तामिळनाडूतील हा फ्रेंच राजवाडा एका मराठी राजघराण्याच्या पराक्रमाची साक्ष आहे..
उत्तर तामिळनाडू मध्ये वेल्ल्लोर पासून ३५ किलोमीटर अंतर गेलं तर एक अर्णी नावाचं गाव लागतं. गाव तस छोटं आहे पण तिथे तीन चार राजवाडे आहेत. त्यातल्या एका राजवाड्याचे मालक तर म्हैसूरच वाडियार राजघराण आहे. मात्र या सगळ्यामध्ये एक राजवाडा वेगळा उठून दिसतो.
फ्रेंच स्थापत्यशैलीचा लालबुंद रंगाचा हा राजवाडा आहे अर्णीच्या जहागीरदारांचा राजा श्रीनिवास राव यांचा.
तामिळनाडूमधल्या या राजवाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे तिथले जहागीरदार हे मराठी आहेत. ऐकून धक्का बसला ना? महाराष्ट्रापासून हजारो मैल अंतरावर एक मराठी घराणं शेकडो वर्षे राज्य करत होतं हे आज कोणाला सांगूनही पटणार नाही.
ते मराठी घराणं होतं वेदाजी भास्करराव पंत यांचं.
सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज जेव्हा मुघलांच्या आक्रमणामुळे विजापूरच्या आदिलशाहीत सामील झाले तेव्हा त्यांच्या सोबत महाराष्ट्रातून बंगळूर कर्नाटक भागात येणाऱ्या सरदारांमध्ये वेदाजी पंत यांचा समावेश होता. कर्नाटकात त्यांनी केलेल्या पराक्रमामुळे शहाजी महाराजांनी आदिलशहाला अर्णीची जहागीर बक्षीस द्यायला लावली.
तेव्हा पासून भोसले घराण्याला वेदाजी भास्कर पंत यांची निष्ठा कायमची अर्पण केली.
छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर निघाले होते तेव्हा त्यांनी सुरवात गोवळकोंड्याच्या कुतुबशाहसोबतच्या तहापासून केली. तिथून पार दक्षिणेत जिंजी मद्रास पर्यंतचा भाग त्यांनी मराठ्यांच्या टापेखाली आणला. तामिळनाडूमधील वेल्लोरचा किल्ला जिकल्यावर शिवरायांनी तंजावर जहागिरीवर आपलं लक्ष वळवलं.
छत्रपतींचे सावत्र बंधू व्यंकोजी तेव्हा तिथे सत्तेत होते. शिवरायांनी जेव्हा त्यांच्याशी सामोपचाराची भूमिका घेतली तेव्हा व्यंकोजी यांनी तहास नकार दिला.
वेदाजी भास्कर हे व्यंकोजींचे सरदार होते मात्र तरीही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे अधिपत्य मान्य केलं आणि किल्ल्याच्या चाव्या स्वतःहून शिवरायांच्या स्वाधीन केल्या. त्यांच्या या निष्ठेचे फलित म्हणून तिथून पुढे आलेल्या सर्व छत्रपतींनी अर्णीची जहागीर भास्करराव पंतांच्या वारसदारांकडे कायम ठेवली.
पुढच्या साठ सत्तर वर्षांपर्यंत अर्णीवर त्यांच्या चार पिढ्यांनी राज्य सुखनैवपणे राज्य केलं. पण १७५० साली कर्नाटक युद्धात त्यांना भाग घ्यावे लागले. फ्रेंच व नवाब यांच्यात शांतता पूर्ण तह घडवून आणण्यात अर्णीच्या तिरुमला राव यांनी सिंहाचा वाटा उचलला. १७६२ साली अर्कोटचा नवाब आणि तंजावरचे महाराज प्रतापसिंह यांच्यात अर्णीचे युद्ध झाले. शेवटी मद्रास येथील ईस्ट इंडिया कंपनीच्या हस्तक्षेपामुळे अर्णीची जहागीर तिरुमला राव यांना परत मिळाली.
इथले सर्वात सुप्रसिद्ध जहागीरदार म्हणजे श्रीनिवास राव. त्यांच्याच काळात म्हणजे १८५० साली तो फ्रेंच राजवाडा उभारण्यात आला. इथे एक वदंता आहे कि हा राजवाडा श्रीनिवासराव यांनी आपल्या एका फ्रेंच प्रेमिकेसाठी बांधला होता. पण अनेक इतिहासकार हि अफवा असल्याचं सांगतात. अर्णीच्या राजघराण्याचे इंग्रज, फ्रेंच,डच या सर्व राज्यकर्त्यांशी सौहार्द पूर्ण संबंध होते. विल्यम पॉग्सन नावाचा फ्रेंच आर्किटेक्ट त्यांचा मित्र होता. त्याच्याच मार्गदर्शनाखाली हा छोटेखानी राजवाडा उभारण्यात आला.
सरकारी दुर्लक्षामुळे पडझड होत असलेला हा राजवाडा आजही देशातल्या सर्वात देखण्या महालांपैकी एक समजला जातो.
श्रीनिवास राव अर्णी संस्थानचे सर्वात कार्यक्षम राजे समजले जातात. उच्चविद्याविभूषित असणाऱ्या श्रीनिवास राव यांनी आपल्या राज्यात विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुरु केली. इतकेच नव्हे तर त्यांच्या साठी बक्षीस म्हणून सुवर्णपदकाची घोषणा करण्यात आली. श्रीनिवास राव हे धार्मिक स्वभावाचे होते, त्यांनी देशभरातील अनेक मंदिरांना देखील दानधर्म केला होता.
१९०२ साली श्रीनिवासराव यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर काही काळासाठी हि जहागीर ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतली होती मात्र थोड्याच महिन्यात त्यांना श्रीनिवास राव यांच्या मुलाला १९२ गावांचं हे संपूर्ण संस्थान परत करावं लागलं. मात्र शंभर वर्षांपूर्वी लागू झालेला खजिन्यातला ५००० रुपयांचा वाटा मात्र त्यांना द्यावा लागला.
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा सत्तेत असलेले चौथे श्रीनिवास राव यांनी विलीनीकरणाच्या करारनाम्यावर सही केली. महाराष्ट्राच्या मुख्यभूमीपासून हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या मराठी पराक्रमाचे प्रतीक असलेल्या या संस्थानाचा अंत झाला.
आजही तामिळनाडूच्या आडनाड ठिकाणी असलेल्या या गावात अनेक मराठी भाषिक लोक राहतात.
हे ही वाच भिडू.
- म्हैसूरला आधुनिक बनवण्याचे श्रेय एका मराठी माणसाला जाते
- आज आपल्या स्टेट्स वॉलवर दिसणाऱ्या मराठी शायरीचं श्रेय भाऊसाहेब पाटणकरांना जातं..
- १९९१ च्या जागतिकीकरणामध्ये मनमोहन सिंग यांच्यासोबत एका मराठी नेत्याचं देखील योगदान आहे..