तळीयेत काल संध्याकाळी ७ वाजल्यापासून माणसं ढिगाऱ्याखाली होती, यंत्रणा आज पोहचलीय…

रायगड जिल्ह्यातील तळीये गावावर दरड कोसळली असून यात जवळपास ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरड कोसळून यामध्ये जवळपास ३२ घरे बाधित झाली होती, यात ७२ जण गाडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातून ३६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

सध्या या गावामध्ये ४०० ते ५०० लोक अडकून पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

काल संध्याकाळी ७ वाजता या गावात दरड कोसळली होती. मात्र तेव्हापासून हे सगळे दुर्घटनाग्रस्त ढिगाऱ्याखाली अडकले होते. मात्र मोबाईलला कोणतेही नेटवर्क नसल्याने तिथून माहिती मिळू शकली नव्हती, परिणामी कोणतीही शासकीय यंत्रणा पोहचू न शकल्याने या गावातील लोकांनी मिळूनच हे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळपर्यंत एनडीआरएफ तसेच कोस्ट गार्ड हे पुराच्या पाण्यात अडकल्याने प्रत्यक्ष गावात बचावकार्याला वेळ लागत आहे. गावात जाणाऱ्या रस्त्यांवर ९ फुटांपर्यंत पाणी असल्यानं ते कमी झाले की बोटींतून पोहोचण्याचा प्रयत्न करू, असं एनडीआरएफच्या पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले होते. 

शासनाची मदत पोहचली नसल्याचा प्रवीण दरेकर यांचा आरोप.

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर हे सध्या तळीये गावात पोहोचले आहेत. त्यांच्याकडून माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार अजूनही शासनाची यंत्रणा आज पोहोचली आहे. ते म्हणाले, काल दुपारी ४ वाजता ही घटना घडली. त्यानंतर स्थानिकांनी मृतदेह काढण्यास सुरुवात केली. परंतु प्रशासनाचा कोणताही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही.

आज सकाळी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून आता त्यांनी मदत कार्य सुरू केलं आहे. प्रशासन झोपलं आहे का? असा संताप दरेकर यांनी व्यक्त केला.

आम्ही मुंबईवरून तळीयेमध्ये पोहोचू शकतो तर प्रशासनाचे अधिकारी आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी का पोहोचू शकली नाही, असा सवाल देखील दरेकर यांनी केला.

रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासन पोहोचल्याची माहिती दिली आहे.

अधिती तटकरे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, काल रात्रीच्या सुमारास ही दरड कोसळल्याची माहिती आहे.  मात्र हा दुर्गम डोंगराळ भाग असल्याने मदत कार्यात अडथळे येत होते. मात्र काही वेळापूर्वी एनडीआरएफची टीम पोहाचुन सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.

तसेच एनडीआरएफसह स्थानिक प्रशासनची टीम देखील या ठिकाणी काम करत आहे. घटनेनंतर या गावालगतच्या सर्व वाड्यांमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

उत्खननामुळे दरड कोसळली?

तळीये गावामध्ये एक मोठा धबधबा असून त्या शेजारची जागा भरावाकरता उत्खनन करण्यात आल आहे. त्यामुळे दरड कोसळल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या दुर्घटनेबाबत सध्या सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.

मृतांना ‘बोल भिडू’कडून भावपूर्ण श्रद्धांजली…

Leave A Reply

Your email address will not be published.