तालिबान्यांच्या हल्ल्यात लुप्त झालेली महाविनायकाची मूर्ती बिहारी पोरानं शोधून काढली

जगाच्या इतिहासात भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा आढळल्याची अनेक उदाहरण पहायला मिळतात. मुळच्या भारतीय असलेल्या किंवा कालांतराने भारताने बनवलेल्या अनेक वस्तुंचा स्विकार विविध देशांनी केला. त्यामुळे देखील भारतीय संस्कृती जगभर विस्तारत राहिली.

यात जर उदाहरण द्यायची म्हंटली तर भारतीय पेहराव, खानपान, कला, संगीत आणि अलीकडेच स्वीकारलेले योग कला. अशी आणखी देखील बरीच उदाहरण देता येतील, आणि महत्वाचं म्हणजे हे केवळ आजच्या आधुनिक युगातच शक्य झाले असे देखील नाही. तर मागच्या कित्येक शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा आहे.

याच परंपरेचे पुरावे म्हणजे भूतकाळातील उत्खननात सापडलेली पुरातन भारतीय रचनेची मंदिरे, देव-देवतांच्या मूर्ती अशा गोष्टी देखील पाहायला मिळतात. अशीच अफगाणिस्तानमधील ‘काबुल महाविनायकची’ लुप्त झालेली पुरातन मूर्ती अलीकडेच बिहारच्या एका युवकाला शोधण्यात यश आलं.

सन ५ व्या दशकात अफगाणिस्तानातील गर्जेदवर महाराजाधिराज परमभट्टारक शाही राजा खिंगलने महाविनायकाची प्राणप्रतिष्ठा केली होती. त्या गणेशमूर्तीच्या पीठावर संस्कृत भाषेतील आणि ब्राह्मी लिपीतील शिलालेख असून, यात प्रतिमेला महाविनायकाची प्रतिमा असे म्हटले आहे. त्यामुळे ही मूर्ती ‘काबूल महाविनायक’ म्हणून संशोधकांत प्रसिद्ध होती. मूर्तीच्या नावावर आणि रूपावर ‘गाणपत्य’ पंथाचा प्रभाव दिसून येतो. 

पुढे काळाच्या ओघात शाही राजा खिंगल नंतर या मुर्तीकडे दुर्लक्ष होत राहिलं आणि महाविनायकाची मुर्ती जमिनीत लुप्त झाली. पुढे अनेक शतकांच्या उत्खननामध्ये ही मुर्ती सापडली. काबुलच्या ‘बाबा पीर रतन नाथ दर्ग्या’च्या जवळ मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

त्यानंतर अगदी अलिकडेपर्यंत म्हणजे १९७० च्या दशकापर्यंत पूजन होत होते.

याशिवाय काबूलमधील शोर बाजार या परिसरातील एका छोटेखानी मंदिरात गणेशाची एक छोटेखानी मूर्ती पुजली जात होती. डॉ. म. के. ढवळीकर यांच्या मतानुसार, शोर बाजारातील मंदिरामधील मूर्ती इसवी सन चौथ्या शतकातील असावी.

अफगाणिस्तानवरील सोव्हिएत रशियाच्या आक्रमणानंतर १९८० मध्ये या दोन्ही मूर्ती काबूलमधील राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात आल्या. त्यानंतर आलेल्या तालिबान राजवटीत काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयाची मोठय़ा प्रमाणावर नासधूस करण्यात आली. तालिबानविरुद्धच्या युद्धात या संग्रहालयावर बॉम्ब पडला आणि संग्रहालयाची इमारत उद्ध्वस्त झाली.

त्यानंतर महाविनायकाची मूर्ती पुन्हा मिळत नव्हती.

मात्र चार वर्षांपूर्वी पूर्व बिहार मधील यायावर नावाच्या युवकाची अफगाणिस्तानमधल्या भारतीय दूतावासात पोस्टिंग झाली. त्या युवकाला अफगाणिस्तानच्या प्राचीन महाविनायकाच्या या मूर्ती संबंधित माहिती होती. त्यामुळे त्या युवकाने ही मूर्ती शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. पण अफगाणिस्तानमधील सनातन चिन्ह दिसण्यास जितकी सोपी आहेत त्यांना शोधण तितकंच अवघड!

जवळपास ७ ते ८ महिन्यांनंतर त्या युवकाला बाबा पीर रतन नाथ दर्ग्याची माहिती मिळाली. तो तडक तिकडे निघाला, तिथे चौकशी केल्यानंतर त्याला एका मंदिर वजा घराविषयी माहिती मिळाली. ज्याला भारतात आपण मंदिर म्हणू शकत नाही असं ते घर होत. त्या मंदिरात कोणत्याही प्रतिमा स्थापित नव्हत्या. फक्त रामायण, महाभारत आणि भगवद्गीता अशी काही पुस्तकं ठेवली होती.

युवकाने तिथल्या या महाविनायकाच्या मूर्तीच्या बाबतीत विचारलं तेव्हा तिथल्या सेवेकऱ्याला बरचं आश्चर्य वाटलं. एवढे दुसऱ्या देशातुन, लांबून कोणी फक्त एका मूर्तीसाठी येऊ शकतो का? असा प्रश्न त्या सेवेदाराच्या मनात उभा राहिला, जो की साहजिक होता.

त्या सेवेकऱ्याने अत्यंत भावनिक मनाने एका बंद खोलीत ठेवलेले महाविनायकाची मूर्ती यायावरला दाखवली. कित्येक वर्षानंतर कोणीतरी त्या मूर्तीला वात्सल्याच्या नजरेनं बघत होतं. श्रद्धाळू मनाने पूजन करत होतं. युवकाने मूर्ती स्वच्छ पुसली आणि फूलं हार अर्पण करून पूजा केली.

जाणकार सांगतात, आजपासून बरोबर अडीच हजार वर्षापूर्वी पूर्व अफगाणिस्तानच्या प्रत्येक घराघरांमधून वेदमंत्रांचे उच्चारण व्हायचं. यज्ञ, धुप यांचा सुगंध पसरत राहायचा. ‘वसुधैव कुटुम्बकम’ या संकल्पनेला प्रमाण मानून हे सर्व कार्य सुरु होते.

पुढे अफगाणिस्तानचा महाविनायकावर हा लेख लिहून संबंधित युवकानं भारतात पाठवला. पण पत्रिकाचा संपादकांनी भीतीने लेखात त्याचं नावच लिहिलं नाही. त्यामुळे ही महाविनायकाची मूर्ती पुन्हा जगासमोर आणण्याचं क्रेडिट त्याला भारतात तरी मिळालाच नाही.

संदर्भ : मेकिंग इंडिया लेख, सर्वेश तिवारी श्रीमुख. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.