जीव वाचवणं शक्य असूनही नौसेनेची परंपरा जपण्यासाठी त्यांनी हसत-हसत जलसमाधी घेतली!

 ‘वतन के आगे कुछ नहीं, खुद भी नहीं’

मेघना गुलजारच्या ‘राजी’ सिनेमातील या डायलॉगमागे जी भावना आहे, काहीशी तशीच भावना त्या दिवशी भारतीय नौसेनेचे कॅप्टन महेंद्र नाथ मुल्ला यांची असावी.

रिटायर मेजर जनरल इआन कार्डोजो यांनी लिहिलेल्या, “द सिंकींग ऑफ आयएनएस खुकरी: सर्व्हाइव्हर्स स्टोरीज” या पुस्तकात कॅप्टन महेंद्र नाथ मुल्ला यांच्या अद्भूत साहसाची आणि मातृभूमीसाठी त्यांनी केलेल्या उच्च कोटीच्या त्यागाची कहाणी वाचायला मिळते.

ती तारीख होती ९ डिसेंबर १९७१.

दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच असं घडलं होतं की एका पाणबुडीने एक युद्धनौका बुडवली होती. पाकिस्तानच्या ‘पीएनएस हंगोर’ या पाणबुडीने भारतीय नौसेनेची ‘आयएनएस खुकरी’ ही युद्धनौका बुडवली होती. बुडालेल्या ‘आयएनएस खुकरी’ बरोबरच भारतमातेचे वीर सुपुत्र, भारतीय नौसेनेचे कॅप्टन महेंद्र नाथ मुल्ला यांनी देखील नौसेनेच्या त्यागाच्या सर्वोच्च परंपरेचं पालन करताना हसत-हसत देशासाठी शहीद होण्याचा मार्ग निवडला होता.

आपले प्राण वाचविण्यासाठी जहाज सोडायची नाही, हा काही नौसेनेचा लिखित आदेश नाही. पण बुडत्या जहाजातून कॅप्टनने पळ काढायचा नाही ही भारतीय नौसेनेची परंपरा.

याच परंपरेच्या संरक्षणार्थ कॅप्टन महेंद्र नाथ मुल्लांनी जहाजातून बाहेर पडणं शक्य असून देखील तसं न करता देशासाठी शहीद होऊन नौसेनेच्या अतिउच्च शौर्याच्या आणि त्यागाच्या परंपरेला आपल्या बलिदानाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.

कॅप्टन महेंद्र नाथ मुल्लांनी स्वतः शहीद होण्याचा मार्ग पत्करला, मात्र आपले प्राण देऊन त्यांनी आपल्या अन्य साथीदारांचा जीव वाचवला. त्यांच्या या कृतीने देशाच्या इतिहासात ते अजरामर झाले. मृत्यूनंतर त्यांना महावीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं.

नेमकं झालं काय होतं..?

१९७१ सालच्या भारत-पाक युद्धाचा तो काळ.

भारतीय नौसेनेला बातमी मिळाली होती की  ‘पीएनएस हंगोर’ ही पाकिस्तानी पाणबुडी अरबी समुद्रातील भारतीय क्षेत्रात येऊन दाखल झालीये. त्यामुळे ही पाणबुडी तत्काळ बुडविण्याचे आदेश नौसेनेकडून देण्यात आले होते.

‘पीएनएस हंगोर’ बुडविण्याची जबाबदारी होती ‘आयएनएस खुकरी’ आणि ‘आयएनएस कृपान’ या युद्धनौकांवर.

‘आयएसएस खुकरी’चे कॅप्टन होते महेंद्र नाथ मुल्ला.

आदेश मिळताच या दोन्हीही युद्धनौका आपल्या कामगिरीवर निघाल्या. भारतीय युद्धनौका आपल्या दिशेने येत असल्याची चाहूल लागताच पाकिस्तानच्या पाणबुडीने या युद्धनौकांवर तारपीडोने हल्ला केला. तारपीडोचा पहिला हल्ला तर फेल गेला, मात्र दुसऱ्या हल्ल्यामुळे ‘आयएसएस खुकरी’ला आग लागली.

आता जहाज वाचवणं शक्यच नाही, हे ज्यावेळी लक्षात आलं तेव्हा कॅप्टन मुल्लांनी जहाजातील आपल्या सहकाऱ्यांना  वाचविण्यासाठी जहाज खाली करायचा निर्णय घेतला. त्यांनी सैनिकांना जहाजाच्या बाहेर उड्या टाकण्याचे आदेश दिले.शक्य होईल तेवढ्या सहकाऱ्यांना वाचविण्यासाठी कॅप्टन मुल्लांनी आपला जीव पणाला लावला. त्यांच्या प्रयत्नामुळे नौसेनेचे ६ अधिकारी आणि ६१ सैनिक अशा ६७ जणांना जहाजाच्या बाहेर काढण्यात यश आलं.

या सगळ्यांनी अरबी समुद्रात उड्या टाकल्या. त्यांना दुसऱ्या दिवशी ‘आयएनएस कटचल’च्या मदतीने सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं.

कॅप्टन मुल्लांनी मात्र जहाजाच्या बाहेर उडी न टाकता समुद्रात बुडत्या जहाजासोबतच जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला. कॅप्टन मुल्ला यांच्याबरोबरच १७८ भारतीय सैनिकांना त्या रात्री या बुडत्या जहाजाबरोबर जलसमाधी प्राप्त झाली.

१९७१ च्या युद्धात ‘आयएनएस खुकरी’ ही  एकमेव युद्धनौका होती, जी भारतीय नौसेनेला गमवावी लागली.

पण पुढे भारतीय नौसेनेने पराक्रमाची पराकाष्ठा करताना पाकिस्तानी नौसेनेचा धुव्वा उडवला आणि या युद्धात पाकिस्तानला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. बुडणारं जहाज आणि आपला मृत्यू समोर दिसत असताना कॅप्टन मुल्ला मात्र आपल्या खुर्चीवर शांतपणे बसलेले होते. त्यांच्या हातात एक जळती सिगरेट होती, आणि चेहऱ्यावर हास्य.

हे ही वाच भिडू.