शेताच्या बांधावर असणारी झाडे पुर्वी सरकारच्या मालकीची असत, बापूंमुळे ती शेतकऱ्यांच्या मालकीची झाली

राजारामबापूंची ओळख म्हणजे पदयात्री. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मागण्यांसाठी राजारामबापू पदयात्रा काढत. ऑक्टोंबर महिन्यातल्या रणरणत्या उन्हात त्यांनी सलग दहा दिवस सांगली ते उमदी अशी पदयात्रा काढली होती. दुष्काळी भागात पायी जावून त्यांचे प्रश्न मांडले होते.

नळ होते पण पाणी नव्हते अशी स्थिती. अशा सर्व गावात जावून बापूंनी संबधित प्रश्न मांडले. नळ योजना सुरू करायला प्रशासनाला भाग पाडले. 

त्याच वर्षात शेतमजुरांच्या मागण्या मान्य करण्यासाठी इस्लामपूरच्या तहसील कार्यालयावर बापूंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा निघाला होता. त्यावेळी बापूंना अटक करण्यात आलं होतं. 

बापूंचा सिकंदर ड्रायव्हर.

बापूंचा ‘सिकंदर’ नावाचा एक ड्रायव्हर होता. एकदा बापूंना पुण्याला नेऊन सोडायचे व पुण्यापासून पहाटेच्या डेक्कनने बापूंना मुंबईला जायचे होते. बापूंना सिकंदर ड्रायव्हर १२ च्या सुमारास पुण्याचा सर्किट हाऊसला घेऊन गेले आणि झोपण्यापूर्वी सिकंदरला पहाटे ४ वाजता गाडी घेऊन तयार राहण्यास बापूंनी सांगितले होते.

परंतु, बापूंसोबत सलग ३ दिवस भ्रमंती करावी लागली असल्याने सिकंदरला सकाळी ८ वाजता जाग आली. परिणामी तो खूप घाबरला. आता आपली धडगत नाही असे त्याला वाटले. भीत भीत सिकंदरने सर्किटहाऊसच्या शिपायाकडे चौकशी केली, तेव्हा तो म्हणाला,

” बापू पहाटेच रिक्षा करून स्टेशनला गेले.”

मी त्यांना ड्रायव्हरला उठवू का? असे विचारले.

तेव्हा बापू म्हणाले,

“त्याला दोन-तीन दिवस खूप त्रास झाला आहे. त्याला उठवू नका. मला एक रिक्षा मिळवून द्या, मी परस्पर स्टेशनवर जातो. मी रागावलेलो नाही असे ड्रायव्हरला सांगा.”

हे शब्द ऐकताच सिकंदर ड्रायव्हरच्या डोळे पाण्याने भरून गेले. “ड्रायव्हरसारख्या सामान्य नोकरांच्या प्रकृतीची काळजी घेणारा असा मालक पुन्हा मिळणार नाही ! असे उद्गार त्यांनी काढले.

विधानसभेच्या अंदाजपत्रकी अधिवेशनातील एक प्रसंग…

१९६२ च्या निवडणुकीनंतर पावसाळ्यात झालेल्या बापू तेव्हा काविळीच्या आजारातून नुकतेच बरे झाले होते.

बापूंची चौकशी करण्यासाठी विरोधी पक्षाचे आमदार त्र्य.स. कारखानीस व तत्कालीन पन्हाळ्याचे आमदार एस.डी.पाटील सचिवालया समोरील बंगल्यात बापूंना भेटायला आले होते. त्यांचा अंगात तेव्हा बराच ताप होता तरी बापू सभागृहाची काम करीत बसले होते.

“बापू, तुमच्या अंगात तर ताप आहे. कशासाठी तुम्ही या फायली बघत बसला आहात?”

असा प्रश्न विरोधी पक्षाचे नेते त्र्य.सी.कारखानीस यांनी विचारल्यानंतर बापूंनी त्यांना उत्तर दिले की,

” आज सभागृहात महसूल खात्याची प्रश्नोत्तरे आहेत. तुम्हा मंडळीच्या प्रश्नांना उत्तरं द्यावयाची आहेत ना!”

“बापू, तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांपैकी एखाद्याकडे उत्तर देण्याचे काम सोपवा. आम्ही त्याला ताप देणार नाही. तुमच्या प्रकृत्तीची प्रथम काळजी घ्या.”

असे विरोधी पक्षाचे नेते त्र्य.सी.कारखानीस म्हणाले.प्राप्त कर्तव्याची जबाबदारी पार पडताना प्रकृतीची सुद्धा कदर न करण्याची त्यांची प्रवृत्ती आणि जनसामान्यांच्या प्रश्नाला तडीस नेण्याची बापूंची वृत्ती विलक्षण होती.

बापूंनी आपल्या मुलांचे जयंत पाटील असे नाव ठेवले कारण…. 

१९६२ च्या विधानसभा निवडणुकीत बापू ४४ हजार ३५५ मतांनी विजयी झाले. योगायोग म्हणजे बापूंचा पहिला विजय १९६२ चा आणि जयंत पाटलांचा जन्म देखील १९६२ चाच. त्यामुळे मुलाचे नाव जाणीवपूर्वक बापूंनी कधीच पराजित न होणारा या अर्थाने ‘जयंत’ असे ठेवले.

‘खोट बोलायचं नाही, वावगं वागायचं नाही आणि दुसऱ्याला त्रास होईल, अशी कुठलीही कृती आपल्या हातून होऊ द्यायची नाही.’ ही सर्वात मोठी शिकवण बापूंनी जयंतरावांना दिली. आज राजकीय जीवनात या त्रिसूत्रीचा त्यांना कायम उपयोग झालेला आहे.

‘कठीण आहे पण अशक्य नाही…’

बापूंची प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत २३ पैकी २१ जागांवर लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार पराभूत झाले होते आणि विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात १३२ पैकी १०० उमेदवार पाराभूत झाले.

इतक्या कठीण परिस्थितीत यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी बापूंचे नाव सुचविले आणि बापू प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून १९५९ साली निवडून गेले.

इतक्या कठीण परिस्थितीत बापू प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर केलेल्या पहिल्या भाषणात ते अतिशय छान वाक्य बोलले, ‘कठीण आहे, पण अशक्य नाही…’

त्यानंतर १९६२ च्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने मोठे यश संपादित केले होते.  

ज्या चेंबरसमोर गर्दी ते चेंबर बापूंचे. 

बापू लोकांमध्ये फार रमत असत. कायम लोकांच्या सहवासात राहणे त्यांना आवडायचे. बापूंची लोकांशी घट्ट नाळ जुळली होती. प्रत्येक व्यक्तीशी आदराने, प्रेमाने आणि आपुलकीने बोलणे हा त्यांच्या स्वभावाचा दागिना असल्याने कायम त्यांच्या अवतीभवती लोकांची  गर्दी असायची.

बापू मंत्री असताना मंत्रालयात बाहेरून आलेल्या कोणत्याही माणसाने विचारले की, बापू बसतात कुठे ? तर, ‘सगळ्यात जास्त गर्दी ज्या चेंबरच्या बाहेर ते चेंबर बापूंचे’ असे मंत्रालयातील लोक सांगत.

आणि त्या ड्रायव्हरच्या डोळ्यात पाणी तरारले.

१९६६ साली कोल्हापूरवरून रत्नागिरीला जाताना बापूंना एका मित्राने फळाची करंडी भेट दिली होती. रत्नागिरीकडे गाडी निघाली. तेव्हा बापूंच्या गाडीचा ड्रायव्हर कोकणातला होता. बापूंच्या कार्यक्रमाच्या ठिकाणापासून त्या ड्रायव्हरचे घर पाच-सहा मैलावरच असल्याने त्याला आई-वडिलांना भेटण्याची ओढ लागली.  बापूंनी त्याला विचारले, ” तू कुठचा?”

त्याने आपले गाव जवळ असल्याचे सांगितले. घरी आईवडील आहेत, असेही म्हणाला. बापूंच्या दौऱ्यात जी जीपगाडी होती, त्या जीपगाडीच्या ड्रायव्हरला बापूंनी आपल्या गाडीवर बसवले आणि आपल्या गाडीच्या ड्रायव्हरला जीप घेऊन आईवडिलांना भेटून यायला पाठवले.

बापू म्हणाले,

“ही फळाची करंडी गाडीत ठेव. घरी जात आहेस, तर रिकाम्या हाताने जाणे योग्य होणार नाही. आईवडिलांना भेटून संध्याकाळपर्यंत आरामशीर ये.”

हे शब्द ऐकून तो ड्रायव्हर एकदम गहिवरला आणि त्या ड्रायव्हरच्या डोळ्यात पाणी तरारले.

आणि बापूंनी वाचवली लष्करातील शेतकऱ्यांची जमीन. 

कसणाऱ्याने जर जमीन कसली नाही आणि अन्य व्यवसाय केला तर मूळ कुळाकडे ही जमीन परत जाते. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण मंत्री म्हणून तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी पाचारण केल्याने महाराष्ट्रातील शेतकरी असलेले बरेच तरुण सैन्यात जाऊ लागले.

जमीन न कसणाऱ्या लष्करातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर मूळ कुळातील मालकाने हक्क सांगितल्याच्या काही तक्रारी आली.

लष्करातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनी कसल्या नाहीतर मूळ मालकाच्या ताब्यात जाईल अशी भीती निर्माण झाली.

तेव्हा, लष्कराच्या सेवेत दाखल झालेले आणि संरक्षण दलात दाखल होणारे महराष्ट्रातल्या लष्करी सेवेतील जे शेतकरी आहेत, त्यांनी स्वत: जमीन कसली नाही तरी त्यांची जमीन मुळ मालकाकडे परत जाऊ नये म्हणून बापूंनी एक विधेयक सभागृहात आणले आणि बापूंनी लष्करातील शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवल्यात.

पुर्वी बांधावर असणारी झाडे सरकारच्या मालकीची असत मात्र राजारामबापूंनी ती झाडे शेतकऱ्यांच्या मालकीची केली. त्यामुळेच बांधावर असणाऱ्या आंब्यापासून ते चिंचापर्यन्तच्या झाडी शेतकऱ्याची स्वत:ची झाली.

  • दिपक चटप. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.