जाचे हॉटेल उभारायचे जेथे कुठलाही भेदभाव नसेल. जिथे भारतीयांसकट कोणीही विदेशी नागरिक येऊ शकेल.

बस्स यानंतरच आजच्या हॉटेल ‘ताज’चा पाया रचला गेला. या प्रकारे भारताची पहिली सुपरलक्झरी हॉटेल अस्तित्वात आले.

या हॉटेलचा पाया १८९८ मध्ये रचला गेला. १६ डिसेंबर १९०३ ला या हॉटेल चे काम पूर्ण झाले. या हॉटेलच्या बांधकामामध्ये सीताराम खंडेराव वैद्य या मराठी वास्तुविशारदाचे देखील महत्त्वाचे योगदान आहे.

त्यावेळी स्वतः टाटा यांनी लंडन तसेच बर्लिन येथे जाऊन वेगवेगळ्या वस्तू हॉटेल साठी जमा केल्या होत्या.  हॉटेलच्या इंटरियर फर्निचरवर देखील त्यांनी बारकाईने लक्ष ठेऊन काम करून घेतले होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात देखील अनेक घडामोडींचे केंद्र हे हॉटेल होते. राष्ट्रीय चळवळीतील दिग्गज नेते येथे बैठका घेत असायचे. हे हॉटेल पहिल्या जागतिक युद्धाच्या दरम्यान ६०० बेडच्या एका सैन्य हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्यात आलं  होतं. त्या काळापासूनच हे एक दर्जेदार हॉटेल म्हणून नावाजले गेले आहे. तेंव्हापासून

तेंव्हापासून आजपर्यंत हॉटेल ताज बद्दल लोकांमध्ये आकर्षण आहे.  नुकतेच आतिथ्य आणि गुणवत्ता यामध्ये हॉटेल ताजला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

दक्षिण आशियातला सर्वात दर्जेदार हॉस्पिटॅलिटी ब्रांड म्हणून देखील ‘हॉटेल ताज महल पॅलेस’ ओळखले जाते.

त्यामुळे भिडू कधीकधी झालेला अपमान हा चांगला असतो. कदाचित याच अशा अपमानातून माणूस कशाची तरी प्रेरणा घेतो. आणि काहीतरी करून दाखवण्याच्या उद्देशाने पेटून उठतो.

त्यावेळी जर जमशेटजी टाटा यांचा अपमान झाला नसता तर कदाचित आज सुंदर आणि भव्य दिसणारे ताज हॉटेल अस्तित्वात नसते…नाही नाही याचा अर्थ असा नाहीये कि, जमशेटजी टाटा यांचा अपमान झाला ते चांगल झालं वेगैरे. तर म्हणण्याचा उद्देश असाय कि, त्यांनी अपमानात कुढत न बसता त्यांनी त्यातून काहीतरी योजना अंमलात आणली आणि त्यातून एक सुंदर कलाकृती जन्माला आली. इतकंच !

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.