५० वर्षांपूर्वी गणपती मंडळात प्रदर्शित झालेलं हे नाटक सीडीमुळे भावी पन्नास पिढ्यानांही हसवत राहील..

साधारण दोन हजार सालनंतरचा काळ. तोवर प्रत्येकाच्या घरात सीडी प्लेअर आले होते. कॉम्प्यूटर सुद्धा डोकावायला सुरवात झाली होती. टीव्हीवर लागतील तेच सिनेमे पहायचे ही गोष्ट मागे पडत चालली होती. इंग्रजीपासून ते मराठी सिनेमापर्यंत अनेक प्रकारचा कंटेट सीडीच्या रुपात घरात येऊ लागला. छोट्या छोट्या गावात हे सीडी प्लेअर देखील व्हीसीआर प्रमाणे भाड्याने मिळायचे. सीडीमध्ये गाणी भरून देणारे अगदी देवाप्रमाणे समजले जायचे,

याच सीडीच्या जमान्यात मराठी नाटकानांसुद्धा नवा प्लॅट्फोर्म मिळाला. आयुष्यात कधीच नाट्यगृहाची पायरी न चढलेल्या पब्लिकला सीडीच्या निमित्ताने पहिल्यांदा नाटक पाहायला मिळाले. यात सगळ्यात जास्त तीन नाटके गाजली. दामोदरपंत, पती सगळे उचापती आणि तरुण तुर्क म्हातारे अर्क. तिन्ही सुद्धा नाटके कॉमेडी होती.

खरं तर दामोदरपंत नाटक म्हणून एवढ गाजल नव्हत तेवढ सीडीवर गाजल. पती सगळे उचापती दोन्हीकडे सुद्धा हिट होतं. पण तरुण तुर्क म्हातारे अर्क मात्र जवळपास पन्नास वर्षे मिळेल त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर तुफान गाजलं होतं.

काय होती त्याची जादू?

एका कॉलेजच्या होस्टेलमध्ये राहणारे टगे बंडा आणि प्यारेलाल. त्यांच्या खोलीत फर्स्ट इयरचे दोन नवे विद्यार्थी राहायला येतात आणि नाटकाच्या कथानकाला सुरवात होते. हे दोन नवे विद्यार्थी म्हणजे शिट्टीच्या ऐवजी नुसती फुंकर निघणारा थर्ड पार्टी सिंग्युलर मुकुंदा आणि पन्नाशीत पोहचलेले अश्लील मार्तंड दिनानाथ दामोदर थत्ते उर्फ डीडीटी. खर तर या चौघांच्या खोलीत घडणारी ही कहाणी. डोळा मारणारी रेखा त्यांनी दारालाच अडकवलेली असते. असल हे इरसाल प्रकरण.

पण यासगळ्याहून इरसाल होते त्यांचे ह्याला ह्या लावणारे प्रोफेसर बारटक्के. डोक्यावर इंग्लिश टाइपची हॅट काखेत छत्री पण पँटेतून नाडी लोंबकळणारे निम्मी हाडे स्मशानात गेली तरी देठ हिरवा असणारे हे प्रोफेसर आपल्याच स्टाफ मधल्या एका मॅडमच्या मागे लागलेले असतात. हा सगळा गोंधळ म्हणजे तरुण तुर्क म्हातारे अर्क.

खर तर  सुनिल तावडे, राजन पाटील, अतुल परचुरे, संज्योत हर्डीकर या तरुण तुर्कांनी नाटकात चांगलं काम केल होतं पण हवा केली होती म्हाताऱ्या अर्कानी. मोहन जोशी आणि प्रोफेसर बारटक्के झालेल्या मधुकर तोरडमल या दोघांनी.

मधुकर तोरडमल प्रोफेसर बारटक्के म्हणून अभिनयात हाहाहीही तर केली होती पण ते नाटकाचे लेखक, दिग्दर्शक सबकुछ तेच होते.

मराठी सिनेमा इंडस्ट्री ज्यांना मामा म्हणून ओळखायची ते मधुकर तोरडमल. खर तर अहमदनगरच्या कॉलेजचे ते इंग्रजीचे प्रोफेसर. कॉलेजमध्ये शिकवण्याच्या निमित्ताने जगभरातल्या अभिजात साहित्याची ओळख झाली. नाटकाची, अभिनयाची आवड आधी पासून होतीच. कॉलेजमध्ये ही राज्यएकांकिका स्पर्धेसाठी नाटके लिहिली. तिथ त्याचं नाव गाजू लागलं. अखेर त्यांच्या प्रिन्सिपॉलनी त्यांना नाटकात काम करण्यासाठी एक वर्षाची सुट्टी दिली आणि तिथून त्यांची नवी इनिंग सुरु झाली.

आपल्या कॉलेजमधल्या अनुभवावरून, इंग्रजी शिकवताना आलेल्या गंमतीवरून त्यांनी तरुण तुर्क म्हातारे अर्क हे नाटक लिहील. त्याचा पहिला प्रयोग ११ सप्टेंबर १९७१ साली इचलकरंजीच्या डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवमंडळात झाला. तिथल्या कामगारांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांना तो आवडला. नाटक तुफान गाजणार याची मधुकरमामांना खात्री पटली.

नाट्यसंपदा या संस्थेखाली त्यांनी तरुण तुर्क ला व्यावसायिक रंगमंचावर उतरवायचं ठरवलं. त्यांच्या या निर्णयावर प्रचंड टीका झाली. एका समीक्षकाने तर या नाटकाला अश्लील ठरवत घरंदाज कुळातल्या सुशिक्षित बायकांनी तरुण तुर्क पाहू नये अशी खरमरीत समीक्षा लिहिली. पण प्रो मधुकर तोरडमल हे नाटकाप्रमाणेच बिलंदर होते. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितल

“घाबरू नका. या टीकाकारांचा मी बाप नाही तर आजोबा आहे.प्रयोग चांगलाच होतोय.”

आणि घडलही तसंच. १४ जानेवारी १९७२ रोजी संक्रांतीला पुण्याच्या बालगंधर्वमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ असे सलग तीन प्रयोग आयोजित करण्यात आले. नेहमीप्रमाणे तुफान प्रतिसाद या नाटकाला मिळालाच. विशेषतः सुशिक्षित मुली, स्त्रिया यांनी देखील गर्दी केली होती. गंमत म्हणजे ‘बालगंधर्व’च्या त्या प्रयोगांना येणार्‍या प्रत्येक पुरुष रसिकाला गुलाबाचे फूल आणि महिलांना गजरे, तसेच तीळगूळ देण्यात आला होता.

सकाळच्या प्रयोगाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दुपारी ग. दि. माडगूळकर आणि रात्रीच्या प्रयोगाला वसंत देसाई आदी दिग्गज मंडळी सहकुटुंब हजर होती. टीकाकार टीका करत राहिले पण नाटकाचा हाउसफुलचा बोर्ड कधी खाली उतरलाच नाही. पुढे पन्नास वर्षात कलाकार बदलत राहिले. पण सर्वात गाजलं ते नव्वदच्या दशकातील मोहन जोशी, अतुल परचुरे, सुनील तावडे यांच्या संचातील नाटक पण या यशात सीडीच्या जमान्याचा देखील तेवढाच हात आहे.

काही वर्षापूर्वी पाच हजार प्रयोगाचा विक्रम देखील तरुणतुर्कने केला.

आज बिलंदर प्रोफेसर मधुकर तोरडमल मामा जिवंत नाहीत. पण महाराष्ट्रातील अनेक पिढ्याना त्यांच्या तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकाने हसवले. आणि डिजिटल माध्यमावर आल्यामुळे पुढच्या देखील अनेक पिढ्यांना हाहाहीही ची बाराखडी शिकत राहायची संधी मिळेल हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.