‘तांबव्याचा विष्णु बाळा’ शरण आला ते फक्त यशवंतरावांच्या शब्दाला मान देवून

तत्कालिन दक्षिण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे गावं. स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळख मिळवली होती. गावात कोयना नदीच्या पाण्यानं सुफळं संपुर्ण झालेली शेती. पाटणच्या घाटरेषेतील गर्द हिरवाई. चारी बाजूनं पाणी असल्यानं गाव एखाद्या बेटासारखं दिसायचं.

त्यामुळं स्वातंत्र्यापुर्वी बरेच स्वातंत्र्यसैनिक भूमिगत होण्यासाठी या गावाचा आसरा घेत असतं.

स्वातंत्रसैनिकांच्या या गावात १९५२-५३ साली पै. आण्णा बाळा पाटील आणि पै. विष्णु बाळा पाटील या दोन सख्ख्या पैलवान भावांनी मिळून गाव वेगळ्याचं कारणांनी चर्चेत आणलं. तशी गावात भाऊबंदकी पुर्वीपासूनच. पण १९५२-५३ साली भाऊबंदकीनं उचल खाल्ली. सोसायटीच्या वादातून विष्णु बाळा यांच्या भावाचा म्हणजेच अण्णाचा त्यांच्याच चुलत भावानं संध्याकाळच्या अंधारात पाणवठ्यावर पाय तोडला.

जखमी आण्णाला कराडच्या दवाखान्यात आणण्यात आलं. पण केस सिरीयस होती म्हणून सातारला पाठवलं. तेव्हा तिथं दवाखान्यात यशवंतराव चव्हाण आण्णा बाळाला भेटायला आले. तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी आण्णा बाळाच्या पाठीवरुन हात फिरवला न् सांगितल तुम्ही काही काळजी करू नका.

डॉक्टरांना सांगितलं हा माझा माणुस आहे. आणि मग आण्णा बाळाची व्ही. आय. पी. ट्रिटमेंट.

इकडं थोरल्या भावाचा पाय तोडला म्हणून विष्णु बाळा यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली.

पोलिसांनी रितसर गुन्हा नोंदवुन आरोपींना न्यायालयात उभं केलं. इथं पर्यंत सगळं नीट होतं. पण विष्णु बाळाचा संताप अनावरच होता. काहीच दिवसात हे आरोपी न्यायालयातुन निर्दोष सुटले. न्याय व्यवस्थेकडून न्याय न मिळाल्याची भावना मनात धरून विष्णु बाळा यांनी पुढील काही दिवसात खुनांची मालिका रचली.

विष्णु बाळा हे मुळतः सभ्य आणि सरळ मार्गी होते. आई – बहिणींचा अमाप आदर. त्यांनी भावकीतला हा वादही शांततेत सोडवायचा प्रयत्न केला होता. पण समोरून जे नको व्हायला हवं होतं ते झालं.

हे दोन्ही पाटील म्हणजे कराडच्या आझाद हिंद आखाड्यातील पैलवान.

त्यातही ‘तांबव्याचा विष्णु बाळा’ यांच नाव सतत चर्चेत असायचं.

पाटण खोऱ्यात माजलेल्या वाघरांची शिकार करणं व गरीब जनतेला सहाय्य करणं या गुणांमुळं त्यांचं त्याकाळी मोठं नाव झालं होतं. पाटण खोऱ्यातील जंगलजाळीत त्यांनी सावकारी, अन्याय, अत्याचार करणाऱ्यां विरुद्ध बंड उभं केलं. गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी बंदूक उचलली आणि पाटण खोरं रक्तानं न्हाऊन गेलं.

एव्हाना विष्णु बाळा यांनी चार खुन केले. पण तरीही पोलिस त्यांना पकडू शकत नव्हते. याचं कारण, विष्णू बाळा पाटील यांना शिकारीचा नाद होता. त्यातुन त्यांनी पाटण खोऱ्यातील जंगली जनावरांचा बंदोबस्त करुन अनेक शेतकऱ्यांना मदत केली होती. त्यामुळे त्यांना मदत करणारे आणि जीवाला जीव देणारे अनेक मित्र झाले होते.

पोलिस विष्णु बाळा पाटील यांना शोधायला आले की, हे मित्र विष्णु बाळा यांना दडवून ठेवत असत.

जवळपास चार वर्ष शोधमोहिम चालु होती. अखेरीस पोलिसांनी वैतागुन साधारण १९५८ साली विष्णु बाळा पाटील यांना फरारी घोषित करून ठाव-ठिकाणा संगणाऱ्यास एक हजार रुपयांच बक्षीस जाहीर केलं.

महिना, दोन महिने, तीन महिने, सहा महिने उलटले पण विष्णु बाळा यांचा पत्ता लागत नव्हता. एक मित्रानं तर पोलिस पकडण्यासाठी आले होते तेव्हा विष्णु बाळा सापडतील म्हणून स्वतःच्या पत्नीजवळ त्यांना झोपवलं आणि पोलिसांना सांगितलं

“माझी बहिण व तिचा नवरा आला आहे.”

एकाच अंथरुणावर एक पुरूष व एक स्त्री झोपले असल्यानं पोलिसांना संशय आला नाही. चार खुन होऊनही आरोपी सापडत नव्हता.

त्यामुळं संपुर्ण महाराष्ट्रात त्याकाळी हे खुन प्रकरण गाजलं होतं. राजकारणात देखील याचे पडसाद उमटले.

त्याकाळी यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते कराडचेच. तसचं विष्णु बाळा यांचे बंधु आण्णा बाळा हे राजकारणात असल्यामुळे त्यांची आणि यशवंतराव चव्हाण यांची चांगली ओळख. राजकीय वातावरणात या खुनांची चर्चा सुरू झाल्यावर यशवंतराव चव्हाण यांनी आण्णांशी चर्चा केली.

विष्णु बाळा पाटील यांना पोलिसांना शरण यायला सांगितलं. विष्णु बाळा जर शरण आले तर त्यांना कमीत कमी शिक्षा देण्याचे अपील सरकार तर्फे केले जाईल असं आश्वासन दिलं.

विष्णु बाळा यांना यशवंतराव चव्हाण यांचं बोलणं सांगितलं. विष्णू बाळा यांनी त्यांच्या बोलण्याला मान देऊन ते पोलिसांना शरण आले. खुन खटला सुरू झाला. न्यायालयाने निकाल दिला. विष्णू बाळा पाटील यांना फाशी.

त्यांची लोकप्रियता एवढी होती की लोकं त्यांना स्वाधिन करुन द्यायला तयार नव्हते. पण त्यांनी आपल्याला अडवणाऱ्या जनसागराला स्वत: समजावले की,

“असा कायदा हातात घेण्याचा मार्ग चुकीचा आहे व मी या मार्गावर गेलो आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्यांनी सर्व तरुणांना समजावलं की रागाच्या भरात तुम्ही कोणीच कधीच हा मार्ग अवलंबून नका अशी माझी कळकळीची विनंती आहे तुम्हा सर्वांना.”

व त्यांनी आपल्या केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगली.

साधारण अर्धशतकापूर्वी घडलेल्या या घटनेवर २००१ साली “तांबव्याचा विष्णूबाळा” हा मराठी चित्रपट येवून गेला. तो तुफान गाजला. तांबव्याचा विष्णूबाळा म्हणून सयाजी शिंदे. सोबत ऐश्वर्या नारकरसारखी सौंदर्यवती. पिक्चर पाहताना व त्यानंतरही कित्येक वेळा शिव्या खाणारे व्हिलन राहुल सोलापूरकर आणि सदाशिव अमरापूरकर. भांडणं लावून देण्याच्या भूमिकेतील कुलदिप पवार. अगदी तगडी स्टारकास्ट!

  • ऋषिकेश नळगुणे

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.