तामिळनाडूच्या निवडणुकीतला फिल्मी इफेक्ट संपला, आता खरं राजकारण सुरु झालं…

बंगालच्या धुरळ्यात विसरला असला तर सांगतो तामिळनाडू मध्ये देखील विधानसभा निवडणूक होत होत्या. आजच निकाल होते. त्यात अद्रमुकच्या आघाडीला ८० जागा मिळताना दिसत आहेत यात द्रमुकच्या आघाडीला १५३ जागा मिळतं आहेत. करुणानिधी सुपुत्र स्टालिन भावी मुख्यमंत्री होतील. या निवडणुकीत सुपरस्टार हिरो कमल हसन देखील उतरला होता. चित्रपट क्षेत्रातील मोठं नाव असलेले केवळ तेच निवडून येण्याच्या मार्गावर आहेत.

पण तामिळनाडूचा आजवरचा इतिहास बघितला तर आता पर्यंत फिल्मस्टारनी इथे राज्य केलंय.

उडल मन्नीक्कू .. उयीर तामिळहक्कु…

शरीर देणार मातीसाठी आणि जिंदगी देणार तामिळसाठी…!

हा साधा डायलॉग आहे पिच्चरचा… पण या डायलॉगने तामिळनाडूमध्ये सरकारं उलटीपालटी केली होती.

आपण बघायचे म्हणून पिच्चर बघत असू, तामिळ माणूस जगायचं म्हणून पिच्चर बघत असतोय. हा वारसा त्यांना तामिळनाडूच्या इतिहासानंच दिला आहे.

याची सुरुवात होते पेरियार यांच्यापासून….

द्राविड आंदोलनाचे प्रमुख नेते व तमिळ जनतेत पेरियार (थोर आत्मा) व थानथाई (पिता) म्हणून गौरविलेले समाजसुधारक. पूर्ण नाव एरोड व्यंकटप्पा रामास्वामी नायकर.

पेरियार यांच्या कामातून तयार झालेली संस्था म्हणजे द्रविड कळघम. जातीव्यवस्थेत असणाऱ्या उतरंडीला त्यांचा विरोध होता. अस्पृश्यता हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. पण त्या सोबतच ‘द्रविड नाडू’ नावाचे दक्षिणेकडील लोकांचे वेगळे राष्ट्र प्रस्थापित व्हावे म्हणून त्यांनी काम केलं. यामागे ब्राह्मणवादाच्या कचाट्यातून लोकांची सुटका व्हावी हा हेतू होता.

त्यांनी केलेलं मोठं काम म्हणजे आपल्या विचारांना स्थानिक सांस्कृतिक कलेची दिलेली जोड. त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोचवायला संगीत आणि नाटक अशा विविध साधनांचा अवलंब केला.

यात दोन माणसे प्रामुख्याने सहभागी होती – अण्णादुराई आणि करुणानिधी… पेशाने प्रथम शाळा शिक्षक व नंतर पत्रकार असलेल्या अण्णादुराई यांचा पेरियार यांना  पूर्ण पाठिंबा होता.

सी. एन. अण्णादुराई

तमिळ भाषेतील एक निष्णात लेखक. नाटक लिहीण्यासाठी त्यांची विषेश ओळख होती. त्यांची काही नाटकांवर चित्रपट देखील बनले आहेत. सोबतच ते आपल्या भाषण शैलीसाठी देखील प्रसिद्ध होते.

पेशाने प्रथम शाळा शिक्षक व नंतर पत्रकार असलेल्या अण्णादुराईंचा पेरियार ह्या द्रविडी चळवळकर्त्या नेत्यास पूर्ण पाठिंबा होता. पण त्यांचा मुख्य ओढा हा चित्रपटांकडे होता. त्यांनीच सर्वप्रथम चित्रपट राजकारणासाठी वापरण्याचा प्रयोग केला आणि तो कमालीचा यशस्वी ठरला.

अण्णादुराईंनी १९३७ साली पेरियार यांच्या द्रविड कळघम ह्या पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षामध्ये झपाट्याने प्रगती करताना अण्णादुराई व पेरियार यांच्यामधील मतभेद वाढीस
लागले. १९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य पेरियारच्या मते द्रविड लोकांसाठी वाईट बातमी होती. परंतु अण्णादुराई ह्यांनी स्वातंत्र्याचे स्वागत केले.

त्यातुनच १९४९ साली अण्णादुराईंनी आपल्या द्रविड मुन्नेत्र कळघम ह्या नव्या पक्षाची स्थापना केली. प्रामुख्याने ब्राह्मणविरोधी धोरणे व हिंदी भाषेचा तिटकारा असलेल्या अण्णादुराईंनी १९५३ साली स्वतंत्र तमिळनाडूची मागणी करण्याचे ठरवले होते.

परंतु १९५६ सालच्या राजकीय पुनर्रचनेदरम्यान मद्रास राज्यामध्ये केवळ तमिळ भाषिक जिल्हेच राहिले व स्वतंत्र तमिळनाडूची मागणी मागे पडली.

वाढत्या लोकप्रियतेमुळे १९६७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये द्रमुक पक्षाच्या आघाडीने २३७ पैकी १७९ जागांवर विजय मिळवून दणदणीत बहुमत मिळवले व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची तेथील सत्ता संपुष्टात आणली.

एम.जी. रामचंद्रन

मरुदुर गोपालन रामचंद्रन, ऊर्फ एम. जी. रामचंद्रन किंवा एमजीआर. तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते ते आणि तामिळनाडूचे तीन वेळचे लोकप्रिय मुख्यमंत्री असा प्रवास.

तरुणपणी एम. जी. रामचंद्रन आणि त्यांचा भाऊ एम. जी. चक्रपाणी हे दोघे कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी नाटक मंडळ्यांमधून कामे करत असत. याच काळात ते गांधींच्या प्रभावामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झाले.

१९३६ साली सती लीलावती नावाच्या तमिळ चित्रपटात मिळालेल्या एका साहाय्यक भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश झाला. १९४० च्या दशकात त्यांना चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका मिळू लागल्या. पुढील तीन दशके तमिळ चित्रपटसृष्टीत त्यांच्या नावाचा दबदबा राहिला.

दरम्यानच्या काळात ते द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे ते सदस्य झाले. पक्षांतर्गत उतरंडीत झपाटय़ाने वाटचाल करत ते अल्पावधीतच पक्षाच्या सर्वोच्च वर्तुळात गणले जाऊ लागले. चित्रपटांतील नायक म्हणून लाभलेल्या प्रचंड लोकप्रियतेचा वापर करून त्यांना राजकारणासाठीही मोठा जनाधार गोळा करता आला.

१९७२ साली द्रमुक सोडून त्यांनी स्वत:चा अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची स्थापना केली. १९७७ साली ते पहिल्यांदा तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. पुढे १९८७ पर्यंत त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे संभाळली.

भारतात कोणाही चित्रपट-अभिनेत्याने एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवण्याची ही पहिलीच घटना होती.

एम. करूणानिधी

देशाच्या राजकारणातही खूप कमी लोकांचे योगदान आणि यश एम. करुणानिधीं एवढे मोठे आहे. ते १९५७ ते २०१६ अशी जवळपास ६० वर्षं लोकप्रतिनिधी राहिले. तब्बल ५ वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री भुषवलेले सिने सृष्टीतील लेखक म्हणून देखील त्यांना ओळखले जाते.

लहानपणापासून त्यांचा कल लिखाणाकडे होता. त्यावेळच्या जस्टिस पार्टीचे नेते अळगिरीसामी यांच्या प्रभावामुळे ते राजकारणाकडे ओढले गेले. आणि वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी ‘तामिळ स्टुडंट्स फोरम’ची स्थापना केली.

त्याचवर्षी एक हस्तलिखित मासिकही सुरू केले. याच दरम्यान १९४० च्या दशकात त्यांची भेट सी. एन. अण्णादुराई यांच्याबरोबर झाली. अण्णादुराई हे त्यांचे राजकीय गुरू ठरले.

अण्णा दुराई यांनी द्रविड मु्न्नेत्र कळघम पक्षाची स्थापना केल्यानंतर २५ वर्षांचे करुणानिधी त्यांच्या अधिकच जवळचे झाले होते. म्हणून इतक्या कमी वयात करुणानिधी यांची निवड पक्षाच्या प्रसिद्धी आणि प्रचार समितीवर करण्यात आली.

त्याच दरम्यान तामिळ सिनेसृष्टीत संवादलेखक म्हणून त्यांनी काम सुरू केलं. ‘राजकुमारी’ या सिनेमासाठी त्यांनी पहिल्यांदा डायलॉग लिहिले. त्यांना या कामात यश मिळू लागलं. १९५२ ला ‘परासख्ती’ या सिनेमासाठी त्यांनी लिहिलेले डायलॉग प्रचंड गाजले.

१९६७ साली जेव्हा DMK पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये सत्तेत आलं, तेव्हा ते सरकारमध्ये मुख्यमंत्री अण्णादुराई आणि नेडुचेळियन यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ मंत्री होते. १९६९ साली C. N. अण्णादुराई यांचं निधनानंतर करुणानिधी मुख्यमंत्री झाले आणि तामिळनाडूच्या राजकारणात ही एक नवी सुरुवात होती.

करुणानिधी यांनी १९४७ ते २०११ पर्यंत सिनेमांसाठी संवाद लेखन केले. त्यांनी टीव्ही मालिकांसाठीही लिखाण केले आहे. अंथरुणाला खिळेपर्यंत ते ‘रामानुजम’ या टीव्ही मालिकेसाठी संवाद लिहीत होते.

जयललिता

जयललिता जोपर्यंत होत्या तोपर्यंत ‘अम्मा’ या एकमेव वलयाभोवती अख्खे तामिळनाडूचे राजकारण फिरत होते. ज्या ज्या क्षेत्रांत त्यांनी पाऊल ठेवले त्या त्या क्षेत्रांत त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचल्या.

लहानपणी अभ्यासामध्ये त्या हुशार होत्या. यांना नोकरी करायची होती. खूप शिकायचं होते पण आईच्या तगाद्यामुळे त्यांनी सिनेमाची ऑफर स्विकारली. नाईलाजाने जरी या सृष्टीत आल्या असल्या तरी त्यांचे चित्रपट हिट ठरत होते.

त्याच दरम्यान जयललिता यांची गाठ तत्कालीन प्रसिद्ध तमिळ अभिनेते एम. जी. रामचंद्रन यांच्याशी पडली. १२५ पैकी तब्बल ४० पेक्षा जास्त सिनेमे जयललिता यांनी एमजीआर त्यांच्याबरोबर केले आहेत.

सिनेमात काम करणं बंद केल्यानंतर खरंतर त्यांना आता एका हाऊसवाईफचं जीवन जगायचे होते पण, एमजीआर यांनी त्यांना कधीच अधिकृत पत्नीचा दर्जा दिला नाही. मात्र तरीसुद्धा त्यांनी एमजीआर यांची पदोपदी साथ दिली.

पुढे एमजीआर राजकारणात आले आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. एमजीआर यांच्याबरोबर जयललिता यांचीसुद्धा राजकारणात एंट्री झाली. पण, त्यावेळीही त्यांना फार मानाचं स्थान नव्हते. पण एमजीआर यांच्या मृत्युनंतर पक्षाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले.

यानंतर त्या एक-दोन आणि तर तब्बल पाच वेळा त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. जयललिता यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तान्सी घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरण शेवटपर्यंत सोबत होती. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना क्लिनचीट दिल्यानंतर त्या पुन्हा एकदा सत्तेत आल्या.

मागच्या दोन चार वर्षात जयललिता आणि करुणानिधी या दोघांचंही निधन झालं. यंदाची विधानसभा निवडणूक हि पहिली अशी निवडणूक आहे ज्यात हे दोन्ही दिग्गज नेते नव्हते.

त्यांचे वारसदार म्हणून पुढं आलेले नेते प्युअर राजकारणी आहेत. डीएमके पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एम.के.स्टालिन यांनी जरी पूर्वी काही सिनेमात काम केलं असलं तरी ते काही राजकारणी नाहीत. करुणानिधी यांच्या सिनेमाचा वारसा त्यांच्या मोठ्या भावाकडे होता. स्टालिन यांनी सुरवात राजकारणापासून केली आणि आता ते फुल टाइम राजकारणात आहेत.

यंदाच्या निवडणुकीत त्यांनी वर्चस्व मिळवलेल स्पष्ट दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला जयललितांच्या एआयडीएमकेचे नेते आहेत एडप्पी पलानीस्वामी. ते सद्याचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री देखील आहेत. त्यांचा देखील सिनेमाशी काही संबंध नाही.

गेल्या वर्षी तामिळ सिनेमाचे दोन सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन हे राजकारणात उतरले. दोघांनीही आपापले राजकीय पक्ष स्थापन केले होते. विधानसभेच्या दृष्टीने त्यांनी प्रहार देखील सुरु  केला. वयाची साठी पार केली तरीही दोघांची लोकप्रियता आजही तामिळनाडूमध्ये अफाट आहे. विशेषतः रजनीकांत अजूनही देशातला सर्वात मोठा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो.

पण गेल्या वर्षी त्याने पक्ष स्थापन करून प्रचाराची तयारी केली मात्र त्याला जाणवलं कि तामिळनाडूचे राजकारण आता बद्दल आहे. थिएटरमध्ये डोक्यावर घेणारी लोक आपल्याला मते देतीलच असं नाही. त्याने निवडणुकीच्या आधीच राजकारणातून काढता पाय घेतला.

त्यामानाने कमल हसन मात्र चिकाटीने निवडणुकीला उतरला. त्याचा मक्कल निधी मय्यम डीएमके आणि एआयडीएमकेच्या विरोधात तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व करत होता . स्वतः कमल हसनने कोईमुतुर दक्षिण मतदारसंघातून आमदारकी लढवली.

या निवडणुकीत दुर्दैवाने कमल हसनचा पक्ष आता पर्यंतचा कल बघता १च जागेवर पुढं आहे. ती म्हणजे त्याची स्वतःची सीट. खरंतर  ही त्याच्या पक्षाची पहिलीच निवडणूक होती. पहिला डाव भुताचा म्हणत कमल हसन पुन्हा पुढच्या तयारीला लागेल हे खरे मानले तरी मतदार त्याला साथ देतील हा प्रश्नच आहे.

निकालाच्या कलावरून डीएमकेचे स्टालिन  हे मुख्यमंत्री होतील हे दिसत आहे. बाकी काही का असेना या निवडणुकीत इतकं तरी सिद्ध झालं की तामिळ जनतेवरील फिल्मी इफेक्ट कमी झालाय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.