अरविंद डिसिल्व्हा आवडायचा की त्याचा राग यायचा हे अजून समजलं नाय

तारीख- १३ मार्च, १९९६. ठिकाण- ईडन गार्डन्स, कोलकाता. क्रिकेट आवडत असेल तर या दिवशी काय झालेलं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. भारत जिंकेल असं वाटत असताना स्पर्धेतून बाहेर गेला, ईडन्सवर जाळपोळ झाली आणि विनोद कांबळीला हमसून रडताना सगळ्या जगानं पाहिलं.

आपण सामान्य लोकं क्रिकेट बघतो चार घटका मन रमावं म्हणून. जिंदगीत दहा ठिकाणी आपलं हरून झालेलं असतं त्यामुळे क्रिकेटमध्ये टीम जिंकली की आपण स्वतः जिंकल्यासारखा आनंद होतो.

मॅच हारलेलं काय लय लक्षात राहत नाही, पण १३ मार्च १९९६, ईडन गार्डन्स, आपण आयुष्यात विसरत नसतोय. आणि आणखी एका माणसाला आपण आयुष्यात विसरत नसतोय- अरविंदा डी सिल्व्हा.

१९९६ च्या वर्ल्डकप सेमीफायनलचा दिवस. भारत विरुद्ध श्रीलंका. लंकेची पहिली बॅटिंग. सनथ जयसूर्या आणि रोमेश कालुवितरणा ही जोडी मैदानावर आली. आपल्याला आवडणाऱ्या पोरीच्या भावांची जितकी भीती वाटत नसेल तितकी भीती त्याकाळी या दोघांची वाटायची. पहिल्या १५-२० ओव्हर्स हाणामारी होणार हे फिक्स वाटत होतं. आपला जवागल श्रीनाथ म्हणजे शांतीत क्रांती. भावानं पहिल्याच ओव्हर्समध्ये दोघांच्या विकेट काढल्या आणि इकडं सगळ्या भारतात जल्लोष सुरू झाला.

स्कोअर होता २ विकेट १ रन. मग मैदानात आला ५ फूट ४ इंच उंचीचा प्लेअर. हातात थोडी लांबलचक बॅट, सुटलेलं पोट आणि नजरेत थंडपणा असलेला अरविंदा डी सिल्व्हा. त्याचा जोडीदार असंका गुरुसिन्हा बॅट नुसतीच घुमवत होता. त्यामुळं भारतीय चाहते जरा निवांत झाले. डी सिल्व्हा स्ट्राईकवर आला आणि पहिल्या बॉलपासून तुटून पडला. श्रीनाथ, प्रसाद, कुंबळे, तेंडुलकर कुणालाच सुट्टी मिळाली नाही. भारतीय चाहत्यांचे डोळे फक्त क्रीझवरुन हवेत आणि मग प्रेक्षकांमध्ये असे हलत होते.

डी सिल्व्हात रावण दिसायला लागला, कारण त्यानं ४७ बॉलमध्ये ६६ रन्स मारले. जयसूर्या-कालू परवडले असते असं म्हणायची वेळ आली. खांदे पडलेल्या भारताच्या बॉलर्सला रोशन महानमा, रणतुंगा, तिलकरत्नेनं पण धुतलं आणि लंकेनं २५१ रन्सची पावती फाडली.

लंकेच्या बॉलर्सनं आपल्या बॅटिंगचा पार सासुरवास केला. तेंडल्या ६५ करून गेला आणि टीव्ही बंद झाले. मग जाळपोळ, कल्ला, कांबळीचं रडणं असे विषय झाले. भारत हरला, लंका फायनलला गेली आणि अरविंदा डी सिल्व्हाचा शप्पथ लय घाण राग आला.

आता लंका आपल्या शेजारचा देश. बांधला बांध लागत नसला तरी, पूल लागतोच. आणि नाय म्हणलं तरी खडूस ऑस्ट्रेलिया जिंकण्यापेक्षा लंका जिंकलेली बरी, म्हणून फायनल मन लावून पाहिली. तिकडं ऑस्ट्रेलिया पण हाणायला सुरू झाली. मार्क टेलर आणि पॉन्टिंग शंभर लावणार असं वाटत होतं. रणतुंगाचा विश्वास सार्थ ठरवत डी सिल्व्हानी दोघांच्या विकेट्स काढल्या. हाण तिज्यायला, म्हणत भारतीय फॅन्स खुश झाले. इयान हिलीची विकेट काढत त्यानं सिक्वेन्स लावला आणि लंकेला २४२ मारून कप घरी न्यायचा चान्स दिसला.

ऑस्ट्रेलियाचे बॉलर्स काय किरकोळ नव्हते. मॅकग्रा, वॉर्न, फ्लेमिंग इथंच डोक्याला हात मारावासा वाटतो. जयसूर्या-कालू जोडी नेमकी फेल गेली. डी सिल्व्हा तेच सुटलेलं पोट, लांबलचक बॅट, थंड नजर घेऊन मैदानात आला. यावेळीही डोक्यात जिंकण्याचं पक्कं होतं. तो म्हणला असंल भाऊ भारत झाला आता कांगारूंना कशाला सोडा. त्यानं त्यांचाही कचरा करायला घेतला. गुरुसिन्हासोबत त्यानं भक्कम पार्टनरशिप केली. तो आऊट झाल्यावर रणतुंगा आला. आपल्या सेनापतीसोबत निकराची लढाई लढायची संधी सगळ्यांना मिळत नाही, डी सिल्व्हाला मिळाली.

त्या मॅचमध्ये त्यानं नॉटआऊट शतक लावलं. ऑस्ट्रेलियन टीमला हताश होताना पाहण्याचं सुख त्यादिवशी मिळालं. डी सिल्व्हानं नॉटआऊट १०७ रन्स केले. तीन विकेट्स घेतल्या, दोन कॅचेस घेतले. त्यानं त्याच्या देशाला वर्ल्डकप जिंकवून दिला.

लंका जिंकली तेव्हा त्यांच्या देशातलं वातावरण फार चांगलं होतं असं नाही. दहशतवाद, गरीबी अशा लाख गोष्टी होत्या. तिथल्या सामान्य माणसाचं जिंदगीत दहा ठिकाणी हरून झालेलं होतं, त्यांना ते स्वतः जिंकल्यासारखा आनंद झाला. या विजयाचं जितकं क्रेडिट कालू, जयसूर्या आणि रणतुंगाला मिळतं तितक डी सिल्व्हाला मिळत नाही, हे दुर्दैव!

आणि शेठ डी सिल्व्हा एवढ्यापुरता लिमिटेड नाही बरं का! त्याच्यासारखा पूल रोहित शर्माही मारत नाही, त्याच्यासारखा स्वॅग सेहवागकडं पण नाही. चेहऱ्यासमोर जाळी नसलेलं हेल्मेट फक्त त्यालाच शोभून दिसायचं. रणतुंगा, जयसूर्या, वास, मुरली, हेरथ, संगा, माहेला, मलिंगा हे लय नाद क्रिकेटर्स ओ, पण लंकेचा सुपरस्टार एकच – अरविंदा डी सिल्व्हा!

एक गोष्ट मात्र खरी, आपल्याला हरवलं म्हणून त्याच्यावर चिडावं का आपलं बालपण भारी केलं म्हणून जीव टाकावा हे काही अजून समजलं नाही!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.