कोरोना लस दिलीये, म्हणून जपानी लोक या भिडूला पंतप्रधान बनवू पाहतायेत
गेल्या वर्षी सुरु झालेली कोरोना विषाणूची साथ अजूनही कायम आहे. हा सध्या वेगवेगळ्या लस उपलब्ध झाल्याने संक्रमितांची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी झालेली पहायला मिळतेय. मात्र या विषाणूचं सावट अजूनही कायम आहे.
तर या महामारीचा काळात मोठमोठया देशांना आर्थिक फटका तर बसलाचं. पण अनेक नेत्यांना आपली सत्ता देखील गमवावी लागली. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव नियंत्रित करण्यात अपयश आल्याने फ्रान्सचे पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांना राजीनामा दयायला लागला होता. असचं काहीस जपानमध्येही पाहायला मिळालं.
कोरोनाची बिघडती परीस्थिती हाताळता न आल्याने जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत होत. सोबतचं कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असतानाही टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन केल्याबद्दल सुगा यांच्यावर टीका करण्यात येत होती. ज्यामूळे त्यांनी आपला राजीनामा देणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, त्यानंतर आता जपानच्या नव्या पंतप्रधानाची जोरदार चर्चा सुरु झालीये.
खरं तर, सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (LDP) च्या अध्यक्षपदासाठी २९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. जपानच्या संसदेत एलडीपी पक्षाच्या बहुमताने गॅरंटी दिलीये की, जो कोणी २९ सप्टेंबर रोजी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक जिंकेल, तोचं जपानचा पंतप्रधान होईल. त्यामुळे LDP च्या सर्व नेत्यांनी पंतप्रधानपदी आपली वर्णी लागावी यासाठी तयारी सुरु केलीये.
दरम्यान, या सगळ्या नेत्यांमध्ये कोविड -१९ लसीचे प्रभारी मंत्री तारो कोनो यांना देशाचा पुढचा पंतप्रधान म्हणून जोरदार पाठिंबा मिळताना दिसतोय.
एका स्थानिक वृत्तपत्राने जपानच्या पंतप्रधानांसाठी केलेल्या सलग दुसऱ्या सर्वेक्षणात, तारो कोनो हे सर्वाधिक आवडते उमेदवार म्हणून समोर आलेत. या सर्वेक्षणानुसार, २३% जनतेचं मत आहे की, कोविड -१९ लसीचे प्रभारी मंत्री तारो कोनो हे पंतप्रधान पदासाठी सर्वात योग्य व्यक्ती आहेत.
याआधीही ५ ऑगस्टला सर्वेक्षण करण्यात आले होते, ज्यात ३१.९% मतांसह तारो कोनो यांचं नाव पुढं आलं होत. त्यांच्यानंतर माजी संरक्षण मंत्री शिगेरू इशिबा २१% मतांसोबत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर आधीच आपल्या उमेदवारीची औपचारिक घोषणा केलेले माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा सर्व्हेत १२% मतांनी पिछाडीवर आहेत.
खरं तर, योशिहिदे सुगा आपल्या पदावरून पायउतार होण्यापूर्वी, त्यांच्याऐवजी नेता पदासाठी पक्षाचे माजी धोरण प्रमुख फुमियो किशिदा यांची टक्कर असल्याचे मानले गेले होते.
जपानमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या १५ लाखांच्या वर असून त्यापैकी १६,३६९ जणांच्या मृत्यूची नोंद आहे.
यशस्वीरित्या राबवलेलं लसीकरण अभियान
लस उपलब्ध झाल्यांनतर जपानमध्ये लसीकरणाचा वेग आधी मंद होता. पण गेल्या महिन्याभरात, जपानमधील नागरिकांना कोविड -१९ लस इतर कोणत्याही मोठ्या देशापेक्षा वेगाने उपलब्ध देखील होतेय आणि लोकांचा यासाठी प्रतिसादही खूप चांगला आहे.
ऑगस्ट शेवटच्या आठवड्यात जपानच्या ४५ टक्के लोकसंख्येला लसीचे दोन डोस मिळाले होते. त्यात जपानमधल्या जवळपास ९०% ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. जे आधी लसीकरण सुरु केलेल्या अनेक देशांच्या तुलनेत जास्त आहे. आणि असं म्हंटल जातंय कि, हाच वेग जर पुढे राहिला तर येत्या काही आठवड्यांत जपान अमेरिकेला या प्रकरणात मागे टाकू शकतो. कारण अमेरिकेत सध्या ५२ टक्के लोकांचं लसीकरण झालंय.
दरम्यान जपानच्या कोरोनातल्या या यशामागे कोविड -१९ लसीचे प्रभारी मंत्री तारो कोनो यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे म्हंटले जाते
जॉर्जटाउन विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले तारो कोनो हे जपानचे कोविड -१९ लसीचे प्रभारी मंत्री आहेत. या आधी ते जपानचे माजी परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री होते. तारो कोनो यांची तरुणांवर मजबूत पकड आहे.
ते सोशल मीडियावरही जास्त सक्रिय असतात. इंग्रजी आणि जपानी या दोन्ही भाषांमध्ये ते आपले सोशल मीडिया अकाउंट हॅन्डल करतात. त्यातल्या जपानी पेजवर २.३ मिलियन फॉलोवर्ससोबत कोनो जपानमध्ये सर्वाधिक लोकप्रियतेच्या यादीत टॉपला आहेत.
दरम्यान, याआधीही कोनो पंतप्रधानपदासाठी मतदारांमध्ये लोकप्रिय होते. पण पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि बंडखोर प्रतिमेमुळे त्यांच्यापासून सावध आहेत. इतरांना वाटते की, कोना अजूनही पंतप्रधान पदासाठी खूप लहान आहे. त्यांना वयोमानानुसार कुठलाही जास्त अनुभव नाही.
दरम्यान, एका स्थानिक वेबसाईटच्या मते पक्षाचे कार्यकारी सरचिटणीस सेको नोडा सुद्धा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तर देशाचे पर्यावरण मंत्री शिंजीरो कोइझुमी देखील निवडणूक रिंगणात असतील.
हे ही वाचं भिडू :