म्हैसूरच्या राजाला शाप लागला आणि एक अख्खं गाव वाळवंटात बुडालं.

आपला देश एक दंतकथा आहे. इथे पावलोपावली चमत्कार आणि रहस्य बघायला मिळतात. अनेक चमत्कारामागे एखादी पौराणिककथा सांगितली जाते. या पौराणिककथा किती खऱ्या किती खोट्या हे आपल्याला माहित नसत पण त्याच गूढ प्रत्येकाला आकर्षित करत असत.

असच एक रहस्यमय गाव आहे तलाकाडू.

या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे हे एक वाळवंट असलेलं गाव आहे. तुम्ही म्हणाल त्यात काय आश्चर्य. राजस्थानमध्ये अशी अनेक गावे आहेत. तर गंमत म्हणजे हे गाव राजस्थानमध्ये नाही तर कर्नाटकात आहे.

दक्षिण कर्नाटकात बंगलुरुपासून साधारण १३३ किलोमीटर अंतरावर म्हैसूर जिल्ह्यात कावेरी नदीच्या तीरावर तलकड किंवा तलाकाडू हे गाव वसलं आहे.

कृष्णा कावेरीच्या सुपीक हिरव्यागार खोऱ्यात अचानक हे वाळवंटी गाव कुठून उगवलं हा प्रश्न पडला असेल ना.

त्यासाठी आधी या गावाचा इतिहास जाणून घ्यावा लागेल.

याची सुरवात शेकडो वर्षांपूर्वी होते. या भागात दोन भाऊ होते. तल आणि कड. हे दोघेही लाकूडतोडण्याच काम करायचे. एकदा जंगलात त्यांना एक झाड दिसल जिथे रानटी हत्ती पूजेसाठी येत असत. हे नेमक झाड कसल म्हणून त्यांनी त्यावर कुऱ्हाड चालवली तर त्या बुन्ध्यातून रक्त वाहू लागलं. तुटलेलं झाड पुन्हा पूर्ववत झाल.

तेथे त्यांना एक महादेवाची पिंड सापडली.

या दोघां भावांच्या नावावरून गावाला नाव पडल तलाकाडू.

या गावाचा उल्लेख स्कंध पुराणात देखील आढळतो. हजारो वर्षापासून तलाकाडू आपल्या वैद्येश्वराच्या शिवमंदिरासाठी प्रसिद्ध होते. येथे प्रार्थना केल्यास सर्व रोग बरे होतात अशी लोकांची श्रद्धा होती. त्यामुळे दूरदूरवरून लोक दर्शनासाठी येत.

या गावावर चोळ राजां पासून होयसळ राजांपर्यंत अनेकानी राज्य केलं.

भरपूर मंदिरे बांधली. चौदाव्या पंधराव्या शतकात हे गाव एक महानगर बनलं होतं.विशेषतः विजयनगर साम्राज्यावेळी तलाकाडू भरभराटीस आलं. शेकडो लोक या शहरात राहत असत.

एकदा विजयनगरच्या राजघराण्यातील श्रीरंगपट्टणमचा राजा रंगराया आपला असाध्य रोग बरा व्हावा म्हणून तलाकाडूला देवदर्शनासाठी आला होता. तिथे गेल्यावर त्याची प्रकृती आणखी बिघडली. अखेरचा श्वास घेत असलेल्या राजाला भेटण्यासाठी त्याची बायको आलामेलम्मा तलाकाडूला निघाली.

जाताना तिने श्रीरंगपट्टणमचा कारभार आपल्या मांडलिक असणाऱ्या म्हैसूरच्याकडे म्हणजेच राजा वडियार याच्या कडे सोपवला.

वडियार राजा प्रचंड लालसी व महत्वाकांक्षी होता. 

त्याने श्रीरंगपट्टणमच्या राज्यावर कायमचा कब्जा बनवला. शिवाय तलाकाडूला गेलेल्या राणी अंगावरील जवाहिरे, दुर्मिळ मोती, हिऱ्याचे दागिने आणण्यासाठी सैनिकांना तलाकाडू येथे पाठवलं.

नुकताच आपला नवरा गमावलेल्या विधवा राणीवर हे हत्यारबंद सैनिक चालून आले. त्यांचा हेतू ओळखून राणीने आपल्या पदरात आपले सगळे दागिने बांधून घेतले व पैलतीरावर मलांगी येथे कावेरी नदीत उडी मारून प्राणार्पण केले. मात्र मरण्यापूर्वी तिने एक शापवाणी केली की,

“तलाकाडू रेतीने भरून जाईल आणि वडीयार राजा निर्वंश होईल”

त्यानंतर कावेरी नदीने आपले पात्र बदलले व तलाकाडू गाव वाळवंटात लुप्त होऊन गेलं.

ही घटना घडली साधारण १६१० साली. त्यानंतर आजवर म्हैसूरच्या वाडीयार राजघराण्यात १९ राजे होऊन गेले आहेत मात्र त्यापैकी फक्त ७ जणांनाच पुत्रप्राप्ती झाली. उरलेल्या इतर राजांनी आपल्या भावांकडे किंवा दत्तक मुलाकडे सत्ता सोपवली. अगदी २०१३ मृत्यू झालेले श्रीकांतदत्त नरसिंह वडीयार यांना देखील मुल नव्हते. पण त्यांच्या दत्तक मुलाला म्हणजे सध्याचा राजा यदुवीर याला एक पुत्ररत्न झालेलं आहे.

काही जण म्हणतात की या मागे शाप तर आहेच पण बरोबर जेनेटिक प्रॉब्लेम देखील असू शकतो. कारण वडीयार राजांमध्ये आपल्या जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न करण्याची प्रथा आहे. यामुळे देखील त्यांना मुल होत नसावे.

हीच गोष्ट वाळवंटाची.

तलाकाडूच्या या स्थिती मागे पर्यावरणीय बदल व भौगोलिक कारणे आहेत अस अभ्यासकांचे म्हणणे आहे. पंधराव्या शतकात विजयनगर साम्राज्यात कावेरी नदीवर पहिले धरण बांधले गेले यामुळे नदीचा वाळू साठा या भागात येऊन पडू लागला असा एक अंदाज सांगितला जातो.

तर काहींच्या मते भौगोलिक दृष्ट्या किनारपट्टीवरच्या तीव्र वादळांमुळे वाळूच्या लाटांनी मंदिरांवरती थरा वर थर लावले, बाजूस वाळूच्या टेकड्या (सण्ड-ड्यून्स) तयार झाल्या. कित्येक वर्ष , ९ ते १०फूट, वर्षाला असे वाळूचे थर चढले जात होते अन तिथल्या वस्तीला मागे-मागे हटवत होते.

कारण काही का असेना गेली तीनशे वर्ष प्राचीन तलाकाडू नगर आणि त्यातली सुरेख मंदिरे वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली.

दरवर्षी पुरातत्व खात्यामार्फत येथे उत्खनन होते व त्यातून वाळवंटातली मंदिरे बाहेर काढली जातात.

तलाकाडू एकेकाळी भरपूर समृद्ध होते, शेतीसाठी कावेरी नदीतून कालवे काढण्यात आले होते, येथील होयसळकालीन मंदिरे, विजयनगर कालीन मठ हे अतिशय सुंदर व आपल्या कोरीव नक्षीकामासाठी प्रसिद्ध होते हे उत्खननामध्ये दिसून येते.

पण किती जरी प्रयत्न केले तरी दरवर्षी वाळूचे थर पुन्हा रचले जातात व ही मंदिरे पुन्हा वाळवंटात बुडून जातात.

नव्या तलाकाडू मध्ये राहणाऱ्या लोकांना देखील या वाळूचा त्रास होतो. हळूहळू हे वाळवंट पसरतच चालले आहे. आज देखील तेथील नागरिक वैद्यनाथ मंदिराबाहेर असलेले तल व कडची पाषाणमय मूर्ती दाखवतात व आलामेलम्मा राणीच्या गूढ शापाचा परिणाम गावाला भोगावा लागणार हे सांगत असतात.

आता या लोकांच्या श्रद्धा अंधश्रद्धा जरी असल्या तरी वैज्ञानिकदृष्ट्या देखील या लुप्तनगरीच हे गूढ रहस्य पूर्णपणे उलगडले आहे अस म्हणता येणार नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.