गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांचं सौंदर्य घालवत असलेले तेलगोळे हे एक मोठं संकट आहे

गोव्यात पर्यटन सुरु झालयं, म्हणून फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर थोडं थांबा. आधी हि स्टोरी वाचा आणि मग प्लॅन करा. कारण गोव्याच्या किनाऱ्यांवर सध्या एक वेगळंच संकट आलय. या संकटाच नाव आहे तेलगोळे अर्थात टारबॉल. काळे, चिकट आणि अत्यंत घाणेरडे असे हे तेल गोळे गोव्याच्या जवळपास सगळ्याच महत्वाच्या किनाऱ्यांवर दिसत आहेत.

त्यामुळे अगदी मोबोरपासून कासावलीपर्यंत तेलगोळ्यांनी काळवंडलेली किनारपट्टी सहजपणे नजरेस पडत आहे. यातून एकप्रकारे गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांचं सौंदर्य जात असल्याचं दिसून येत आहे. हे तेलगोळे जर पायाला चिकटले तर ते काढण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. दगडाने घासून घासून काढावे लागतात.

पण हे तेलगोळे नेमके आहेत तरी काय आणि ते आलेत कुठून? मुख्म म्हणजे ते गोव्यात कसे? आणि ते साफ करता येत नाहीत ला?

तेलगोळे हा काय प्रकार आहे?

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियनोलॉजी (एनआयओ) संस्था समुद्रात सातत्यानं होत असलेल्या विविध हलचाली आणि बदलांवर लक्ष ठेवत असते. या संस्थेच्या अहवालानुसार, हे तेलगोळे समुद्रात आधीपासून अस्तित्वात असलेल्या कच्च्या तेलामुळे किंवा काही नैसर्गिक गळतीमुळे तयार होत आहेत.

याच संस्थेच्या एका अभ्यासानुसार,

“वारा आणि लाटा पाण्यात असलेल्या तेलाला लहान लहान तुकड्यांमध्ये विभाजित करतात. यामुळे सतत, तेलाचे स्वरूप बदलत राहते आणि हे छोटे तुकडे एकत्र मिळून मोठे तेलगोळे तयार करतात.

२०१३ मध्ये एनआयओने एक अभ्यास अहवाल प्रकाशित केला होता. त्यात म्हंटले होते,

“जेव्हा समुद्रातील तेल विहिरी लिकेज होतात, चुकून किंवा जाणूनबुजून जहाज धडकतात किंवा सांडपाणी आणि उद्योगांमधून निघणारा कचरा समुद्रात टाकला जातो तेव्हा असे तेलगोळे तयार होऊ शकतात.”

बहुतेक प्रकरणांमध्ये तेलगोळे हे तेलाच्या गळतीकडे इशारा करत असतात. पण इथं अजून एक प्रकार बघायला मिळतो तो म्हणजे असे तेलगोळे पावसाळ्याच्या दिवसांमध्येच का बघायला मिळतात. कारण कोणत्याही प्रकारचं तेलाचं किंवा इतर गोष्टीचे प्रदूषण वर्षभर समुद्रामध्ये अस्तित्वात असतेच. तर यामागे पावसाळ्यात उच्च दाबाने वाहणारी हवा हे कारण असल्याचं सांगण्यात येते.

या तेलगोळ्यांमुळे नुकसान काय होते?

या तेलगोळ्यांमुळे नेमके कायनुकसान होते, याबाबतचा शास्त्रोक्त असा अभ्यास अजून तरी समोर आलेला नाही. मात्र ते एकदा का जर पायाला चिकटले तर अनेक वेळा धुतल्यानंतरच स्वच्छ करता येतात. सोबतच जर हे तेलगोळे मच्छीमारांच्या जाळ्यात अडकले तर त्यांचा त्रास पण वाढू शकतो. पाण्यात समुद्री जीवांनी हे तेलगोळे खाल्ले तर नक्कीच त्यांचं जीवन देखील धोक्यात येऊ शकते.

सोबतच आता गोव्यावर देखील या तेलगोळ्यांचा विशेष परिणाम जाणवू शकतो. कारण गोव्याची संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. जर अशा प्रकारच्या प्रदूषण आणि इतर कारणांनी पर्यटकांनी समुद्र किनाऱ्याकडे पाठ फिरवली तर त्याचा परिणाम थेट गोव्याच्या लोकांवर होऊ शकतो. एकूणच काय तर संपूर्ण समुद्र जीवनावर या तेलगोळ्यांचा परिणाम होऊ शकतो.

गोवा सरकारने हे तेल गोळे काढण्यासाठी काय केले?

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर याआधी देखील असे तेलगोळे बघायला मिळाले आहेत. मात्र यावेळची परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण यावेळचे प्रमाण बरेच जास्त आहे. त्यामुळे प्रशासन देखील चांगलेच वैतागले आहे. समुद्रकिनारे वारंवार स्वच्छ केले जात आहेत. पण येणाऱ्या प्रत्येक लाटेबरोबर नवीन तेलगोळे किनाऱ्यावर येत आहेत.

गोव्याचे पर्यावरण मंत्री निलेश काब्राल यांनी हे आतापर्यंतचे सर्वात मोठे तेल गोळ्यांचे संकट असल्याचे म्हंटले आहे. त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राशी बोलताना सांगितले कि,

गेल्या वर्षी आम्ही तेलगोळ्यांचे नमुने एनआयओला पाठवले होते. ते कशामुळे आणि कुठे तयार होतात याची माहिती आम्हाला मिळू शकेल असा उद्देश होता. या संस्थेच्या मते, मागच्या वेळी हे तेलगोळे मुंबई हायमधील समुद्री तेलाच्या विहिरींमधून आले होते. त्यानंतर आम्ही याबाबतचा अहवाल तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना सादर केला होता.

काब्राल पुढे म्हणाले,

मात्र या वेळचे तेलगोळे गतवर्षी पेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांची पुन्हा चाचणी करावी लागेल आणि अहवाल केंद्राकडे पाठवावा लागेल. यामध्ये एक राज्य म्हणून आमची भूमिका अत्यंत मर्यादित आहे. माझं मत आहे कि हे असे तेलगोळे फक्त गोव्यातच नव्हे तर बाकीच्या पश्चिम किनारपट्टीवर देखील जमा होत असावेत.

हे तेलगोळे फक्त गोव्यातच आहेत का?

एकदा समुद्रात असे तेलगोळे तयार झाले तर ते सहज नष्ट होतं नाहीत. ते शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात. भारतात साधारण २०१० पासून असे तेलगोळ्यांचे चित्र दिसू लागले आहेत. मात्र यंदा पहिल्यांदाचे ते गोव्यात मोठ्या प्रमाणात दिसले आहेत. गोवा व्यतिरिक्त दक्षिण गुजरात, मंगलोर आणि मुंबईच्या किनारपट्टीवरही ऑगस्टमध्ये तेलगोळे दिसून आले आहेत. पण फार कमी प्रमाणात.

अमेरिकेच्या लॉस एंजेलिस समुद्रकिनाऱ्यांवर अनेक वेळा तेलगोळे दिसून आले आहेत. मात्र यंदा गोव्यात दिसून आलेलं तेलगोळ्यांचं संकट बरचं मोठं आहे. सोबतच स्थानिक माध्यम प्रतिनिधींनी सांगितल्यानुसार सध्या गोव्यापासून दिल्लीपर्यंतच्या अधिकाऱ्यांना या तेलगोळ्यांच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी कोणताही ठोस उपाय सापडलेला नाही.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.