भारतातील एकमेव दुर्मिळ मंदिर जिथे मानवमुखी गणपती पुजला जातो…
गणेशोत्सव म्हणजे एक जबरदस्त सण आणि सगळ्यांनाच आवडणारा उत्सव. गणेशोत्सव हा फक्त महाराष्ट्रपुरता मर्यादित नसून भारतभर आणि जगभर साजरा केला जातो. या काळात देशभर धूम असते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गणपती पाहायला मिळतात.
प्रत्येक प्रसिद्ध गणपती मंदिराला त्याचा एक प्राचीन ठेवा असतो. असच एक गणपती मंदिर आहे तामिळनाडूच्या तिरुवरूर जिल्ह्यात. हे गणेश मंदिर इतर गणपती मंदिरांपेक्षा वेगळं आणि खास आहे. या विशेष कारणामुळे हे मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. फक्त पुजाच नाही तर लोक इथे आपल्या पितरांना शांती लाभावी म्हणून सुद्धा येथे येतात.
तामिळनाडूच्या तिरुवरूर जिल्ह्यातील कुटनूर या गावात हे मंदिर स्थित आहे. कुटनूर पासून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर तीलतर्पण पुरी आहे. इथलं आदी विनायक मंदिर लोकांच्या आस्थेचं केंद्र आहे. या विनायक मंदिरातील नरमुखी गणपती म्हणजे मानवी स्वरूप असलेल्या मूर्तीची पूजा केली जाते.
देशभरात गजमुख असलेल्या गणपतीची पूजा केली जाते पण इथं नरमुखी गणपतीला पूजलं जातं. या कारणामुळे हे गणपती मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. एवढंच नाही तर या मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे श्रद्धाळू लोकं आपल्या पितरांच्या शांतीसाठी येथे आवर्जून उपस्थित राहतात.,
या मंदिराची खासियत आणि काही तथ्यसुद्धा आश्चर्यकारक आहेत. या ठिकाणाला तीलतर्पण पुरी म्हणून का संबोधले जाते ?
पौराणिक आख्यायिकेनुसार भगवान श्रीरामांनी आपल्या पितरांच्या शांतीसाठी पूजा रचली होती. म्हणून श्रीरामांनी सुरू केलेली ही प्रथा आजही लोकं आपल्या पितरांच्या शांतीसाठी आयोजित करतात. याच कारणामुळे या ठिकाणाला तीलतर्पण पुरी म्हणून ओळखलं जातं. पूजापाठ हे नदीच्या तीरावर केले जातात पण धार्मिक विधी हे मंदिरात केले जातात. याच विशेष गोष्टींमुळे दुरून दुरून लोक इथे येतात.
आदी विनायक मंदिरात फक्त गणपतीचं नाही तर भगवान शंकराची सुद्धा पूजा केली जाते. इथं गणपती मंदिर आहेच शिवाय भगवान शंकर आणि सरस्वती देवीचं सुद्धा मंदिर आहे. इथं येणारे श्रद्धाळू लोकं गणपती सोबतच शंकर भगवान आणि सरस्वती देवीपुढे डोकं नक्की टेकवत असतात.
पौराणिक कथेच्या अनुसार जेव्हा प्रभू श्रीराम आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार करत होते तेव्हा त्यांनी ठेवलेले तांदळाचे चार पिंड किड्यांमध्ये रूपांतरित झाले. हे काही एकदाच झालं नाही तर पुन्हा पुन्हा हाच प्रकार होत राहिला. यावर प्रभू श्रीराम यांनी शंकर देवाचं स्मरण केलं आणि शंकराने श्रीरामांना आदी विनायक मंदिरात जाऊन पूजा करायला लावली.
भगवान शंकर यांच्या आज्ञेला मानून राम यांनी आदी विनायक मंदिरात आपल्या वडिलांच्या शांतीसाठी पूजा केली. पूजा केल्यानंतर ते चार पिंड शिवलिंगात रूपांतरित झाले. वर्तमान परिस्थितीत हे चारही शिवलिंग आदी विनायक मंदिराजवळच्या मुक्तेश्वर मंदिरात स्थित आहेत.
अशा अनेक गोष्टींमुळे हे आदी विनायक मंदिर प्रसिद्ध आहे आणि मोठ्या संख्येने तिथं भाविक पूजा करण्यासाठी जमतात.
हे हि वाच भिडू :
- भारतच नाही तर चीन, जपान, थायलंडमध्ये प्राचीन काळापासून गणपती पुजला जातो…
- गेल्या तीन पिढ्या गणपती बाप्पाला सुबक आणि सुंदर बनविण्याचे काम मुकेरकर परिवार करत आहे.
- १२९ वर्षे कसलीही वर्गणी न घेता गणेशोत्सव साजरा करणारे पुण्याचं एकमेव गणपती मंडळ.
- काम पाहिजे असेल तर मला मत द्या, भाषण ऐकायचं असेल तर बापूसाहेबांना गणपतीमध्ये बोलवू…