या देवीच्या प्रेरणेतून संपुर्ण भारतात सर्वप्रथम झुणका भाकर केंद्र सुरू झाले.

पुण्याला जेवढा दैदिप्यमान इतिहास लाभला आहे. तेवढच ऐके काळी पुण्याला दैदिप्यमान निसर्ग सुद्धा लाभलेले होते. जर नैसर्गिक दृष्टीने तुम्ही पुण्याकडे पाहिले तर पुण्याच्या सर्व बाजूंनी आणि सर्व दिशांनी डोंगर आहेत हे तुम्हाला लक्षात येईल.त्यातलाच एक डोंगर म्हणजे पुण्यातला तळजाई डोंगर.

या परिसराबद्दल खूप कथा व आख्यायिका ऐकायला मिळतात. छत्रपती शिवरायांचा जेव्हा राज्याभिषेक होणार होता. तेव्हा महाराजांसाठी तुळजापूरच्या देवीचा आशीर्वाद घेऊन एक पालखी पुण्यामार्गे रायगडला जाणार होती. पुण्यामध्ये जेव्हा त्या पालखीचे आगमन झाले त्यावेळी माँसाहेब जिजाऊ ह्या तळजाईच्या याच परिसरात होत्या व त्या वेळी त्या पालखीचा मुक्काम सुद्धा याच ठिकाणी झाला होता.

या परिसरात सरदार रावबहाद्दुर ठुबे यांचे वास्तव्य होते. आजही कधी तुम्ही जर तळजाई टेकडीवर गेलात, तर तुम्हाला पडक्या अवस्थेत असलेला, थोडेफार अवशेष शिल्लक राहिलेला रावबहाद्दुर ठुबे यांचा बंगला शेवटच्या घटका मोजताना दिसेल.

रावबहाद्दुर ठुबे हे देवीचे निस्सिम भक्त होते. एकदा रावबहाद्दूर ठूबे यांना देवीचा दृष्टांत झाला की, ‘मी तळ्यात आहे मला वर काढ. मला स्थानपन्न होण्यासाठी जे आसन तयार करशील ते सूर्यास्त पासून सूर्योदयाच्या वेळातच तयार झाले पाहिजे. नाहीतर मी जमिनीवरच आपले ठाण मांडेल’.

दृष्टांताप्रमाणे रावबहाद्दुर ठुबे यांनी तळ्याच्या पाण्यामध्ये देवीचा शोध घेतला गेला.

आज ज्या ठिकाणी मंदिर उभे आहे त्याच्या पाठीमागेच एक पाण्याचे तळे आहे. कितीही मोठा दुष्काळ आला तरी या तळ्यातील पाणी कमी होत नाही किंवा आटत नाही. याच तळ्यात त्यांना मूर्ती मिळाल्या. लक्ष्मी,पद्मावती आणि अन्नपूर्णा असे देवीच्या तांदळा स्वरूपाच्या मूर्ती त्या तळ्यातून बाहेर काढण्यात आल्या. तळ्यातून आलेली माता म्हणून या देवीला “तळजाई” म्हणून ओळखले जाऊ लागले. परंतु देवीने सांगितल्याप्रमाणे आसन वेळेत न झाल्याने ही देवी जमिनीवरच स्थापन करण्यात आली. आजही देवी त्याच आसनात आपल्याला पाहायला मिळते.

पुढे जाऊन रावबहाद्दुर ठुबे यांच्या निधनानंतर हा परिसर ओसाड पडला. तळजाई देवीचे अस्तित्व त्या ठिकाणी होते परंतु त्याबद्दल कोणाला जास्त माहिती नव्हती. पुढे जाऊन पुण्यातील एका भाविक युवकाला या देवीचा दृष्टांत झाला. त्यानंतर त्या युवकाने त्या परिसराचा बराच शोध घेतला पण तो परिसर त्याला काही सापडला नाही.

एके दिवशी आपल्या मित्रांसह तळजाई परिसरात तो युवक आला असता त्याला झालेला दृष्टांत समोर दिसू लागला. त्या देवीची ओळख त्याला पटली. तेव्हापासून त्या युवकाने त्या देवीची सेवा सुरू केली. तो युवक म्हणजे ‘एक रुपयात झुणका भाकर’ या संकल्पनेचे जनक, पुण्याचे माजी महापौर वसंत विठोबा थोरात उर्फ आप्पा थोरात.

आप्पा थोरात यांच्या सेवेतूनच या परिसराचा विकास सुरु झाला. मंदिराचा गाभारा आणि मंडप बांधला गेला. प्रवेशद्वाराशी पडवी मारुती मंदिर आणि तळजाई, पदमावती, तुळजाभवानी यांची घुमटाकार मंदिरे बांधण्यात आली.

नवरात्राचे नऊ दिवस आप्पा अन्नग्रहण करीत नसे. नुसत्या फळावरच ते नऊ दिवस काढत. त्याचप्रमाणे नवरात्रात कितीही महत्त्वाचे काम असेल किंवा कितीही मोठी अडचण निर्माण झाली तरी ते डोंगरावरून खाली उतरत नसे. घटस्थापनेला डोंगर चढत आणि दसऱ्याच्या संध्याकाळीच डोंगरावरून खाली येत.

WhatsApp Image 2021 10 08 at 9.04.54 PM

या तळजाई देवीच्या प्रेरणेतूनच भारतात सर्वप्रथम झुणका भाकर केंद्र सुरू झाले. माझ्या परिसरातील कोणतीही व्यक्ती अन्नाशिवाय राहता कामा नये. त्याला कमीत कमी झुणका भाकर तरी मिळालीच पाहिजे. अशी भावना आप्पांची होती. म्हणूनच आप्पांनी सर्वप्रथम ‘एक रुपयात झुणका भाकर’ केंद्र सुरू केले. हे केंद्र भारतातील सर्वात पहिले झुणका भाकर केंद्र होते.

कै.आप्पा थोरात यांनी या ओसाड माळरानाला एक वेगळे वैभव प्राप्त करून दिले. आप्पांचे कार्य आज थोरात बंधू निष्ठेने पूर्ण करत आहेत. व त्यांच्या या कार्याच्या मागे तळजाई देवीची श्रद्धा आहे.

  •  कपिल जाधव

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.