तालिबान कोण आहेत, त्यांचा इतिहास काय ?
आजच्या काळात सद्या अफगाणीस्तान मध्ये जो प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि गदारोळ माजतोय ते पाहता त्या देशाचे भविष्य काय असेल याची कल्पनाही करवत नाही. तालिबान्यांनी राजधानी काबूलसह संपूर्ण अफगाणिस्तान देशावर आपला कब्जा मिळवला आहे. त्यात त्यांच्या राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळून गेले आहेत, राष्ट्रपती भवन तालिबानींनी ताब्यात घेतले आहे.
आता हिब्तुल्लाह अखुंदजादा याला अमीर-अल-मोमिनीन म्हणजे अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.
अफगाणिस्तानात सद्या काय चालूये ते सर्व जगाला माहिती आहे पण कित्येकांना तालिबान्यांचा इतिहास माहिती नाही. त्या इतिहासाच्या आधारावरच त्यांनी स्वतःची दहशत निर्माण केली आहे.
त्यांनी अफगाणिस्तान मधील महत्त्वाची शहरे, सैनिकी तळ, गावं ताब्यात घेतली आहेत. टीव्ही, संगीत, सिनेमा, १० वर्षांवरील मुलींच्या शिक्षणाला बंदी असे बरेच कायदे करण्यात आले. या निमित्ताने तालिबानी म्हणजे नेमके कोण आणि त्यांचा इतिहास काय हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
अफगाणिस्तानला जवळपास तीन दशके युद्धभूमी बनवणाऱ्या तालिबानी संघटनेचा इतिहास काय आहे ?
अफगाणिस्तानात संघर्षाची सुरुवात मुळात १९७९ मध्ये झाली, जेव्हा सोव्हिएत सैन्याने त्यांच्या साम्यवादी सरकारला पाठिंबा देण्यासाठी अफगाणिस्तानवर आक्रमण केले. त्यावेळी सोव्हिएत फौजांविरोधात लढणाऱ्यांना काही पाश्चिमात्य माध्यमांनी स्वांतत्र्यसैनिकांची उपमा दिली होती. सोव्हिएत फौजांविरोधात लढणाऱ्या कट्टरतावाद्यांचा कंमाडर मुल्ला मोहम्मद उमर यांने सन १९९४ मध्ये तालिबानची स्थापना केली. उमर हा पश्तून समुदायातून होता.
सुरुवातीला तालिबानमध्ये ५० समर्थक सदस्य होते. आत्ता जवळपास ८५ हजार दहशतवादी आहेत.
थोडक्यात अमेरिकेच्या हस्तक्षेपापूर्वी अफगाणिस्तानात जवळजवळ २० वर्षे युद्धजन्य परिस्थिती होती. अमेरिकेने २००१ मध्ये तालिबान ला अफगाणिस्तान च्या सत्तेतून खाली खेचले; पण आता तालिबान्यांनी पुन्हा एकदा अफगाणिस्तानचा कब्जा मिळवला आहे.
तालिबानने आता जवळपास २० वर्षानंतर पुन्हा एकदा कंदहार शहराचा ताबा घेतला आहे.
खरं तर अफगाणिस्तानच्या गृहयुद्धात अफगाण सरकारच्या वतीने सोव्हिएतच सैन्य अफगाण मुजाहिद्दीनविरुद्ध युद्ध लढत होते. या अफगाण मुजाहिद्दीनला अमेरिका, पाकिस्तान, चीन आणि सौदी अरेबिया सारख्या देशांनी पाठिंबा दिला होता. युद्ध सुरु झाल्याच्या काही वर्षांतच सोव्हिएत सैन्याने अफगाणिस्तानाची राजधानी काबुल ताब्यात घेतली. पण या युद्धात सोव्हिएत सैन्याचे १५००० हून अधिक सैनिक मारले गेले.
१९८९ मध्ये सोव्हिएत युनियनने आपल्या अंतर्गत कारणांमुळे अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि १५ फेब्रुवारी १९८९ ला सोव्हिएत सैन्याच्या अखेरच्या पथकानेही अफगाणिस्तानमधून माघार घेतली.
थोडक्यात १९८९ च्या सुमारास कट्टरतावादी बंडखोरांनी सोव्हिएत फौजांनी माघारी जाण्यास भाग पाडले.
अफगाणिस्तानातून सोव्हिएत सैन्याने जशी का माघार घेतली तसा तालिबानचा उदय झाला.
तालिबान हा एक पश्तो भाषेतला शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘विद्यार्थी’ आहे. वस्तुतः तालिबानचा उदय उत्तर पाकिस्तानमध्ये १९९० च्या दशकात झाला.
१९८० च्या उत्तरार्धात सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तान सोडल्यानंतर तिथल्या अनेक गटांत संघर्ष सुरू झाला आणि तेथील सामान्य लोकही मुजाहिद्दीनमुळे खूप त्रासले होते. अशा परिस्थितीत जेव्हा तालिबान उदयास आले तेव्हा अफगाण लोकांनी त्याचे स्वागत केले.
१९९४ मध्ये अफगाणिस्तानात पश्तून लोकांच्या नेतृत्वात उदयास आलेला तालिबान संपूर्ण ठिकाणी पसरला. याआधी, तालिबान धार्मिक सभा किंवा मदरशापुरते मर्यादित होते. पण आता त्यांचा राजकीय हस्तक्षेप ही वाढू लागला. या तालिबानला सौदी अरेबिया पैशांचा पुरवठा करत होती.
सुरुवातीला, अफगाणिस्तानात तालिबान्यांना लोकप्रियता मिळाली कारण
त्यांनी अफगाणिस्तानातला भ्रष्टाचार रोखला, त्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्र सुरक्षित केले जेणेकरुन लोक व्यवसाय करू शकतील. त्यानंतर तालिबान्यांनी लवकरच दक्षिण-पश्चिम अफगाणिस्तानात आपला प्रभाव वाढविला.
सप्टेंबर १९९५ मध्ये तालिबान्यांनी इराणच्या सीमेला लागून असलेला हेरात प्रांत ताब्यात घेतला. हळूहळू तालिबान्यांनी अफगाणिस्तानात आपले वर्चस्व वाढवण्यास सुरुवात केली. १९९६ मध्ये बुरहानुद्दीन रब्बानी यांना सत्तेवरुन काढून अफगाणिस्तानाची राजधानी काबुल ताब्यात घेतली. १९९८ पर्यंत तालिबान्यांचे अफगाणिस्तानाच्या जवळपास ९० टक्के भागांवर नियंत्रण होते.
२००१ मध्ये न्यूयॉर्कमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला तेव्हा जगाचे लक्ष तालिबान्यांकडे गेले.
ओसामा बिन लादेन, ज्याला न्यूयॉर्क हल्ल्यांसाठी दोषी ठरवले होते आणि अल कायदाला आश्रय देण्याचा आरोप तालिबानवर लावण्यात आला.
७ ऑक्टोबर २००१ ला अमेरिकेच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानावर आक्रमण करण्यात आले. अशाप्रकारे अफगाण संघर्षात अमेरिकाही सामील झाली आणि त्यांच्या लष्करी सामर्थ्यामुळे अमेरिकेने खूप लमी वेळात अफगाणिस्तानातून तालिबानी कमी केले.
आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, तालिबान्यांची ध्येयं काय आहेत तर त्यांचे ध्येय एकच आहे संपूर्ण अफगाणिस्तानची सत्ता काबीज करणे !
तालिबानच्या उदयामागे पाकिस्तानचा हात असल्याचे तसेच सध्या सुरू असलेल्या लढाईत तालिबानला पाकिस्तान मदत करत असल्याचे म्हटले जात, म्हटले जाते मात्र, पाकिस्तानने नेहमीचे हे आरोप फेटाळून लावलेत. पण आत्ता पाकिस्तान ज्या प्रकारे या तालिबानी संघटनेचं कौतुक करत त्या अर्थी हे तर्क नसून सत्यता असू शकते. कारण असंही म्हणलं जातं कि,तालिबानच्या सदस्यांनी पाकिस्तानमधील मदरशांमध्ये शिक्षण घेतले होते.
तालिबानच्या सत्तेला मान्यता देणाऱ्या जगातील ३ देशांपैकी पाकिस्तान एक होतं. नंतर तालिबानचा पाकिस्तानला धोका निर्माण झाला हा भाग वेगळा.
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारतींवर सप्टेंबर २००१ मध्ये अल कायदाने दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेनला तालिबाननेच आश्रय दिला होता. अमेरिकेने तालिबानकडे मागणी केली होती कि, लादेनला आमच्याकडे सोपवा, मात्र तालिबान्यांनी नकार दिला.
त्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये घुसून मुल्ला उमरचे तालिबानी सरकार पाडले. अनेक तालिबानी नेते पाकिस्तानमध्ये पळून गेले. पाकिस्तानमधून त्यांनी अफगाणिस्तानमध्ये परतण्यासाठीचे नियोजन आखण्यास सुरुवात केली होती आणि आज ते यशस्वी झालेत.
हे हि वाच भिडू :
- २० वर्षात अमेरिकेने ६१ लाख कोटी खर्च केले, पण अफगाणिस्तान पुन्हा तालिबान्यांच्या हातात गेले.
- तालिबान येण्याच्या खूप आधी साठच्या दशकात अफगाणिस्तान असा होता..
- भारतानं अफगाणिस्तानमध्ये गुंतवलेले २२ हजार कोटी तालिबान्यांमुळे बुडणार का?