नेहरूंची मंत्री जिच्या प्रेमात भल्याभल्यांची तपश्चर्या भंग झाली

भारताची त्याकाळची सर्वात तरुण खासदार. अतिशय सुंदर, केसांचा बॉबकट, बेताने नेसलेली साडी, चेहऱ्यावर एक तेजपूर्ण स्मितहास्य.

पन्नासच्या दशकात बोल्ड अँड ब्युटीफुल म्हणजे काय प्रश्न विचारला तर तीच नाव सांगितलं जातं असे.

संसदेत ती आली की सगळं सभागृह स्तब्ध होत असे. सगळ्या चर्चा थंडावत असतं. ती बोलायला लागली की सगळ्यात लोकसभेत सगळ्यात जास्त हजेरी असायची. फिल्मस्टारपेक्षा सगळ्यात जास्त गॉसिप तिच्याबद्दल चालायच्या.

त्या होत्या तारकेश्वरी सिन्हा.

बिहार काँग्रेसच्या विद्यार्थी चळवळीतुन आलेली तडकफडक नेता. हिंदी इंग्रजीवर प्रचंड प्रभुत्व. उर्दू शयरीवर हातखंडा.

४२च्या चलेजाव आंदोलनातदेखील सहभाग घेतला होता. भारतीय राजकारणात उच्चशिक्षित तरुण महिला त्याकाळी तरी दुर्मिळ होत्या.

पंडित जवाहरलाल नेहरूंनी तिला आपल्या मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री बनवलं.

तारकेश्वरी सिन्हा पहिल्यांदा चर्चेत आल्या ते फिरोज गांधी यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे. 

फिरोज गांधी म्हणजे देशाच्या पंतप्रधानांचे जावई,इंदिरा गांधींचे पती. प्रचंड करिष्मा असलेले तरुण नेता. फिरोज काँग्रेसचे नेते होते मात्र लोकसभेत पंतप्रधानाना कचाट्यात पकडण्यात सगळ्यात आघाडीवर असायचे. त्यांचं फॅन फॉलोविंग प्रचंड मोठं होतं.

पण फिरोज गांधी यांची प्रतिमा एक प्लेबॉय अशी होती. यावरून इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्यात वाद सुरू झाले होते. ते एकत्र राहत नव्हते. अशातच त्यांच्यात तारकेश्वरीदेवी यांचं आगमन झालं.

खरंतर तारकेश्वरी या देखील विवाहित होत्या. नवरा बिहारमध्ये मोठा वकील होता पण तारकेश्वरी यांचं सौन्दर्य, बिनधास्त स्वभाव यामुळे त्यांच्याभोवती गुढतेचं वलय पसरलेलं असायचं.

फिरोज आणि त्यांचे विचार जुळायचे. दोघं कायम दिसू लागल्यावर गॉसिप गप्पा यांचं पेव फुटल.

अस म्हणतात की एकदा अचानक इंदिरा गांधी फिरोज यांच्या खासदार निवासात गेल्या तेव्हा त्यांना एका स्त्रीची साडी तिथे मिळाली. हीच साडी त्यांनी तारकेश्वरीदेवीच्या अंगावर पाहिली होती. यातून फिरोज व इंदिरा यांच्यात प्रचंड मोठं भांडण झालं.

लवकरच फिरोज गांधी यांचे हृदयविकाराने निधन झाले. मात्र त्या दिवसापासून आयुष्यभर इंदिरा गांधीनी तारकेश्वरी यांना माफ केलं नाही.

तारकेश्वरी देवींनी अनेकदा आपल्या मुलाखतीमधून,

फिरोज व आपल्यात फक्त मैत्री होती आणि इंदूला गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्यास मी तयार आहे असं सांगितलं होतं.

पण काही उपयोग झाला नाही.

फक्त फिरोज गांधी नाही तर आणखी एक नेता होते ज्यांच्याबद्दल तारकेश्वरीदेवी यांचं नाव जोडलं जात होतं ते म्हणजे अर्थमंत्री मोरारजी देसाई.

मोरारजी आणि तारकेश्वरी दोघेही एकाच मंत्रालयात होते. तारकेश्वरी त्यांना आपला गुरू मानायची. त्यांच्या वयातदेखील प्रचंड अंतर होतं.

पण या गांधीवादी नेत्याने तारकेश्वरीदेवीवर प्रचंड जादू करून सोडली होती.

अस सांगितलं जातं की मोरारजी देसाई यांच्यासाठी तारकेश्वरी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्या रात्री हॉस्पिटलमध्ये मोरारजीभाई तिच्या उशाशी बसून राहिले होते.

पुढे नेहरूंच्या निधनानंतर त्यांचे वारसदार लालबहादूर शास्त्री पंतप्रधान बनले. पण शास्त्रीजींचा कार्यकाळ फार टिकला नाही. ताशकंद करारावेळी त्यांचं आकस्मित निधन झालं.

तेव्हा खाली झालेल्या खुर्चीवर मोरारजी देसाई यांची वर्णी लागावी यासाठी तारकेश्वरी देवी यांनी दिल्लीत भरपूर लॉबिंग केलं.

पण त्यांचं दुर्दैव म्हणजे मोरारजी देसाई यांना हरवून इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या.

हा तारकेश्वरीदेवी यांच्या साठी मोठा सेटबॅक होता. पुढे मोरारजी यांच्या सोबत त्यांनी काँग्रेस पक्ष देखील सोडला. इंदिरा गांधी यांनी जिद्दीने त्यांना त्यांच्या मतदारसंघात पाडलं. दोघींची रायव्हलरी अनेक वर्षे टिकली.

अखेर आणीबाणीच्या काळात तारकेश्वरीदेवी आपल जुनं वैर विसरून इंदिरा काँग्रेसमध्ये आल्या. पण त्यांच्या नशिबाने पुन्हा दगा दिला. ज्या मोरारजी देसाईंची त्यांनी साथ सोडली ते इंदिरा गांधींना हरवून पंतप्रधान बनले.

प्रचंड प्रतिभा असलेल्या तारकेश्वरी देवी राजकारणातून बाहेर फेकल्या गेल्या.

त्यांनी आपल्या भावाच्या नावे एक हॉस्पिटल उभारून तिथे समाजकार्य करत आपलं उर्वरित आयुष्य घालवल. त्यांची मुले देखील राजकारणात आली नाहीत. २००७ साली वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालं.

इंदिरा गांधींशी पंगा घेणारी भारताच्या राजकारणातील एक वादळी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख कायम राहिली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.