ब्रॅण्ड स्टोरी : ढगात नेणाऱ्या टॅंगोचे चाहते भारतातच नाही तर फॉरेनमध्ये देखील आहेत

जगात पेप्सी आणि कोकाकोलाची भांडणं तुम्ही ऐकली आहेत. आदिदास आणि नायकेची भाऊबंदकी तर जगप्रसिद्ध आहे. भारतात पण ब्रँड वॉर काही नवीन नाही. पण भारतातलं एक ब्रँड वॉर देशी दारू साठी झालेलं.

“अंग्रेजी शराब पिने पर इंसान सीधे अपने घर जाता है, और देसी पीकर वो सबकी मां बहन एक करके नाली मैं सो जाता है!”

सर्व प्रथम सर्व भिडूंना गटारी अमावस्येच्या हार्दिक चियर्स. इंग्लिश दारू  दारू हि वर्गवारी भारताच्या इतिहासात गेली अनेक वर्ष छळत आहे. दारू पिल्यावर इंग्लिश बोलणाऱ्या देशात देशी दारूवर अन्यायच होत आलाय. बाकी कोणी काहीही म्हणो सगळ्यात कड्डक दारू देशीच असते हे सगळ्यांना मान्यय.

याच देशीचा सर्वात फेमस ब्रँड टॅंगो पंच याच्यासाठीची भांडणं पार हायकोर्टापर्यंत गाजलेली.

आधी बघू हा ब्रँड बनवलेला कोणी ?

या स्टोरीची सुरवात होते १८८८ साली. भोर संस्थानातले सावकार गोविंद आगाशे यांच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आले. नाव चंद्रशेखर. गेली अनेक वर्षे भोरच्या पंतसचिवांच्या दरबारात आगाशेंना मुख्य न्यायाधीश म्हणून मोठा मान होता. घरात संपन्नता होती. चंद्रशेखर आगाशे अकरा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या मागे भाऊबंदानी सगळी संपत्ती हडप केली. लहान दोन भावंडांसह घरची सगळी जबाबदारी लहानग्या चंद्रशेखर यांच्यावर आली.

शिक्षण बंद पडलं आणि त्यांनी पोस्टात नोकरी पकडली. जात्याच हुशार आणि स्वभावाने खटपट्या असणाऱ्या चंद्रशेखर आगाशेंनी वेगाने प्रगती केली. त्यांचा आपल्या भावंडांचं शिक्षण केलं, पुढं जाऊन स्वतःच शिक्षण देखील पूर्ण केलं. वयाच्या सव्वीसाव्या वर्षी फर्ग्युसन मधून बीएची डिग्री पूर्ण केली.

ते पुण्याच्या नूतन मराठी शाळेत गणित शिकवू लागले. सोबतच आपलं लॉच शिक्षण देखील पूर्ण केलं. या काळात त्यांच्यावर लोकमान्य टिळकांच्या विचारांचा प्रभाव पडला. स्वदेशी चळवळीत त्यांनी आपल्या घरच्यांसह उडी घेतली. काही काळ केसरीमध्ये लिहिलंही.

पुढे त्यांना भोर संस्थानात बोलावून वडिलांना होता तोच मुख्य न्यायाधीश पदाचा मान देण्यात आला. पुढे ते संस्थानच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख झाले. या काळात चन्द्रशेखर आगाशेंनी भोरमध्ये अनेक विकास कामे केली. भाऊबंदानी हडप केलेली आपली जुनी मालमत्ता देखील परत मिळवली.

१९३३ साली मुंबईच्या ब्रिटिश गव्हर्नरने काही धोरणे बदलली यात मॉरिशस मधील साखरेवर कर वाढवून भारतात ऊसशेतीला प्रोत्साहन देणाऱ्या योजनेचा समावेश करण्यात आला. 

 याचा फायदा घेत आगाशे यांनी  २१ सप्टेंबर १९३४ रोजी बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लिमिटेडची स्थापना केली.

डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या अखत्यारितील अनेक राज्यांचे १९३५ ते १९३७ या काळात आगाशे यांनी दौरे केले. त्यातील विविध ग्रामपंचायतींत त्यांनी सिंडिकेटचा प्रसार केला. सिंडिकेटची सार्वजनिक मर्यादित कंपनी केल्यावर आगाशेंना केसरी वृत्तपत्राने जनसंपर्कासाठी मदत केली, तर नव्याने स्थापन झालेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्रने अर्थसाह्य दिले. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या उभारणीत देखील त्यांचा सिंहाचा वाटा होता.

 त्यांची कार्यपद्धती आणि समभाग विकून भांडवल उभे करायची पद्धत पुढे ‘आगाशे पॅटर्न’ या नावाने ओळखली जाऊ लागली.

यातूनच १९३९ साली चंद्रशेखर आगाशेंनी भोरगाव येथे आपला पहिला  साखर कारखाना उभारला.  ‘श्री’ या व्यापार चिन्हाखाली साखर विकली जात असल्याने या गावाने नाव बदलून श्रीपूर असे केले. फक्त साखरच नाही तर इतर बायप्रॉडक्ट्स दारूच्या निर्मितीमध्ये देखील बृहन महाराष्ट्र सिंडिकेटने उडी घेतली.

चंद्रशेखर आगाशे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे  पंडितराव आगाशे आणि ज्ञानेश्वर आगाशे यांनी बिझनेस पुढे नेला. बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट तर्फे बॅरिस्टर व्हिस्की, बृहन्स फाईन व्हिस्की, बृहन्स नो वन व्हिस्की, नेपोलियन व्हिस्की, ऑफिसर्स क्लब व्हिस्की हे अनेक ब्रँडेड व्हिस्की बनवले जातात.

इतकंच नव्हे तर २००५ साली ऑस्ट्रेलियन वाईन कंपनी सोबत टायप करून आगाशे यांनी मेड इन इंडिया फॉरेन लिकरची सुरवात केली.

हे सगळं झालं तरी आगाशे यांचा सगळ्यात गाजलेला ब्रँड म्हणजे टॅंगो पंच.

वाजवी किंमतीत स्वर्ग सुखाचा आनंद देणारे टॅंगो पंच म्हणजे उभ्या महाराष्ट्राची जान. संत्रा आणि टॅंगो पंच शिवाय देशी दारूची ओळखच पटत नाही हे नक्की. सगळ्यात महत्वाचं म्हणजे टॅंगो पंच हा सगळ्यात जास्त कॉपी केला जाणारा ब्रँड नेम आहे. नेहमी टॅंगोच्या नावाखाली कित्येकजण ड्युप्लिकेट दारू देखील विकतात.

या सगळ्यासाठी २००१ साली बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेटने टॅंगो चार्ली हा ब्रँड रजिस्टर केला होता. पुढे  २००८ साली  बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लिमिटेड बृहन करण शुगर सिंडिकेट बनला.

त्यानंतर मात्र काही वर्षांनी त्यांच्यात व साऊथ कोकण डिस्टलरीज या कंपनी मध्ये टॅंगो ब्रँडवरून भांडन सुरु झाले. टॅंगो हे नाव वापरण्याचा अधिकार आपल्यालाही आहे असं या दुसऱ्या कंपनीचं म्हणणं होतं. हि केस महाराष्ट्रच नाही तर देशभरात गाजली. अखेर निर्णय बृहन करणच्याच बाजूने लागला.

आज टॅंगो पंच, नाशिक संत्रा, देशी निर्वाना, मुंबई टॅंगो संत्रा, गुलाबो, मँगो फन अशा अनेक फेव्हर मध्ये टॅंगो चाखायला मिळते. टॅंगोवाले एवढे ऍडव्हान्स झाले आहेत की त्यांनी आपली वेबसाईट देखील बनवली आहे. ढगात नेणाऱ्या टॅंगोचे चाहते भारतातच नाही तर फॉरेनमध्ये देखील आहेत.

तर गड्यानो देशी दारूला हलक्यात घेऊ नका. त्यांनी देखील मोठा ब्रँड बनवलाय. त्याची सक्सेस स्टोरी देखील भन्नाटच आहे.

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. Rajiv Patil says

    Your title and story are altogether different. I hope this journalist has basic knowledge of Headline and News.

Leave A Reply

Your email address will not be published.