औरंगजेबाच्या दरबारात राहून त्याने आपल्या ग्रंथात मराठ्यांच कौतुक केलं होतं

मिर्झा मुहंमद.. विचित्र इसम.. कुणाला कशाचा छंद असेल काही सांगता येत नाही. कोण वस्तू गोळा करत असेल, कोण पत्र.. तर कोण शस्त्र.. कोण पोस्टकार्ड.. कुणाला गाड्या जमा करायला आवडत असतील तर कुणाला पुस्तक.. छंद कोणत्याही गोष्टीचा असू शकतो. भारताच्या मध्ययुगीन कालखंडात असा एक व्यक्ती होऊन गेला ज्याचा छंद विलक्षण होता..

सतराव्या आणि अठराव्या शतकात होऊन गेलेल्या काही महत्वाच्या व्यक्तींच्या मृत्यूतारखा लिहून ठेवण्याचा छंद एका व्यक्तीला होता.त्याच नाव मिर्झा मुहंमद..

बाराशे वर्षांच्या कालखंडात होऊन गेलेल्या प्रमुख राजकीय-अराजकीय व्यक्ती आणि त्यांचे मृत्यूशक अशा स्वरूपात त्याने दोन खंड लिहिले. आज इतिहासात हे दस्तावेज ‘तारीखे मुहंमदी’ म्हणून प्रसिद्ध आहेत.

मिर्झा मुहंमद याचा जन्म 4 एप्रिल 1687 रोजी झाला. इसवी सन 1703 मध्ये त्याला सर्वात पहिल्यांदा औरंगजेबासमोर उभा करण्यात आले. त्यावर्षी त्याला दीडशे स्वारांची मनसब मिळाली. मिर्झा मुहंमदचे वडील, आजोबा हे औरंगजेबाची चाकरी करीत होते.

या मुहम्मद ने अनेक महत्त्वाच्या नोंदी करून ठेवल्या आहेत. अनेक व्यक्तींचा मृत्यू त्याने डोळ्याने पाहीला होता तर अनेकांच्या मृत्यूविषयी लोकांकडून माहिती मिळाली होती. त्याच्या अकराशे पेक्षा जास्त नोंदीमध्ये दीड-दोनशे मराठ्यांच्या नोंदी आहेत. त्या नोंदी एवढ्या महत्वपूर्ण आहेत की इतर कोणत्याही समकालीन साधनांमध्ये आपल्याला ते उल्लेख वाचायला मिळत नाहीत. त्याच्या ग्रंथामधील काही उदाहरणे पाहूया..

स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूची नोंद देताना मिर्झा मुहंमद लिहीतो,

“शहाजीचा नातू व शिवाजीचा मुलगा रामाजी उर्फ रामराजा याने आपला भाऊ संभाजी याच्या मृत्यूनंतर दक्षिणेत मोठे तेज व धाडस दाखवले”

राजाराम महाराजांची निडरता सांगताना मिर्झा मुहम्मद ने ‘कर्रोफर नमुदा’ असे शब्द वापरले आहेत. कर्र म्हणजे शत्रूवर हल्ले चढवणे आणि फर म्हणजे तेज, दबदबा, वैभव.. शत्रूवर बेडरपणे हल्ले चढवून दबदबा निर्माण करणे या शब्दात राजाराम महाराजांचा गौरव मिर्झा मुहंमद याने केला आहे.

राजाराम महाराजांच्या काळात होऊन गेलेला एक महान योद्धा म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे. त्यांच्या मृत्यूची नोंद देताना मिर्झा मुहंमद लिहीतो,

“नागोजी माने याच्याशी झालेल्या झटपटीत संताजी ठार मारल्या गेला.”

संताजी घोरपडे यांचा उल्लेख करताना मिर्झा मुहंमदने ‘अजकबार रऊसाए मरहटा मुफसदाने दखन’ या शब्दाने गौरव केला आहे. याचा अर्थ – दक्षिनच्या लढवय्या मराठा सरदारांपैकी एक व्यक्ती’..

अजून एक महत्वाची मराठा स्वराज्यातील व्यक्ती म्हणजे थोरले बाजीराव पेशवे. त्यांच्या मृत्यूची नोंद देताना मिर्झा लिहीतो,

“दक्षिणी ब्राम्हण बाळाजी विश्वनाथ याचा मुलगा बाजीराव मराठ्यांचे प्रमुख राजे शाहू यांचा सेनापती व प्रचंड विजय मिळवणारा-नर्मदेच्या काठावर मृत्यू दहा सफर ११५२ हिजरी (26 एप्रिल 1740) वय चाळीशीच्या आत…”

बाजीराव पेशव्यांचा गौरव करताना मिर्झा मुहंमद ने ‘साहबे फुतूहाते उज्जाम’ (प्रचंड विजय मिळवणारा) असा उल्लेख केला आहे. बाजीराव पेशव्यांच्या कामगिरीचे यापेक्षा सुंदर आणि कमी शब्दात केलेले मूल्यमापन क्वचितच आढळून येईल.

औरंगजेबाच्या दरबारात काम करत असूनही त्याने औरंगजेब आणि त्याची सोबत करणाऱ्या सरदारांना अतिशय तुच्छतेने संबोधले आहे.

औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत सोबत करणाऱ्या नेमतखान यांच्या मृत्यूची नोंद करताना मिर्झा मुहम्मद लिहीतो,

“अजखिबाइसे असर” म्हणजे या काळातील दुष्ट व अपवित्र लोकांपैकी एक.. नेमतखानच्या आडून औरंगजेबाला उपरोधीतपणे मारलेला हा टोमणा फार मजेशीर आहे.

हा ग्रंथ इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी आणि संशोधकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. यात अनेक महत्त्वाच्या लोकांची मृत्यूदिनांक आणि सोबतच थोडक्यात पण महत्वाचे असे उद्गार दिलेले आहेत.

औरंगजेबाचे तर जवळ जवळ सर्वच नातेवाईक कधी, कुठे, कसे मरण पावले याची नोंद आपल्याला वाचायला मिळते.

औरंगजेबाचे नशीब किती विचित्र होते याचा अंदाज या ग्रंथातून वाचायला मिळतो. त्याचे तीन भाऊ मारले गेले. पाच पैकी तीन मुली अविवाहित अवस्थेत मरण पावल्या. पाच मुलांपैकी एक कैदेत, एक इराणात निर्वासित अवस्थेत आणि दोन लढाईत मरण पावले. त्याचे सात नातू, दोन पणतू मारले गेले. एक पणतू फारुखसियार याच्या नशिबी तर पदच्युती, अंधत्व आणि नंतर वध या गोष्टी आल्या. जे जिवंत राहिले ते नातू आणि पणतू (एकूण नऊ) यांच्या नशिबी आजन्म कारावास आला. औरंगजेबाच्या खानदानाचा सार या ग्रंथात आला आहे.

असा हा विलक्षण आणि तितकाच महत्वाचा ग्रंथ ‘तारीखे मुहंमदी’.

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.