दक्षिण दिग्विजयासाठी भाजपने कोंगूनाडूचा विषय बाहेर काढलाय..

तामिळनाडू….. भारतातील दक्षिणी राज्यांपैकी एक.. जे सांस्कृतिक वारसा आणि राजकीय घटनांसाठी नेहमीच चर्चेत असतं. आता तुम्हाला वाचून धक्का बसेल पण तमिळनाडूच्या विभाजनाचा मुद्दा सध्या देशभर गाजतोय.

तामिळनाडूत प्रकाशित झालेल्या काही बातम्यांमध्ये असं म्हटलय की केंद्र, तमिळनाडूला दोन भागात विभागण्याची शक्यता आहे. आणि विभाजन केलेल्या दुसऱ्या केंद्रशासित प्रदेशाचं नाव असेल कोंगू नाडू.

हा कोंगू नाडूचा विषय काय?

हा कोंगू नाडू नावाचा रायता पसरलाय मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळं. ७ जुलैला मंत्रिमंडळाच्या या विस्तारापूर्वी संध्याकाळी १२ मंत्र्यांनी राजीनामा दिला आणि ४३ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. यातील बहुतेक मंत्री नवीन होते. कोणत्या नेत्याला मंत्रीपद देण्यात आलं, कोणाला काढलं याविषयीच्या चर्चेत देशभरातील मीडिया व्यस्त होता.

पण तामिळनाडूवर नवं गंडांतर येत होत. 

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तामिळनाडूच्या एका भागातील वर्गाने लवकरच नवीन राज्य स्थापनेचा आनंद साजरा करायला सुरवात केली. त्याचवेळी दुसरा गटही त्याला विरोध करत होता. सोशल मीडियावर मिमवॉर सुरू झाल होतं.

आणि आताही याबाबत तामिळनाडूमध्ये वाद सुरु आहे. आणि आता तमिळनाडूचे विभाजन होणार आहे आणि लवकरच कोंगू नाडूच्या रुपानं एक नवीन राज्य स्थापन होईल, असा प्रचार करण्यात एक विभाग गुंतलेला आहे.

आणि यात एल. मुरुगन या चर्चेचं कारण बनले

खरं तर घडलं असं की पंतप्रधान मोदींच्या नवीन मंत्र्यांच्या नावामध्ये एल मुरुगन यांच्या नावाचा समावेश होता. तामिळनाडूमधील ते भाजप नेते. मंत्री होण्यापूर्वी एल मुरुगन तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष होते. त्यांना दोन केंद्रीय मंत्रालयात राज्यमंत्री करण्यात आलयं. एक म्हणजे माहिती व प्रसारण मंत्रालय आणि दुसरे मत्स्यपालन व पशुसंवर्धन मंत्रालय. आता एवढ्या पर्यंत प्रकरण अगदी ठीक होतं.

पण मुरुगनच्या ट्विटर प्रोफाइलनं घात केला. त्यांनी यावरुन या कोंगू नाडूच्या चर्चेला फोडणी दिली.

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर ७ जुलै रोजी भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून प्रत्येक मंत्र्यांची प्रोफाइल शेअर केली. यामध्ये एल मुरुगनच्या हिंदी प्रोफाइलमध्ये सर्व ठीक होतं, पण इंग्रजी प्रोफाइलमध्ये त्यांच्या नावाखाली कोंगू नाडूचा उल्लेख होता.

आता यावर वादाला सुरुवात झालीय. आपल्याला त्या वादात काय पडायचं नाही. आपण आपल्या कोंगू नाडुच्या विषयकडं येऊ.

काय आहे हे कोंगू नाडू 

पश्चिम तामिळनाडूच्या भागाला ‘कोंगू नाडू’ म्हणतात. ‘कोंगू नाडू’ हा पिन कोड नाही किंवा तामिळनाडूतल्या कोणत्याही क्षेत्राला औपचारिकपणे दिलेलं नाव नाही. हे पश्चिम तामिळनाडूच्या भागासाठी सामान्यतः वापरले जाणारं नाव आहे.

कोंगू नाडूला तामिळ साहित्यात प्राचीन तामिळनाडूच्या पाच क्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. संगम साहित्यात ‘कोंगू नाडू’ हा वेगळा प्रदेश म्हणून उल्लेख केला गेला. सध्याच्या तामिळनाडू राज्यात हा शब्द औपचारिकरित्या नीलगिरी, कोयंबटूर, तिरुप्पूर, इरोड, करूर, नामक्कल आणि सालेम, धर्मपुरी हे जिल्हे, तसेच दिंडगुल जिल्ह्यात ओड्डनछत्रम आणि वेदसंदूर आणि पप्पीरेड्डीपट्टी या पट्ट्याला वापरला जातो.

या जिल्ह्यांमध्ये ओबीसी समुदायातला कोंगू वेल्लाला गौंडर समाज मोठ्या प्रमाणावर आहे.

यापूर्वीही अशी मागणी निर्माण झाली आहे का ?

तर नाही….तेलंगणा किंवा उत्तराखंडपेक्षा तमिळनाडूच्या आधुनिक राजकीय इतिहासामध्ये वेगळ्या कोंगू नाडूबद्दल कोणतीही मागणी किंवा चर्चा कधीच झालेली नाही. म्हणून या वादाला कोणताही राजकीय किंवा सामाजिक संदर्भ नाही.

आण्णा द्रुमुकचे एक माजी मंत्री म्हणाले की,

मला ही विभागणीची तत्काळ योजना असल्याचे वाटत नाही. भाजप खरं तर पेरणी करतय, त्यामुळे वादाला सुरुवात होईल. त्यानंतर ‘कोंगू नाडू’ ची मागणी हा नवीन मुद्दा राहणार नाही.

अण्णाद्रमुकच्या आणखी एका मंत्र्याने सांगितले की, कोंगू नाडूच्या मतांचा विचार भाजप करत असेल तर त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटू शकतो.

त्यामुळं भविष्यात हा मुद्दा पुन्हा चर्चेला आला तर नवं असं काही घडणार आहे असं पण नाही. तूर्तास कोंगू नाडूची कथा सुफळ संपूर्ण…

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.