एकेकाळी या नेत्याच्या जोरावर राष्ट्रवादीने बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बघितलं होतं.

बिहारच्या निवडणुका झाल्या. राजद आणि भाजपमध्ये जोरदार फाईट झाली. कॉंग्रेसचं पानिपत झालं, एनडीएचे सरकार आले, नितीश कुमार मुख्यमंत्री होतील. हे सगळं ठीक आहे पण आपल्या महाराष्ट्रात सत्तेत असलेले शिवसेना, राष्ट्रवादी हे देखील तिथल्या निवडणुकीत उतरले होते. या दोन्ही पक्षांचे एकही उमेदवार निवडून आले नाहीत, एवढच काय एकूण बिहार राज्यात नोटाला मिळालेल्या मतांची टक्केवारी त्यांच्या पेक्षा जास्त आहे.

शिवसेनेचं जाऊ द्या, तो तर प्रादेशिक पक्ष आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेस हा तर राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे. तरीही त्यांना हाराकिरी पत्करावी लागली.

पण पूर्वी राष्ट्रवादीची स्थिती अशी नव्हती. एककाळ असा होता एका नेत्याच्या जीवावर राष्ट्रवादीने इथे मुख्यमंत्री बनवायचं स्वप्न देखील पाहिलेलं.

नाव तारिक अन्वर

तारिक अन्वर यांचा जन्म  पटना बिहारचा. कॉलेजच्या वयात त्यांनी राजकारणात प्रवेश केला. बिहार युथ कॉंग्रेसमधून त्यांनी अनेक आंदोलने करून संजय गांधींचं लक्ष वेधून घेतल. त्यांची तडकफडक भाषणं, आणीबाणीमध्ये केलेलं काम यामुळे कॉंग्रेसमधील वजन वाढत गेल.

बिहारमध्ये जेपींच्या विद्यार्थी आंदोलनाचा जोर मोठा होता तेव्हा तारिक अन्वर सारखे विद्यार्थी नेते कॉंग्रेसची लढाई तिथे लढत होते.

फक्त या कामगिरीवर फक्त २५ वर्षांच्या तारिक अन्वर यांना १९७७ साली कॉंग्रेसने खासदारकीचं तिकीट मिळालं.

तो इंदिरा गांधींचा पडता काळ होता, अनेक मोठे नेते त्यांची साथ सोडून गेले होते, कॉंग्रेसच्या अध्यक्षांनी थेट इंदिराजींना पक्षातून काढून टाकलं होतं. जे काही मोजके कार्यकर्ते त्यांच्या सोबत उरले होते यात तारिक अन्वर यांचा समावेश होत होता.

आणखी एक बिहारी नेता होता जो इंदिरा कॉंग्रेसचा खजिनदार बनला होता, त्याच नाव सीताराम केसरी. ज्या काळात कॉंग्रेसकडे कार्यकर्ते नव्हते तेव्हा पक्षाला निधी मिळवून देणारा हा माणूस. तारिक अन्वर यांचे त्यांच्याशी चांगले सूर जुळले. सीताराम केसरी यांनी ८० च्या निवडणुकीत तारिक अन्वर यांना मोठी साथ दिली. त्यांच्या जोरावरच तारिक अन्वर बिहारच्या कटिहार मधून खासदारकी निवडून आले.

इथून तारिक अन्वर हे नाव मोठ होण्यास सुरवात झाली. त्यांना युथ कॉंग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आलं. संजय गांधींच्या मृत्यूनंतर तारिक अन्वर धूर्तपणे राजीव गांधी यांच्या गटात गेले, त्यांचेही लाडके बनले.

याच काळात बिहार मध्ये कुप्रसिद्ध बॉबी हत्याकांड घडून आले. बॉबी नावाच्या एका मुलीचा मृतदेह गाडलेल्या अवस्थेत सापडला होता. राजकीय रंग चढून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी पुढे करण्यात आली.

संपूर्ण देशात या घटनेमुळे खळबळ उडाली. फॉरेनच्या मीडियाचेही याकडे लक्ष गेले.

आंदोलन करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचेच तारीख अन्वर सर्वात पुढे होते. साहजिकच याला सीताराम केसरी यांची फूस होती. राजीव गांधी यांच्या मागे लागून त्यांनी ही कामगिरी पारच पाडली. पण सीताराम केसरी यांचे स्वप्न अधुरे राहिले आणि मुख्यमंत्रीपदाची माळ दुसऱ्याच्याच गळ्यात पडली.

तारिक अन्वर मात्र या घटनेनंतर मीडियावर झळकत राहिले. राजीव गांधी पंतप्रधान बनल्यावर त्यांचंही पक्षातील वजन वाढतच गेलं. कटीहार मध्ये त्यांनी परत लोकसभा जिंकली.

दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षातर्फे शाही इफ्तार पार्टीची सुरवात त्यांनीच केली. त्यांचं फक्त काँग्रेसच नाही तर पक्षाबाहेर देखील संपर्क वाढत होता.

१९८८ साली तारिक अन्वर बिहार काँग्रेसचे अध्यक्ष बनले. त्यांना बिहारचा भावी मुख्यमंत्री समजलं जात होतं. तेव्हाच्या मंत्रिमंडळाट तारिक अन्वर यांना अर्थमंत्र्याची खुर्ची देण्यात आली मात्र अन्वर यांना राष्ट्रीय राजकारणात जास्त रस होता.

पुढच्या निवडणुकीत मात्र लालूप्रसाद यादव यांच्या मुळे त्यांचा लोकसभेला पराभव झाला. १९९१ च्या काँग्रेस लाटेतही ते आपली सीट वाचवू शकले नाहीत.

पण त्यांच्या पाठीशी त्यांचे गुरू सीताराम केसरी भक्कम पणे उभे होते. केंद्रातील त्यांचं स्थान वाढतच चाललं होतं.

नरसिंह राव यांच्या नंतर जेव्हा अख्खी कॉंग्रेस सीताराम केसरी यांच्या हातात आली तेव्हा तारिक अन्वर यांचे अच्चे दिन सुरु झाले.

१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी खासदारकी जिंकत जोरदार पुनरागमन देखील केलं होतं. तो काळ होता फक्त बिहारच नाही तर संपूर्ण देशात तारिक अन्वर यांच्या इच्छेविरुद्ध कॉंग्रेस मध्ये पान देखील हलत नव्हतं. शरद पवार या सीताराम केसरी यांच्या टीमचे चेष्टेने दोन मियां एक मीरा असं म्हणून गंमत करायचे.

सीताराम केसरी यांना पंतप्रधान बनवायचं म्हणून डावपेच आखणाऱ्या गटाचे ते प्रमुख होते. त्यांनी जंग जंग पछाडल, दोन वेळा केंद्रातील सरकारे पाडली तरी केसरी हे पंतप्रधान बनू शकले नाहीत.

सोनिया गांधी जेव्हा राजकारणात आल्या तेव्हा सीताराम केसरी यांची अपमानास्पद रित्या हकालपट्टी करण्यात आली. तेव्हाच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी म्हाताऱ्या सीताराम केसरी यांना मारहाण देखील केली, त्यांचे धोतर फाडले. अशावेळी  या घटनेचा एकांडा विरोध फक्त तारिक अन्वर यांनी केला.

सिताराम केसरी यांच्या बरोबर त्यांचा मानसपुत्र समजले जाणारे तारिक अन्वर हे एकमेव नेते उभे राहिले.

सीताराम केसरी यांच्या नंतर तारिक अन्वर यांचाही पडता काळ सुरू झाला. सोनिया गांधींनी अध्यक्षपद हातात घेतलं म्हणून अनेक काँग्रेस नेते नाराज होते. पण यासाठी मुख्य आवाज उठवला तारिक अन्वर यांनी. शरद पवारांनी देखील सोनियांजींच्या विदेशी असण्याचा मुद्दा लावून धरला.

काँग्रेस विरुद्ध कटकारस्थान करत आहेत असं म्हणून पवार, पीए संगमा आणि तारिक अन्वर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. या तिन्ही नेत्यांनी मिळून एका नवीन पक्षाची स्थापना केली,

याला नाव दिलं, राष्ट्रवादी काँग्रेस

शरद पवार सर्वात जेष्ठ म्हणून त्यांना पक्षाचा अध्यक्ष बनवण्यात आलं. संगमा आणि तारिक अन्वर या संस्थापकांनी आपआपल्या राज्यात मुख्यमंत्रीपद मिळवणे टार्गेट ठेवले होते.

पवारांनी राष्ट्रवादी रुजावी म्हणून आकाश पाताळ एक केले. महाराष्ट्रातील अनेक मोठे नेते त्यांच्या पाठीशी उभे राहिले. पुढच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी चांगली कामगिरी केली आणि काँग्रेस बरोबर भागीदारी करत सत्ता देखील मिळवली.

तारिक अन्वर मात्र बिहार मध्ये कमी पडले. त्यांनी आपली हयात काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वात काढली होती मात्र त्यांना तळागाळात उतरून पक्ष रुजवायला जमलंच नाही. स्वतःची खासदारकीची सीट देखील ते राखू शकले नाहीत. राष्ट्रवादीचे बिहार विधानसभेत २-३ च्या वर आमदार निवडून आणणे देखील त्यांना जमले नाही.

पुढे पवारांनी त्यांना महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर घेतलं.

तारिक अन्वर राजकारणात मागे पडत गेले. याचा फटका राष्ट्रवादीला देखील बसला. पवारांमुळे त्यांना मनमोहनसिंग यांच्या मंत्रीमंडळात काही काळ मंत्री देखील राहता आलं पण चमकदार कामगिरी करता आली नाही.

नाही म्हणायला ते २०१४ च्या मोदी लाटेतही कटीहारमधून खासदारकी निवडून आले मात्र यात त्यांच्या स्वतःच्या यशापेक्षा लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या मदतीचा मोठा वाटा होता.

मोदी पंतप्रधान बनले, तारिक अन्वर यांचं मंत्रीपद देखील गेलं. काही काळ त्यांनी राष्ट्रवादीमध्ये तग धरला, मात्र २०१८ साली पवारांनी मोदींच कौतुक केलं हे कारण सांगत पक्षाला रामराम केला आणि आपल्या मूळघरी काँग्रेसमध्ये परतले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.