टाटा आणि अंबानी, दोघांच्यात श्रीमंत कोण आहे..? 

धिरूभाई अंबानी आणि रतन टाटांचा बड्डे एकाच दिवशी येतो. आपल्या गावाकडं जरा कोणी माजूरडा झाला की, काय टाटा-अंबानी लागून गेलायस का म्हणून विचारलं जातय. इतका दरारा या दोन आडनावांचा झालाय. 

अंबानी काका म्हणजे धिरूभाई अंबानी यांच्या बिझनेसच्या कथा आत्ता दंतकथा म्हणून उभा राहिल्यात तर टाटांच्या फळीतल्या मान्यवरांच्या कथा या नेहमीच डेडिकेशनचं उदाहरण म्हणून समोर येत असतेत. साहजिक या दोन माणसांच्यात तुलना नेहमी ठरलेली असते. 

यातली सर्वात महत्वाची तुलना म्हणजे टाटा मोठ्ठे की अंबानी. रिलायन्स इंडस्ट्री मोठ्ठी आहे का टाटा सन्स. दोन्हीचे उत्तराधिकारी म्हणजे रतन टाटा मोठ्ठे आहेत की मुकेश अंबानी, सर्वांधिक दान धर्म कोण करतं हा पण मुद्दा अनेकदा विचारात घेतला जातो… 

तर आजचा विषय हाच आहे की टाटा मोठ्ठे का अंबानी… 

या प्रश्नांची उत्तरं मुळापासून समजून घेण्यासाठी दोन्ही कंपन्याचा रितसर सातबारा पाहिला पाहीजे, म्हणजे कस तर कंपनीचं उद्दिष्ट काय आणि कशासाठी स्थापन केली ते पहायला पाहीजे. म्हणजे बेसिक व्हिजन, इथिक्स, लॉ अशा गोष्टी. म्हणजे एकंदरीत आयड्या येईल.. 

तर पहिला टाटा कंपनीचा सातबारा.. 

तर कंपनी कोणत्या उद्दिष्टाने सुरू केली हा सर्वात महत्वाचा विषय आहे. टाटा समुहाचा पाया रचला तो जमशेदजी टाटा यांनी. त्यांचा जन्म गुजरातच्या नवसारीचा. तिथून ते मुंबईत आले. बिझनेस उभा करण्याची आयड्या आली आणि इंग्लडला गेले.

तिथे कॉटन मिल संबधित माहिती घेतली आणि त्या काळात २१ हजार रुपये गुंतवणूक करून त्यांनी १८६८ साली चिंचपोकळीत एक ऑईल मिल विकत घेतली. बंद पडलेल्या या ऑईल मिलच रुपांतर त्यांनी कॉटन मिलमध्ये केलं. 

पण पहिल्याच दणक्यात अनेक मर्यादा त्यांना समजून आल्या. ते परत इंग्लडला गेले आणि यावेळी एकदम टॅलेन्डेट होवून परत आले. यावेळी त्यांनी कॉटन मिल काढली ती नागपूरात. या कॉटम मिलचं पहिल उद्दिष्ट त्यांनी डोक्यात ठेवलं की कामगारांना माणसांप्रमाणे वागवणं.. 

त्यासाठी त्यांनी PF सिस्टिम सुरू केली.

बिझनेसचं बेसिक प्रिन्सिपल होतं ते म्हणजे लोकांची सेवा करणं आणि बिझनेस एक संस्था म्हणून वाढवणं. इथे व्यक्तिगत इच्छा, आकांक्षा यांना मुरड घालण्यात आली होती. या फंडामेंन्टल राईट्सवरच टाटा उभारण्यात आली. 

साहजिक त्यानंतर येणाऱ्या सर्व पिढ्यांना जमशेदजी टाटांचे हे रुल्स फॉलो करणं नैतिक दृष्टिकोनातून का होईना गरजेचं होतं. 

जमशेदजी टाटा यांच स्वप्न आयर्न इंडस्ट्री, हायड्रोलिक पॉवर व सोबतच इन्स्टिट्यूशन अर्थात शैक्षणिक क्षेत्रात भारतात पायाभूत संस्था निर्माण करणं हे होतं. उदाहरणच द्यायचं झालं तर बंगलोर शहर आयटी हब कस झालं ही स्टोरी तुम्ही वाचू शकता किंवा महाबळेश्वर मध्ये स्ट्रॉबेरी कशी आली ही स्टोरी देखील. या बेसिक गोष्टी आहेत. 

या गोष्टी वाचल्यानंतर लक्षात येत की जमशेदजी टाटा यांचा हेतू हा एखाद्या राष्ट्रनिर्मीतीच्या कार्याप्रमाणे आहे. 

जमशेदजी टाटा यांच्यानंतर सर दोराबजी टाटा यांनी टाटा समुहाचा कारभार स्वीकारला. टाटा सन्सचे ते चेअरमन राहिले. १९०४ ते १९३२ या काळात जमशेदजी टाटा यांची स्वप्ने पुर्णत्वास घेवून जाण्याचा त्यांनी चंग बांधला. 

जमशेदजी यांच्या शेवटच्या काळात म्हणजे १९०३ मध्ये मुंबईत ताज हॉटेल सुरू झाले. 

दोराबजी यांच्याकडे कारभार आला. जमशेदजी यांच व्हिजन पुढे घेवून जाण्यासाठी त्यांनी हायड्रोलिक पॉवर आणि आयर्न इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरवात केली. इथलं व्हिजन सांगायचं तर जमशेदपूरची स्टोरी तुम्ही पाहू शकता.

आपण फक्त कंपनी स्थापन करत नसून एक कुटूंब स्थापन करत आहे या विचारातून शहराचा पाया घालण्यात आला. चांगले स्कूल, मंदिर-मशिद-चर्च इथपासून सर्व गोष्टींची काळजी घेण्यात आलेली आहे. 

याच काळात इंडियन इन्स्ट्यिट्यूट ऑफ सायन्सची पायाभरणी देखील करण्यात आली. हेतू हाच की भारतातील मुलांनी जागतिक दर्जाच्या संशोधन क्षेत्रात कामगिरी करावी. 

नंतरच्या काळावधीत वयाच्या 34 व्या वर्षी आलेल्या JRD टाटांच्या एकूण कालावधीत टाटा केमिकल्स, मोटर्स, टाटा एअरलाईन्स, टेल्कोे अशा कंपन्याची स्थापना व विस्तार झाला. त्यांनी जेव्हा समुहाचा कारभार हाती घेतला तेव्हा एकूण १४ कंपन्या होत्या ज्या त्यांच्या कारकिर्दीत म्हणजे १९९१ साली ९५ इतक्या झाल्या.

ते गेले तेव्हा त्यांच घर देखील भाड्याचं होतं. ज्या माणसाने भारतात विमानक्षेत्राचा पाया घातला त्यांच्याकडे स्वत:च्या मालकिच एकही विमान नव्हतं. 

टाटा ट्रस्ट, समाजसेवी संस्था, टाटा मेमोरियल हॉस्पीटल अशा गोष्टीतून त्यांनी जमशेदजी टाटांचा व्हिजन पुढे नेलं. 

तिचं गोष्ट रतन टाटांची. रतन टाटांना ओळखलं जातं ते त्यांच्या व्हिजन मुळे. पण हे व्हिजन टाटा समुहाच आहे. यातून जास्तीत जास्त रक्कम समुहाची असणं, ट्रस्टची असणं आणि राष्ट्रनिर्मीतीप्रमाणे कार्यरत राहणं हाच विचार पुढे आला. 

आत्ता अंबानीच्या कंपनीचा सातबारा पाहूया.. 

रिलायन्सची स्थापना धिरूभाई अंबानी यांनी केली हे तर सगळ्यांना माहितच आहे. त्यांचे वडिल शाळा मास्तर होते. ते पुढे एडनला काम करण्यासाठी गेले. तिथला एक किस्सा सांगितला जातो. एडनमध्ये तेव्हा चिल्लर, नाण्यांसाठी जे चलन होते ते चांदीपासून बनलेलं असायचं. तेव्हा चांदीची किंमत जास्त झाली आणि चांदीच्या नाण्याची किंमत कमी होती.

मग अंबानी यांनी ते नाणी वितळवून पैसे उभारले होते. थोडक्यात काय तर फायदा हे व्हिजन रिलायन्सच होतं. 

पुढे जेव्हा ते मुंबईत आले तेव्हा कापड मार्केटमध्ये उतरले. विमल नावाने ब्रॅण्ड सुरू केला. त्यानंतर मसाल्यात काम केल. पुढे एकामागून एका कंपनीची स्थापन करण्यास सुरवात केली. त्यांनी १९७७-७८ साली आपल्या कंपनीचा IPO आणला. 

यामागे बिसिक प्रिन्सिपल काय होतं. तर मोठ्या प्रमाणात उत्पादन करुन कमीत कमी नफ्यात ग्राहकांपर्यन्त पोहचवायचं. जेणेकरून उत्पादनाची कॉस्ट कमी राहिलं, कमी किंमतीत ते विकता येईल व जास्त ग्राहकांपर्यन्त ते घेवून जावून फायदा अधिकचा होईल. उदाहरण घ्यायचच झालं तर आपलं जियो घ्या. १ लाख ग्राहकांकडून १ रुपयांचा फायदा घेण्याऐवजी. १ कोटी ग्राहकांकडून १ पैशाचा फायदा घ्या हे बेसिक प्रिन्सिपल. 

यातून अधिकाधिक पैसे आपल्यासाठी उभारणं व दूसरा बिझनेस उभा करणं हे तत्व राहिलेलं आहे. 

आत्ता ही लांबड कशासाठी लावली तर दोन बिझनेसमधला मुलभूत फरक समजून घेण्याची. इथं हा चुकीचा आहे आणि तो बरोबर आहे असला विषय येत नाही. तर विषय येतो व्हिजनचा. बर रिलायन्सने आपलं व्हिजन काय लपवून ठेवलेलं नाही हे पण खरय. तुम्हाला अधिकाधिक स्वस्त:त वस्तू मिळतात हा देखील ग्राहकांचा एक फायदाच असतो. 

आत्ता व्यक्तिगत पातळीवर कोण सर्वाधिक श्रीमंत आहे ते पाहूया.. 

मुकेशभाय यात लयच टॉपला आहेत. कारण काय तर रिलायन्स इंडस्ट्रीचे साधारण ४८ टक्के शेअर्स थेट त्यांच्या एकट्याच्या मालकीचे आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीचं एकूण मार्केट कॅपिटलायझेशन ९४ लाख कोटींच्या दरम्यान आहे. मुकेश भाईंची व्यक्तिगत मालमत्ता यात ५७ बिलीयन डॉलर आहे. 

दूसरीकडे व्यक्तिगत पातळीवर रतन टाटा स्पर्धेत सुद्धा नाहीत.

कारण काय तर टाटा समुहाचे प्रमुख राहिलेले असून सुद्धा त्यांच्याकडे टाटा समुहाचे ०.८ टक्के शेअर्स व्यक्तिगत आहे. मग टाटा समुहाचे शेअर्स आणि मालकी कोणाकडे आहे हा प्रश्न येतो. टाटा समुहात सर्वाधिक शेअर्स सर दोराबजी टाटा ट्रस्टचे आहेत. २७ टक्के इतकं हे व्हॉल्यूम आहे. रतन टाटा ट्रस्टकडे २३ टक्के शेअर्स आहेत. ट्रस्ट आणि ट्रस्टच्या मालकीतून सामाजिक कार्य अशी यांची सिस्टिम आहे. बहुताश शेअर्स हे वेगवेगळ्या ट्रस्टकडेच आहेत. 

याचं एकूण कॅपिटलायझेशन साधारणं ११० लाख कोटींच होतं. त्यांच्या एकूण २८ कंपन्या शेअर्स मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. 

म्हणजेच रिलायन्सपेक्षा कितीतरी अधिक. आत्ता ट्रस्टचे शेअर्स किंवा मुकेश अंबानीचे रिलायन्समध्ये जितक्या टक्यांचे शेअर्स आहेत तितक्याचं टक्यांचे शेअर्स रतन टाटांकडे आहेत अशी कल्पना केली तर रतन टाटा जगातले श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले जातील. पण अस करणं त्यांच्या बेसिक प्रिन्सिपल्सच्या विरोधात आहे. 

त्यामुळेच मुकेश भाई हे व्यक्तिगत श्रीमंत आहेत. रतन टाटा व्यक्तिगत पातळीवर खूपच मागे आहेत. समुहाच्या बाबतीत टाटा ग्रुप खूपच पुढे आहे तर रिलायन्स ग्रुप मागे आहे हेच याचं उत्तर… 

बाकी मुकेशभाईंच व्यक्तिगत डोनेशन सांगायचं झालं तर त्यांनी २०१८ साली त्यांनी ४०२ कोटी दान केलेले जे त्यांच्या उत्पन्नाच्या ०.१ टक्केच होते… 

एकदा रतन टाटांना मुकेश अंबानी श्रीमंत आहेत तुम्ही का नाही असा प्रश्न विचारलेला तेव्हा त्यांनी अचूक उत्तर दिलेलं. ते म्हणालेले, 

दे आर बिझनेसमॅन ॲण्ड वी आर इंण्ड्रस्ट्रिएलिस्ट..

बाकी कोणतर म्हणलच आहे,

इन्वेस्ट इन रिलायन्स, वर्क फॉर टाटा 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.