९७ वर्षांपूर्वी तानाजीच्या पराक्रमावर बनलेला हा चित्रपट भारतातला पहिला सुपरहिट सिनेमा होता !

भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील एक अतिशय महत्वाचं नांव म्हणजे बाबुराव पेंटर हे होय. त्यांचं मूळ नांव बाबुराव मेस्त्री असं होतं, परंतु घरात असलेल्या रंगकामाच्या परंपरेमुळे त्यांना पेंटर हे नांव पडलं.

लहानपणापासूनच त्यांना व त्यांच्या बंधूना आनंदराव पेंटर यांना सिनेमाविषयी आकर्षण होतं. सुरुवातीचा काही काळ दादासाहेब फाळके यांच्याबरोबर साहाय्यक म्हणून त्यांनी काम केलं.

पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने १९१८ साली बाबूरावांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.

या कंपनीच्या माध्यमातूनच निर्मिती केलेला ‘सावकारी पाश’ हा मूकपट भारतीय चित्रपट इतिहासात एक मैलाचा दगड मानला जातो.

महाराष्ट्रातील अनेक नामवंत कलाकारांची फळी देखील बाबुराव पेंटर यांच्या मार्गदर्शनात कोल्हापुरात तयार झाली. व्ही. शांताराम ,बाबुराव पेंढारकर, फत्तेलाल, दामले , मास्टर विनायक अशा अनेक कलाकारांचा समावेश होतो.

याच कलाकाराना घेऊन बाबुराव पेंटरांनी १९२३ साली तानाजी मालुसरेंच्या पराक्रमावर सिंहगड हा ऐतिहासिक सिनेमा बनवला. हा सिनेमा मूकपट होता पण अनेक अर्थाने वेगवेगळे प्रयोग बाबूरावांनी या पिक्चरच्या निमित्ताने केले.

सिंहगडच शुटींग पन्हाळा किल्ल्यावर करण्यात आल होतं. अख्ख्या भारतात पहिल्यांदाच आउटडोर शुटींग करण्यात आलं होत.पन्हाळ्यावर सिंहगडावरच्या लढाईचा सेट लावून चित्रिकरणासाठी रात्री दिव्यांचा प्रकाशझोत उभा करण्यात आला होता.

बाबुराव पेंटरानी चित्रपट बनवताना आपल्या कलात्मक दृष्टीत आड येईल अशी कोणतीही तडजोड केली नाही.

शुटींग सुरु असताना बाबुराव पुढचा सीन कसा असावा हे चित्र काढून आपल्या कलाकारांना समजावून सांगत. अर्थात आजकाल सिनेमात सहज वापरली जाणारी स्टोरीबोर्डिंग ही संकल्पना पहिल्यांदा सिंहगडवेळीच वापरली.

तानाजी मालुसरेंचा रोल बाळासाहेब यादव यांनी केला होता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलमध्ये स्वतः बाबुराव पेंटर होते. या सिनेमाचे असिस्टंट दिग्दर्शक व्ही.शांताराम यांनी ऐत्यावेळी शेलारमामाची भूमिका निभावली.

याच पिक्चरचं प्रमोशनसुद्धा जबरदस्त करण्यात आल होतं.

बाबुराव पेंटरसाठी बाबुराव पेंटरनी १० बाय २० फुट एवढे प्रचंड पोस्टर स्वतः रंगवले. हे भलेमोठे सुंदर पोस्टर जेव्हा गावात लागायचे ते बघूनच पब्लिक थक्क होऊन जायचं. भारतीय सिनेमामध्ये पोस्टरची परंपरा सिंहगड या सिनेमाने घातली.

जेव्हा ‘सिंहगड’ हा रिलीज झाला तेव्हा चित्रपट बघण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी उसळली. आता पर्यंत तानाजींच्या गड आला पण सिंह आलाची कथा पुस्तकात वाचली होती, ऐकली होती पण प्रत्यक्ष मोठ्या पडद्यावर घडताना पाहणे हा एक वेगळाच अनुभव होता.

सगळ्या भारतभरात हा सिनेमा प्रचंड गाजला. सिंहगड ने त्याकाळात एवढे पैसे कमवले की सिनेमाच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्यासाठी इंग्रज सरकारने करमणूक कर घेण्यास सुरवात केली. 

भारतातला पहिला सुपरहिट सिनेमा म्हणजे सिंहगड!

या सिनेमाच गारुड इतकी वर्ष भारतावर होतं की पुढे व्ही.शांतारामबापूंनी याच विषयावर याच नावाने बोलपट बनवला. हा सिनेमा देखील प्रचंड गाजला. शांताराम बापूनी खऱ्या अर्थाने आपल्या गुरुचे पांग फेडले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.