खरंतर शाहजहानला ताजमहाल दख्खनमध्ये बांधायचा होता पण…

दख्खनचे प्रवेशद्वार म्हणून नावाजलेले मध्यप्रदेश मधील बुऱ्हाणपूर शहर हे मुघलांचे अत्यंत लाडके शहर होते. उत्तरेकडून दक्षिणेत येतांना मुघल येथे थांबायचे. शहराच्या अलौकीक श्रीमंतीमुळे बुऱ्हाणपूरला मुघलांच्या वैभवाच प्रतीक मानलं जायचं. शाहजहान आणि मुमताज देखील या शहरात बराच काळ वास्तव्यास होते. शहरातील तापी नदीच्या काठी वसलेला शाही किला ही त्यांची प्रिय वास्तू होती.

शाहजहानने फारुकी शासकांच्या ताब्यातून घेतलेल्या या शाही किल्याची डागडुजी करून तिथे ‛दिवाण-ए-आम आणि दिवाण-ए-खास’ या वास्तू बांधून घेतल्या. यासोबतच मुमताजच्या कल्पनेतून साकारलेली  ‛शाही हमाम'(स्नानगृह) ही या किल्यावरील सर्वात देखणी वास्तू. या शाही हमामची आतील सुशोभीकरणाची रचना बघितल्यास तिच्यात आणि ताजमहलच्या रचनेत साम्यता आढळते.

त्यावरून असे लक्षात येते की, ताजमहल साकारण्याची कल्पना ही शाहजहानच्या डोक्यात आधीपासूनच होती. जी की मुघल कलाकृतीचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

पुढे १६ जून १६३१ रोजी मुमताजचा मृत्यू याच शाही किल्यावर झाला. संततीचा मोह न आवरता आल्याने १४ व्या अपत्याला जन्म देते वेळी मुमताजने अखेरचा श्वास घेतलेला. तिचे १४ वे अपत्य मुलगी होती. मृत्यू समयी मुमताजने शाहजहानला दोन वचन मागितले होते.

एक तिच्या मृत्यूनंतर तो दुसरे लग्न करणार नाही आणि दुसरे आपले प्रेमाचे प्रतीक म्हणून एक मकबरा बनवण्याचे.

पण शाहजहानचे त्यातलं फक्त मकबरा बनवण्याचे वचन पळाले. मुमताज मृत्यूनंतर त्याने आणखी तीन स्त्रियांशी लग्न केले होते. मुमताजला बुऱ्हाणपूर मधील जैनाबाद मध्ये दफन करण्यात आलं होतं. इथे ते सहा महिने दफन करून ठेवले होते. प्रेत कुजू नये म्हणून त्याला मडपॅक थेरपी म्हणजेच मुलतानी मातीचा लेप लावून ठेवण्यात आले. पुढे ताजमहल बांधून पूर्ण झाल्यानंतर ते प्रेत आग्र्याला नेऊन तिथे दफन करण्यात आले.

तेव्हा मुमताजला दिलेल्या वचनाप्रमाणे शाहजहानला ताजमहल बुऱ्हाणपूर मध्येच तापी नदीच्या काठी बांधायचा होता. पण ते शक्य होऊ शकले नाही. त्यामागे वेगवेगळे कारणे सांगितली जातात. कुणी म्हणत की, तापी नदीच्या काठावर ताजमहल बांधण्याचे काम सुरूही झाले होते. त्यात ताजमहलचा बेस तयार करण्यासाठी लाकडाचा वापर करण्यात आला होता, पण लाकडाला वाळवी लागण्याचा धोका असल्याने ते कार्य अर्ध्यावरच सोडून दिले.

तर दुसरे कारण असे सांगितले जाते की, तापी नदीला पूर येण्याचा धोका असतो. जर असा पुराचा धोका नसता तर जयपूर वरून संगमरवरी दगड आणणे शक्य झाले असते आणि प्रेमाचे प्रतीक असलेला ताजमहल बुऱ्हाणपूर मध्ये तापी नदीच्या काठावर उभा राहिला असता. पण दुदैवाने असे होऊ शकले नाही आणि शेवटी शाहजहानने ताजमहल आग्र्याला जाऊन बांधला.

इथले स्थानिक लोकं सांगतात की, मुमताजचे प्रेत आग्र्याला घेऊन घेऊन तर गेले पण अजूनही तिचा आत्मा इथंच भटकतो. तिला दफन केलेले त्याठिकाणी म्हणजे मुमताज महल मध्ये विचित्र आवाज ऐकू येतो. रात्रीच्या वेळी महालात जाण्याची कुणाची हिंमत होत नाही. पण आजपर्यंत तिच्या आत्म्याने कुणालाच कसल्याही प्रकारचा दिला नसल्याचंही ते सांगतात. आता यात किती सत्यता आहे तिथल्या लोकांच माहीत. पण तिथल्या लोकांच्यात मुमताज बद्दल आत्मीयता आहे.

गेली पन्नास वर्षे मुमताज महलच्या नावाचा फेस्टिवल बुऱ्हानपूरमध्ये साजरा होतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.