जावेद जाफ्रीची टपोरी भाषा, जपानी गेम्सचा तडका; ‘ताकेशीज कॅसल’ हा बाप विषय परत येतोय

टीव्हीवर एक माणूस दिसतोय, जो फुल स्पीडमध्ये एका टेकाडावरुन उतरतो. त्याच्यासमोर असतंय तळं आणि त्याच्यावर काही दगडं. हे भिडू असलं पळत येतं आणि दणादणा त्या दगडांवर उड्या मारत पलीकडे जातं. याच्यानंतर एक ताई येतात, या पहिल्या दगडावर उडी मारतात आणि थांबतात, दुसऱ्या दगडावर उडी मारतात आणि तो दगड निघतोय नकली. ताई थेट पाण्यात. बरं दादा आणि ताई जपानीज, तो शो मधला गडी काय बोलतोय हे आपल्याला कळत नाय आणि मागून ओळखीचा आवाज येतोय. 

ते पण काय दिवस होते… शाळा, क्लास, खेळ, घरचा अभ्यास असं सगळं संपवून टीव्हीसमोर बसायचं आणि आईच्या सिरीयल आधी हा शो पटकन बघून घ्यायचा, ज्याचं नाव होतं… 

ताकेशीज कॅसल आणि तो ओळखीचा आवाज होता जावेद जाफ्रीचा!

पोगो चॅनेलवर लागणारं ताकेशीज कॅसल बघत कित्येक जण लहानाचे मोठे झाले. एवढंच नाय तर, लॉकडाऊनमध्ये आलेल्या कंटाळ्यालाही ताकेशीज कॅसलनंच उतारा दिला होता. आता आम्ही हे सगळं तुम्हाला का सांगतोय? अहं उगाच हवेत गोळीबार नाही. विषय असाय की, ताकेशीज कॅसल पुन्हा आपल्या भेटीला येतंय. शोचा अंदाज नवा आहे, शो पोगोवर नाय तर मेझॉन प्राईमवर लागणारे… 

पण एक गोष्ट मात्र कायम आहे ती म्हणजे जावेद जाफ्रीचा आवाज.

बातम्यांनुसार २०२३ पासून हा शो दिसायला लागणार असला, तरी या ताकेशीज कॅसलचा इतिहास, भूगोल आणि सामान्य ज्ञान आपल्याला माहिती पाहिजेच. तेवढंच कट्ट्यावर ज्ञान पाजळायला बरं पडतंय.

ताकेशीज कॅसल नेमकं होतं काय? 

माहीत नसेल तर तुमचं आयुष्य व्यर्थ आहे गड्यांनो. तुमचा बॅकलॉग भरुन काढायलाच हे लिहिलंय असं समजा, जर पाहिलं असेल तर जरा नॉस्टॅलजियाची ट्रिप करुन या. तर ताकेशीज कॅसल हा एक जपानीज गेम शो होता. याचे मेन कॅरॅक्टर होते, जनरल टानी (आपल्याकडं याला जनरल ली म्हणायचे) आणि ताकेशी किटानो.

या गेममध्ये एकावेळी जवळपास १२० कार्यकर्ते भाग घ्यायचे. मग या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या गेम्स खेळाव्या लागायच्या. दगडांवर उड्या मारावं लागणारं स्टेपिंग स्टोन्स, भुलभुलैय्याची आठवण करुन देणारं हनी कोम्ब मेझ, पार्श्वभाग आणि पाठीवर तोफेतून येणाऱ्या बॉलचे दणके देणारं ब्रिज बॉल, ते पोल वरुन उडी मारायची गेम असं लय काय काय होतं.

हा गेम ओरिजिनल जपानचा. १९८६ ते १९९० मध्ये हा शो जपानच्या टीव्हीवर दिसला. 

त्यातही १४ एप्रिल १९८९ ला या शोचा लास्ट एपिसोड टेलिकास्ट झाल्याचं सांगण्यात आलं खरं, पण १९ ऑक्टोबर १९९० पर्यंत आठवड्याला चार का होईना पण एपिसोड्स दाखवले. आपल्याकडं चार दिवस सासूचे किती वर्ष दाखवली, आपण मुकाट सहन केलं. तिकडं एवढा बाप शो असूनही, चार वर्षांत कल्टी हाणली.

ते कोणतर म्हणालेलं, क्वालिटी ओव्हर क्वान्टिटी… जपानी लोकांनी अगदी परफेक्ट वापरलं.

ताकेशीज कॅसल इतकं हिट झालं, की स्पॅनिश, इटालियन, इंग्लिश, ब्राझिलियन अशा लय भाषांमध्ये डब झालं आणि लोकांना आवडलंही. अमेरिकेत दाखवल्या जाणाऱ्या शोमध्ये लय डल्ट जोक्स असायचे. तसंच आपल्याकडे आलं असतं, तर फॅशन टीव्हीमुळं अंगावर येणाऱ्या काट्यासमोर अजिबात चाललं नसतं.

पण भारतात शो आलाच पोगो चॅनेलवर. ऑसवल्ड, नॉडी बिडी कार्टून जिथं बघायचो तिथं आता हा गेम शो आला. १ मार्च २००५ ला डॉट ७.३० वाजता पहिल्यांदा भारतीय लोकांनी जपानी लोकांना पडताना, उड्या मारताना पाहिलं आणि तिथून नाद लागला तो लागलाच. सोमवार ते गुरुवार, संध्याकाळच्या आत पोरं अभ्यास उरकून टीव्हीसमोर बसायची. 

पण भारतात ताकेशीज कॅसल हिट व्हायचं श्रेय फक्त एकाच माणसाला जातं…

जावेद जाफ्री.

जेव्हा हा शो भारतात आणि तेही लहान मुलांसाठी आणायचं ठरवलं, तेव्हा साहजिकच याचा जॉनर कॉमेडी असणं लय महत्त्वाचं होतं. जावेद जाफ्रीकडं हे काम गेलं, तेव्हा त्याला समजलं की, 

‘आपल्याला याचे कमी पैशे मिळतील. पण जरा वेगळं काम आहे तर करुन बघू.’ भावानं बाबा खान नावाच्या सहकाऱ्यासोबत आऊटलाईन काढली, काही डायलॉग्सही लिहिले.

पण टीव्हीवर आपण जे पाहिलं, ते जावेद जाफ्रीनं लय बाप डेव्हलप केलं होतं. 

तो काय करायचा, पहिल्यांदा तो शो बघताना, त्याला जे काय वाटायचं, त्याच रिऍक्शन रेकॉर्ड करायचा. त्यामुळंच आपल्याला जावेद जाफ्रीच्या टपोरी भाषेतल्या ओळी ऐकायला लय भारी वाटायचं. 

समजा एखादं गडी तोंडावर आपटलं की जाफ्री त्याचा व्हिडीओ परत दाखवायचा आणि ‘जेजे का रापचिक रिप्ले’ म्हणत त्याची लय घाण मापं काढायचा. मध्येच बच्चनचा आवाज काढ, शाहरुखचा आवाज कधी असं करत जावेद जाफ्रीनं कित्येक वर्ष आपल्याला अगदी भरपूर हसवलं.

ताकेशीज कॅसलमध्ये कधी कोण जिंकायचं काय..?

तुम्हालाही प्रश्न पडला असेल, तर डोळे फाडून वाचा. इतर गेम्समध्ये बाद न झालेले कार्यकर्ते फायनल शोडाऊनमध्ये जायचे. तिकडं आधी पाण्याच्या गननं कॅसलच्या गाड्यांवर लावलेलं कवच फोडायचं. सगळ्या टीमनं मिळून फोडलं की, पैशे त्यांच्यात वाटले जाणार. मग त्यांनी लेझर बीमची स्कीम आणली, यात जर कुणी ताकेशी मंडळांच्या गाडीच्या बीमला गोळी हाणली, तर तो एकटा गडी बादशहा. आणि या बादशहाला मिळायचे १ मिलियन येन!

आतापर्यंत ८ लोकांनी ताकेशीज कॅसल जिंकलंय. हाताखाली कीबोर्ड आहे भावांनो, खोटं नाय बोलणार… इतके वर्ष ताकेशीज कॅसल बघितलं पण एकालाही जिंकताना पाहिलं नाही.

आता पुन्हा लागणारं ताकेशीज कॅसल काय कमाल करतं आणि जावेद जाफ्री आपल्याला सगळी टेन्शन विसरायला लावतो का..? हा प्रश्न आहे खरा… पण जाफ्री भिडूनं आपल्याला आधीच सांगितलंय…

ईगेssssssssss (अर्थ आम्हाला पण माहित नाय, ऐकायला भारी वाटायचं.)

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.